Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: ‘अर्थ’संपन्न आयुष्यासाठी उभारू मराठीची गुढी!

रसिक स्पेशल: ‘अर्थ’संपन्न आयुष्यासाठी उभारू मराठीची गुढी!

[ad_1]


सर्वांना नववर्षाच्या दोन दोन शुभेच्छा! पहिल्या शुभेच्छा दोनच दिवसांनी, १ एप्रिलला नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे म्हणून आणि दुसऱ्या शुभेच्छा अर्थातच गुढीपाडव्याच्या, कारण आज मराठी नवीन वर्षाचा आरंभ होतो म्हणून. या दोन्ही नव्या वर्षांचे स्वागत करताना मनात विचार येतो की, अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्र सरकारने मराठीचा सन्मान केल्याने एकाएकी तिच्यातील मरगळ संपून मराठी गौरव गीते गायिली जात आहेत. खरे तर मराठी भाषा आधीपासून अभिजात होती आणि आहेच, पण आता त्याबद्दल खूप बोललं, लिहिलं जाऊ लागलं आहे. मग या सगळ्यांचा मराठी भाषिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी काही लाभ होणार का? असाही सूर उमटतो आहे. त्यामुळे मराठी नववर्ष आणि आर्थिक नववर्ष असा दुहेरी योग गाठून मराठी भाषेच्या अर्थकारणाचा विचार करू… गोदाकाठच्या सातवाहन राजा हालने इ. स. पूर्व २०० मध्ये लिहिलेल्या गाथा सप्तशतीमधल्या काव्यातूनही त्या काळातील निसर्ग, समाजरचना आणि व्यवहारांबद्दलची माहिती मिळते. भाषिक व्यवहार हा फक्त साहित्यिक नसतो, तर आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक असतो. भाषा ही माध्यम असल्याने ती आयुष्यातील प्रत्येक घटकाला स्पर्श करते. प्रामुख्याने ती आपल्या जगण्याच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची ठरते. उदाहरण द्यायचे, तर स्थानिक व्यापाऱ्यांशी आपण मराठीतून खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार करतो. पण, राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यांतील ग्राहकांशी किंवा व्यापाऱ्यांशी व्यवहाराची वेळ येते, तेव्हा हिंदी किंवा इंग्रजी वापरावी लागते. हाच आर्थिक व्यवहार आंतरराष्ट्रीय पातळीवर जातो, तेव्हा इंग्रजीशिवाय पर्याय नसतो, कारण इंग्रजी ही आता जगाने व्यवहाराची भाषा म्हणून मान्य केली आहे. म्हणून जगातील बहुतेक देश आयात-निर्यातीचे करार इंग्रजीतच करतात. हेच उदाहरण उलट पद्धतीने घेऊ. ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपली बाजारपेठ वाढवायची आहे, त्यांना भारतात यायचे झाले तर प्रामुख्याने हिंदी आणि स्थानिक भाषांचा विचार करावा लागतो. कारण स्थानिक ग्राहकाशी त्याच्या मातृभाषेतून बोलले तरच त्याच्याशी भावनिक जवळीक वाढणार असते. उदाहरणार्थ, ट्रॅक्टर तयार करणारी कंपनी आंतरराष्ट्रीय असली, तरी त्यांना ट्रॅक्टर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला विकायचा असेल, तर त्याला समजेल अशा भाषेतून म्हणजे मराठीतून जाहिरात करावी लागते. ती विविध माध्यमांतून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी लागते. त्यासाठी शेतकरी काय पाहतो, वाचतो याचा अभ्यास करावा लागतो. तो पंढरीच्या वारीला जात असेल, तर त्या मार्गावर त्याला दिसेल अशा जाहिराती कराव्या लागतात. याचाच अर्थ, ग्राहक हा राजा असेल, तर तो म्हणेल त्या भाषेत आंतरराष्ट्रीय कंपन्यांना व्यवहार करावे लागतात. थोडक्यात, ज्या भाषेत सर्व राज्य व्यवहार, न्यायनिवाडा आणि व्यापार-उदीम चालतो, ती भाषा तिच्या वापरामुळे टिकून राहते, नवनव्या शब्दांची भर घालून वाढत राहते. मराठीला समृद्ध बनवायचे असेल, तर आधी सर्व कायदे, न्यायनिवाडे, बँकेतील व्यवहार, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाची पाठ्यपुस्तके मराठीतून व्हायला हवीत. फक्त कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, चित्रपटांतून येणारी सांस्कृतिक मराठी म्हणजे तिचा वापर नव्हे, तर सामान्य माणूस दैनंदिन व्यवहारात किती मराठी वापरतो, याला फार महत्त्व आहे. मराठी माणूस कोणीही परभाषिक व्यावसायिक दिसला की झटकन आपल्या तोडक्यामोडक्या हिंदीत किंवा इंग्रजीत बोलायला लागतो. जणू काही मराठीतून बोललो तर समोरची व्यक्ती वस्तू विकणार नाही किंवा नीट सेवा देणारच नाही! ही व्यवहारातील भाषिक मानसिक गुलामगिरी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली होती. त्यांनी फारसी आणि अरबीचे आक्रमण रोखण्यासाठी राज्यव्यवहार कोश तयार केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही भाषाशुद्धी चळवळ राबवली आणि इंग्रजीतील अनेक शब्दांना पर्यायी शब्दांची निर्मिती केली. हे सर्व शब्द आजही आपण सहजपणे वापरतो. हा एका अर्थी भाषिक स्वातंत्र्याचा लढाच होता. इंग्रजी भाषा समृद्ध झाली, कारण त्यांनी सातत्याने सर्व भाषांतील शब्द जसेच्या तसेच उचलले आणि इंग्रजीतून वापरात आणले. त्यामुळे ती जागतिक भाषा झाली. मराठीलाही त्या उंचीवर आपली गुढी उभारायची असेल, तर जागतिक ज्ञान मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावे लागेल. या संदर्भात आपण कुठे आहोत, हे पाहताना जे चित्र दिसते ते अगदीच निराशाजनक नाही. जगातील १४ कोटींहून अधिक लोक मराठी भाषिक आहेत. त्यामुळे मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची, तर जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. ज्ञानकोश, विश्वकोश, शब्दकोश, संस्कृतिकोश आदी शेकडो कोश निर्माण करणारी मराठी भाषा मुळातच समृद्ध आणि संपन्न आहे. फक्त आपण तिचा आवर्जून वापर करत नाही. या आर्थिक नववर्षाच्या निमित्ताने, सगळे अर्थव्यवहार मराठीतून करायचा निर्धार मराठी भाषिकांनी करायला हवा. बँकेतील सही मराठीत असावी, तेथील सर्व व्यवहारांची नोंद मराठीतून ठेवण्याचा आग्रह असावा, व्हॉट्स अॅप, फेसबुक आदी समाजमाध्यमांचा वापर मराठीतून करावा, ई कॉमर्स संकेतस्थळांवरुन मराठीतून वस्तू मागवाव्यात, ‘ओटीटी’वर मराठी भाषेतून जगभरातील चित्रपट आणि मालिका पाहाव्यात, इंटरनेटवर मराठीतून माहिती घ्यावी, साधे मेसेजही मराठीतूनच लिहिले जातील, हे पाहावे. यामुळे काय होईल की, मराठी भाषेला प्रचंड मागणी आहे, हे इंटरनेटला समजेल. या प्लॅटफॉर्म्सनी वापरलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला कळेल की मराठी भाषेतून खूप व्यवहार होत आहेत. मग ते सर्व तंत्रज्ञान मराठीतून आणण्याचा प्रयत्न करतील. स्वाभाविकच मराठीत सगळे ज्ञान उपलब्ध झाल्याने तिचा वापरही वाढेल. भारतातील सर्वात जास्त क्रयशक्ती असलेल्या प्रदेशांत महाराष्ट्राचा समावेश होतो. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकच्या परिघातील चार कोटींहून अधिक मराठी भाषिक सर्वांत जास्त खरेदी करतात. या सर्व ग्राहकांनी सगळे आर्थिक व्यवहार मराठीतून करायचे ठरवले, तर स्वाभाविकच मराठीतून जाहिराती तयार होतील, त्या दाखवण्यासाठी मराठीत बातमीपत्रे आणि मालिका बनवाव्या लागतील. मराठी दैनिके, मासिके आणि नियतकालिके या जाहिरातींमुळे वाढतील. एकंदरीतच सृजनशील, प्रतिभावान मराठी लोकांची मागणी वाढेल. मराठी उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. मराठी वस्तू आणि सेवांना जगभरातून मागणी वाढली, तर जगभरातील लोकांनाही व्यवहारासाठी मराठीचा वापर करावा लागेल… मराठीच्या उत्कर्षाचे हे स्वप्न साकारण्यासाठी आजच्या इतका दुसरा चांगला मुहूर्त कुठला असेल? चला तर मग, नवसंवत्सराची अन् नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात करताना, आपल्या आयुष्याच्या ‘अर्थ’संपन्नतेसाठी मराठी भाषेची गुढी उभारुया! (संपर्कः prasadmirasdar@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments