कव्हर स्टोरी: यंदाचा उन्हाळा ‘अतिकडक’

0
5
कव्हर स्टोरी:  यंदाचा उन्हाळा ‘अतिकडक’




ग्लोबल वॉर्मिंग… हा एकविसाव्या शतकातील परवलीचा शब्द बनला आहे. २०१४ ते २०२४ या दशकात तापमानवाढीचा नवा उच्चांक झाला आहे. यंदा तर होळीच्या आधीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे. एकीकडे सामाजिक, राजकीय वातावरणाचा पारा रोज वरती चढत असताना, नैसर्गिक वातावरणातील वाढत्या उष्णतेनेही डोकी तापू लागली आहेत. पर्यावरणासह मानवी आरोग्य तसेच शेतीवर परिणाम घडवणाऱ्या या वाढत्या उन्हाचा आणि त्याच्या बदलत्या तऱ्हांचा हा वेध… यंदाच्या जानेवारीतील तापमान गेल्या १२१ वर्षांतील सर्वाधिक असल्याची नोंद केली गेली. जानेवारीमध्ये सरासरी तापमानात १.५७ अंश, तर फेब्रुवारीत १.५८ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेरीस आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले. जानेवारी, फेब्रुवारीतील ही वाढ पाहता, यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, येत्या काही दिवसांत पारा ४० अंशांवर किंवा त्याहीपुढे जाऊ शकतो. या उन्हाळ्यात देशात सरासरी तापमान ४५ अंश इतके राहण्याची शक्यता असून; दिल्ली, राजस्थान, गुजरातमध्ये ते कमाल ५० अंश, तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशात कमाल ४८ अंशांवर जाऊ शकते. शिवाय, या उन्हाळ्यात उष्णतेच्या दोन ते तीन लाटा येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतासह एकूणच दक्षिण आशिया तापमानवाढीच्या बाबतीत ‘अतिसंवेदनशील’ असल्याचे ‘आयपीसीसी’चा अहवाल सांगतो. या पार्श्वभूमीवर एकीकडे दिल्ली आणि उत्तर भारतात उन्हाची तीव्रता वाढत आहे, तर दुसरीकडे मुंबईसारख्या ३५ ते ४० अंशांदरम्यान तापमान राहणाऱ्या, समुद्रकिनाऱ्यावरील महानगरालाही यंदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाची ही स्थिती असल्याने एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंतचा कालावधी आबालवृद्धांसाठी सत्त्वपरीक्षा पाहणारा असेल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे तापमानात भर पडत असल्याने पर्यावरणावरही दूरगामी परिणाम होणार, हे स्पष्ट आहे. त्यावर उपाययोजनांसाठी उशीर झाला असला, तरी काही गोष्टी प्राधान्याने करण्याची गरज या क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत. सिंचन सुविधांच्या अभावामुळे भारतातील शेती आजही प्रामुख्याने मान्सूनच्या भरवशावर आहे. अशा स्थितीत उन्हाचे वाढते दिवस, उष्णतेच्या लाटा, अवकाळी आणि अतिपाऊस यांमुळे शेतीपुढे नवी संकटे उभी राहिली आहेत. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या या आपत्तींना माणसाने ओलांडलेल्या मर्यादा हेच कारण आहे. त्यावर तात्कालिक उपचारांची तर आवश्यकता आहेच. पण, सुनियोजित, दीर्घकालीन आणि प्रभावी उपायही तातडीने हाती घ्यावे लागतील. भारतासाठी २०२४ ठरले ‘ताप’दायक… – ३७ : शहरांचे तापमान या वर्षीच्या उन्हाळ्यात ४५ अंशांपेक्षा जास्त होते. – ३०० : दिवस या वर्षात असह्य उष्णता निर्देशांकानुसार ‘तप्त’ होते. – ४८ हजार : लोकांची झाली उष्माघाताचे संशयित रुग्ण म्हणून नोंद. – २,०७४ : लोक मार्च ते जुलै दरम्यान देशात झाले उष्माघाताने बाधित. – ७६९ : लोकांना महाराष्ट्रात या कालावधीत बसला उष्माघाताचा फटका. – १६१ : जणांचा मार्च ते जुलै दरम्यान देशभरात उष्माघाताने झाला मृत्यू. स्त्रोत : इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज-आयपीसीसी, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि अन्य संस्थांचे अहवाल. वसुंधरेची ‘तप्त’पदी… – तापमान ०.५ अंश वाढण्यास १७५ वर्षे लागली, पण गेल्या २४ वर्षांत १.५ अंशांनी वाढले. – या पावणेदोनशे वर्षांच्या काळातील २०१४ ते २०२४ हे ‘सर्वांत उष्ण दशक’ ठरले. – विशेषत: २०२३ हे या १७५ वर्षांतील ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ म्हणून नोंदवले गेले. – तापमानवाढ १.५ अंशांवर रोखण्याचे ध्येय, पण २०३० पर्यंतच २ अंशांवर जाण्याची भीती. – सागरी तापमान ०.६ अंशाने वाढले, परिणामी समुद्राच्या पातळीतही ४.७७ मिलीमीटरने वाढ झाली. – हवेतील आर्द्रतेत ४.९ टक्के वाढ; त्यामुळे अतिपाऊस, ढगफुटीच्या घटनाही वाढल्या. – कार्बनचे उत्सर्जन ५१ %, मिथेनचे १६२ %, नायट्रस ऑक्साइडचे २४ % वाढले. यामुळे होतेय तापमानवाढ… – सूर्यावरील विस्फोटांचे प्रमाण वाढले. – हरितगृह वायू उत्सर्जनात अपेक्षित घट नाही. – जंगलतोड, जलस्त्रोतांवर अतिक्रमण सुरूच. – अनिर्बंध नागरी आणि औद्योगिक प्रदूषण. – अनियंत्रित शहरीकरण, काँक्रिटीकरण. हे आहेत धोक्याचे संकेत… – वारंवार हिमवादळे येणे, हिमकडे कोसळणे. – प्रत्येक ऋतुबदलाच्या वेळी अवकाळी पाऊस. – पहाटेच्या वेळी ढगाळ वातावरण आणि पाऊस. – हिवाळ्यात अचानक थंडीचे प्रमाण वाढणे. – रात्रीचे सरासरी तापमान वाढणे. काय करावे? काय टाळावे? – दिवसातून किमान तीन लिटर पाणी प्या. – लिंबू सरबत, फळांचे ताजे रस, ओआरएस घ्या. – चहा, कॉफी, कृत्रिम शीतपेये, अतिथंड पाणी टाळा. – ताजा आहार घ्या; तळलेले पदार्थ, जंक फूड टाळा. – फिकट / पांढऱ्या रंगाचे, सैलसर, सुती कपडे वापरा. – उन्हाच्या वेळी स्वयंपाक टाळा, घरात हवा खेळती ठेवा. – उष्माघाताची लक्षणे जा‌णवल्यास लगेच डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्या. भविष्यात मोठ्या आपत्तीची चिन्हे; युद्धपातळीवर उपाययोजना हव्या तापमानाचा गेल्या १२१ वर्षांचा उच्चांक २०२५ मध्ये होईल, असा अंदाज आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने आधीच सर्वाधिक उष्ण ठरले आहेत. जागतिक हवामान बदलासोबतच आपल्याकडील शहरांमधील काँक्रिटीकरण, वाढते प्रदूषण, वृक्षतोड यामुळे तापमानवाढीची ही समस्या गंभीर बनली आहे. जगभरात स्थानिक वातावरणात होत असलेले असे बदल आणि जागतिक पातळीवरील अभ्यासावरून, भविष्यात मोठी नैसर्गिक आपत्ती येण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचे गंभीर परिणाम प्रामुख्याने आरोग्य, पर्यावरण, कृषी आणि आर्थिक क्षेत्रावर पडतील. त्यातूनच मग आजारांमध्ये वाढ, जलस्त्रोतांमध्ये घट, वनसंपदेचा ऱ्हास, अन्नसुरक्षेची समस्या, लोकांचे स्थलांतर आणि देशांच्या आर्थिक उत्पन्नात घट असे दीर्घकालीन परिणाम दिसू लागतील. यापासून बचावण्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रितपणे युद्धपातळीवर, नियोजनबद्ध उपाययोजना हाती घ्याव्या लागतील. – प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक वाढते तापमान आरोग्याला घातक, यंदा उष्माघाताचाही मोठा धोका अचानक वाढणारे तापमान आरोग्यासाठी घातक असते. या उष्म्याचे स्वास्थ्यावर काही तात्कालिक, तर काही दीर्घकालीन परिणाम होतात. उन्हामुळे त्वचेप्रमाणेच शरीराचे अंतर्गत तापमान वाढल्याने अनेक प्रक्रिया आणि पाचक रस अकार्यक्षम होऊ शकतात. अशावेळी मेंदूतील तापमान नियंत्रण केंद्र जागृत होऊन शरीर थंड ठेवण्यासाठी पेशी तसेच रक्तातील पाणी वापरले जाते आणि घाम तयार होतो. परिणामी शरीरातील पाणी कमी होऊन खूप तहान लागते. लघवीचे प्रमाण कमी होते. तिचा रंग पिवळा, नंतर लालसर होतो. रक्तदाब कमी होतो. डोके दुखते, डोळ्यांची आग होते. अंधारी येते, उलट्या होतात. रस्त्याच्या कामावरील मजूर, शेतात राबणारे शेतकरी – शेतमजूर, मैदानात खेळणारे खेळाडू अशांना उष्माघाताचा धोका असतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे तो यंदा अधिक वाढला आहे. अनेकदा उष्णतेचे विकार आणि उष्माघात जीवावर बेतू शकतात. त्यामुळे प्रत्येकानेच या काळात योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. – डॉ. अविनाश भोंडवे, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ शेती उत्पादनांवर होतोय परिणाम, वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करा तापमानामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांसाठी ही स्थिती आव्हानात्मक ठरली आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे गव्हाच्या दाण्यांची भरणी कमी होऊन उत्पादन घटते. हरभऱ्यावर फुलगळ आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन कमी होते. भाजीपाला पिकांची पाने करपणे, फळधारणेत अडथळा येण्यासोबतच गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अशा स्थितीत संभाव्य नुकसान टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे हवामान सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पीक संरक्षित करावे. त्यासोबत मल्चिंग, ठिबक सिंचन आणि जैविक ताण व्यवस्थापन तंत्राने बदलत्या तापमानाचा प्रभाव नियंत्रित करता येईल. या उपायांमुळे पिकांची वाढ सुधारेल आणि उत्पादनही टिकवता येईल. बदलत्या हवामानाशी जुळवून घेत, वैज्ञानिक पद्धती अवलंबल्यास शेतकरी आपल्या उत्पादनात स्थिरता राखू शकतील. – डॉ. श्रद्धा बगाडे, कृषी हवामानशास्त्रज्ञ, म. फुले कृषी विद्यापीठ



Source link