Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रवेबमार्क: 'बझ' भारतीय ‘टॅटू’चं जागतिक गोंदण!

वेबमार्क: ‘बझ’ भारतीय ‘टॅटू’चं जागतिक गोंदण!

[ad_1]

समीर गायकवाड15 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

सामान्यत: ज्या कला लोकांच्या जाणिवांशी घट्ट निगडीत नसतात, त्यांच्याविषयी समाजमनात फारसे आकर्षण नसते. मात्र, समाजाच्या विविध वयोगटांपैकी तरुण पिढीशी कनेक्ट असणाऱ्या एखाद्या गोष्टीवर आधारलेला सिनेमा अथवा माहितीपट ट्रेंडमध्ये आला की त्यावर समाजमाध्यमांत चर्चा सुरू होते. अशाच धाटणीतला ‘बझ’ हा माहितीपट २८ फेब्रुवारीला जिओ हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय.

भारतातील प्रसिद्ध टॅटू कलाकारांपैकी एक असलेल्या एरिक डिसूझा यांचा प्रवास दाखवणारा हा माहितीपट कला आणि व्यक्तिविकास यांच्यातील संबंध व त्याचे महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे तो निव्वळ माहितीपटापेक्षाही एक हळूहळू उलगडत जाणारी हृदयस्पर्शी कहाणी बनला आहे. व्यक्तीच्या जडणघडणीची सालपटे निघत जावीत, तसा त्यातील घटनापट समोर येतो.

‘बझ’चा विषय केवळ टॅटू काढण्याचा वा त्याच्या माहितीचा नाही, तर त्याआडच्या सामाजिक भावनांचा आहे. विविध वयातले लोक त्याकडे कसे पाहतात, यावरही त्यात कटाक्ष टाकला आहे. पूर्वीच्या काळी शरीराच्या विविध भागांवर गोंदवलं जायचं. त्यामध्ये आणि आताच्या लक्षवेधी टॅटूमध्ये काय फरक आहे, याचे मर्म माहितीपटात उत्तमपणे उलगडले आहे. नादिष्ट, नशेडी, क्रिंज, ठरकी, वाह्यात, छंदीफंदी, लक्ष वेधून घेऊ इच्छिणारे वा आकर्षणकेंद्री लोकच टॅटू काढतात असा समज रूढ आहे. तो कशामुळे रूढ आहे, याचा वेधक शोध यात घेतला आहे.

मुंबईच्या रस्त्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीपर्यंतचा एरिकचा प्रवास ‘बझ’मध्ये चित्रित झाला आहे. टॅटूची कलाकृती एखाद्याच्या वैयक्तिक आवडनिवडीची, स्वभाव-गुणवैशिष्ट्यांची माहिती देत व्यक्तिविशेषाच्या बाबतीतले छुपे सत्य कसे समोर आणते, हे पाहण्यासारखे आहे. अंगावर गोंदलं जावं की नको, याविषयी आपल्यात मतभेद असूनही आपल्या सर्वांच्या मनात त्याचे स्वरूप एका हव्याहव्याशा अनुभूतीचे आहे. वास्तवात हा एक वैयक्तिक स्तरावरचा सर्वसामान्य मानवी अनुभव आहे. मात्र, तो दृश्य स्वरूपात इतरांच्या नजरेला पडत असल्याने ज्याने टॅटू काढून घेतलेला असतो, त्याच्या मनातले त्या विषयीचे भाव आणि त्याच्या टॅटूकडे पाहणाऱ्या इतरेजनांचे भाव नक्कीच भिन्न असतात. या दोन्हींची सांगड कशी घालणार, याचे मजेदार उत्तर ‘बझ’ देतो. एरिक डिसूझा यांची या क्षेत्रातील कारकीर्द तब्बल वीस वर्षांची आहे, यावरूनच या माहितीपटातली रंगीनियत लक्षात यावी!

एरिक एका रात्रीत सर्वोच्च स्थानी पोहोचले नाहीत. त्यासाठी त्यांनी जो संघर्ष केलाय, तो स्क्रीनवरच पाहणे इष्ट! अनेक अडथळ्यांची शर्यत त्यांनी पार केली, अनेकदा अपयशही आले. पण, खचून न जाता ते पुढे जात राहिले. दिग्दर्शक माहिर खान यांनी या माहितीपटाच्या चित्रीकरणासोबतच एका अर्थाने एरिकच्या कलाकृतीही डिजिटल रुपात जतन केल्या आहेत. काहींना ही सर्व अतिशयोक्ती वाटू शकते, मात्र ज्या वेगाने तरुणाई आणि नवी टीनएजर पिढी या कलेकडे आकृष्ट होतेय, ते पाहता काही वर्षांनी टॅटू हा बहुताशांच्या देहभागांचा घटक झालेला असेल. लोकांचे सामाजिक, लैंगिक, वैयक्तिक दृष्टिकोनही त्यावरूनही निश्चित केले जातील. ‘बझ’च्या काही दृश्यांमध्ये टॅटू कसा काढला जातो नि विविध अवयवांवर टॅटू काढला जाताना कोणती दक्षता घ्यावी लागते, याची अतिशय रंजक माहिती मिळते. टॅटूचे आरेखन कसे होते, त्यात रंग कसे भरले जातात आणि त्याचे अंतिम टचअप कसे केले जाते, याचे विश्लेषण रंजक आहे.

एरिक यामध्ये एकेठिकाणी सांगतात की, टॅटू काढणं हे कलेच्या परिवर्तनशीलतेविषयी सकारात्मक असण्याचं लक्षण आहे. लोकांना मनोआघात आणि अव्यक्त वेदनांवर मात करण्यासाठी तसेच सामाजिक सीमा ओलांडण्यास टॅटू कामी येऊ शकतो. एरिकचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम म्हणजे त्याच्या पत्नीच्या हातावरचा अत्यंत आखीवरेखीव बोलका टॅटू, ज्याला आंतरराष्ट्रीय टॅटू परिषदांमध्ये सहा पुरस्कार मिळाले आहेत. या टॅटूमध्ये टिपलेले तपशील आणि त्यातील गूढतेचे प्रमाण एरिकमधल्या कलाकाराच्या कौशल्याचा पुरावा आहे. एरिक वास्तववादी आणि ऑर्गनिक टॅटूमध्ये तरबेज आहेत, याची साक्ष जागोजागी येते. फ्री स्टाइल टॅटूवर त्यांचे हात सफाईदारपणे काम करतात. पूर्ण शरीरभरून काम करण्यासाठी केवळ अधिक शाई आणि संयम लागतो असे नव्हे, तर त्या जटिल प्रक्रियेसाठी वचनबद्ध क्लायंटची आवश्यकता असते. त्याशिवाय टोटल बॉडी टॅटू काढता येत नाही. अर्ध्यात सोडून दिलेले टॅटू विद्रूपीकरणास हातभार लावतात.

‘बझ’मध्ये एरिक डिसूझा, रॉबिन बहल, जोसी पॅरिस रेंटली, सचिन आरोटे, दीप कुंडू आणि व्हायलेट डिसूझा यांची प्रमुख कामे आहेत. अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क अंतर्गत अन्य सहनिर्मात्यांनी याची निर्मिती केली आहे. एका वेगळ्या विषयाची रंजक माहिती अनुभवण्यासाठी ‘बझ’ लक्षात राहील. जाता जाता… या महिन्यातील आवर्जून पाहण्यासारख्या मल्याळी थ्रिलर सिनेमांमध्ये.. सूक्ष्मदर्शिनी (जिओ हॉटस्टार), पानी, रेखाचित्रम (सोनी), गोलम (ॲमेझॉन) ही नावे महत्त्वाची.

(संपर्कः sameerbapu@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments