
फलटण: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फलटण शहरात भाजप व माऊली फाउंडेशन यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका डॉ. आम्रपाली कोकरे यांना ‘राजमाता राणी अहिल्यादेवी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती मंदाकिनी हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री शामसुंदर शास्त्री विध्वंस उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. आम्रपाली कोकरे, ज्यांनी “मल्हार युग” पुस्तक लिहिले आहे, त्यांनी मल्हारराव होळकर यांच्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “सुभेदार मल्हारराव होळकर यांनी स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याची सुरुवात केली. दातृत्व आणि कर्तृत्व यांचा संगम म्हणजे मल्हारराव होळकर. अखंड भारतावर भगवा फडकवण्यामध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे.”
पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त करताना त्या भाजप व माऊली फाउंडेशनचे आभार मानले. या कार्यक्रमाला महिला वर्गाने मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक सशक्त व प्रेरणादायी सोहळा पार पडला.








