Saturday, August 22, 2026
Homeसाताराज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्या कार्याचा गौरव; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते...

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्या कार्याचा गौरव; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सातार्‍यात समारंभ

सातार्‍यात पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा गौरव
फलटण  :- ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव समारंभ सातार्‍यात शनिवार, 19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

मावळा फाउंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक व पत्रकारांच्या संयुक्त विद्यमाने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, निमंत्रक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, तसेच रवींद्र बेडकिहाळ गौरव समितीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार आणि जिल्हा बँकेचे सीईओ डॉ. राजेंद्र सरकाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

1968 पासून गेली 57 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले बेडकिहाळ यांनी पत्रकारांवरील संकटकाळात त्वरित मदतीसाठी 1987 मध्ये ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ या स्वायत्त संस्थेची स्थापना सातारा येथून केली. तसेच कोकणातील पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे 1993 साली आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘दर्पण’ स्मारक उभारून त्यांचे कार्य उजळवले.

गेल्या 35 वर्षांपासून या स्मारकात ‘दर्पण पुरस्कार’ प्रदान करून राज्यातील गुणवंत पत्रकारांचा सन्मान केला जातो. 2010 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात 7 नवीन शाखा स्थापन केल्या. आजही वयाच्या 81व्या वर्षी ते सक्रियपणे मार्गदर्शन करत आहेत.

या सर्व प्रेरणादायी कार्यासाठी त्यांचा गौरव करण्यात येत असून, जिल्ह्यातील सर्व पत्रकार, साहित्यिक व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव समितीने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments