
Hafiz Saeed: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचा इरादा पक्का केलाय. त्यामुळे दहशतवाद्यांचे आणि पाकिस्तानचे धाबे दणाणलेत. भारतावर दहशतवादी कारवाया करणारा लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदही लाहोरमध्ये लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळालीय. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदला सुरक्षाही पुरवलीय. मात्र भारतीय लष्करालाही हाफिज सईदचा पाकिस्तानातील ठावठिकाणा सापडलाय.
दहशतवाद्यांचा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचा निश्चय भारत सरकारने केल्यानंतर पाकिस्तानची त्रेधा तिरपीट उडालीय. 26/11 सह अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड असलेला हाफिज सईदही पाकिस्तानातच लपल्याचं आता समोर आलंय. दहशतवादाशी आपला संबंध नसल्याचं सांगणाऱ्या पाकनेच मोस्ट वॉन्टेड क्रूरकर्मा दहशतवादी हाफिस सईदला पाकिस्तानातच लपवलाय.
हाफिज सईदचा पाकिस्तानातील ठावठिकाणा आता सापडलाय. हाफिज सईदच्या घराचे सॅटेलाईट फोटो समोर आलेत. लाहोरच्या जोहर टाऊनमध्ये हाफिज सईदचं आलिशान घर आहे. लाहोरमध्ये हाफिज सईदचं भलं मोठं घरं, त्याच्यासाठी स्वतंत्र मशिद आणि खासगी पार्क असल्याचं समोर आलंय.
तर हाफिज सईद पाकिस्तानात नाही असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यानंतर हाफिजच्या सुरक्षेत मोठी वाढ केलीय.हाफिज सईदला आता पाकिस्तानने चार स्तरीय सुरक्षा देण्यात आलीय. त्याच्या घराच्या चारही बाजुंनी पाक लष्कराचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. तर सीसीटीव्हीच्या निगरानी खाली त्याचं घरं आहे. जगभरातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हाफिज सईद हा सुत्रधार आहे.
कोण आहे हाफिज सईद?
हाफिज सईद हा जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे. तो मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलंय. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादामध्ये हाफिज सईदचा हात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतलीय. दहशतवादी हल्ल्यांनंतर तो मी नव्हेच असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानने मात्र दहशतवाद्याला शरण दिलीय.आणि दहशतवादी हाफिज सईदला लपवत त्याला सुरक्षा पुरवलीय. मात्र भारत या क्रूरकर्म्याला सोडणार नाही हेही तेवढंच खरंय.







