Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी पोलिसांकडून दबावाची तक्रार!

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी पोलिसांकडून दबावाची तक्रार!

फलटण :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वीच पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याची तक्रार सुमारे चार महिन्यांपूर्वी — १९ जून २०२५ रोजी — फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्याकडे केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

तक्रारीत संबंधित डॉक्टरांनी नमूद केले होते की, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील वैद्यकीय तपासणीदरम्यान एका व्यक्तीला वैद्यकीयदृष्ट्या अपात्र (unfit) ठरवले असतानाही, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना त्या व्यक्तीला पात्र (fit) घोषित करण्यासाठी वारंवार दबाव आणला.

डॉक्टरांनी आपल्या अर्जात म्हटले होते की, संबंधित अधिकाऱ्याने त्यांना वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून “तो व्यक्ती पात्र ठरवा” असे सांगितले. वैद्यकीय नियमांनुसार ते शक्य नसल्याचे सांगितल्यावर, अधिकाऱ्याने उर्मट भाषेत प्रतिक्रिया दिली आणि त्याच्या वागणुकीमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले.

या तक्रारीत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती चौकशी करून भविष्यात असा त्रास होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली होती.

मात्र, या तक्रारीनंतर नेमकी काय कारवाई झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिंताजनक बाब म्हणजे, तक्रार दाखल केल्यानंतर केवळ चार महिन्यांतच संबंधित महिला डॉक्टरने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या कथित मजकुरात पोलिसांवर गंभीर आरोप असल्याने, जून महिन्यातील या तक्रारीचे महत्त्व आता अधिकच वाढले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments