
सध्या सगळीकडं ‘एआय’ची चर्चा आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळं आपलं जगणं अधिक सोपं, वेगवान आणि समृद्ध होऊ शकतं. त्यासाठी ते कुशलतेने आणि जबाबदारीने हाताळता आलं पाहिजे. ‘एआय’मुळे विविध क्षेत्रांत घडणारे बदल समजावून सांगतानाच, त्याचे रोजच्या जगण्यातील फायदे उलगडणारे आणि संभाव्य धोक्यांविषयी सावध करणारे हे पाक्षिक सदर… आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा परवलीचा शब्द झाला आहे. अवघ्या एका वर्षात चॅट जीपीटी आणि त्यासारख्या ‘एआय’ आधारित अनेक टूल्सनी सगळ्याच क्षेत्रांमध्ये अफाट बदल घडवायला सुरूवात केली आहे. मग ते वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्र असो किंवा शेती, उद्योग क्षेत्र असो; ‘एआय’ची जादू सगळीकडे दिसून येत आहे. संगणक प्रणाली किंवा मशीनला माणसासारखी विचारशक्ती, शिकण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करणारी एक आधुनिक तंत्रज्ञानप्रणाली म्हणजे ‘एआय’. माणूस जसा अनुभवातून शिकतो, तसे ‘एआय’सुद्धा माहिती आणि डेटाच्या आधारे शिकतो आणि सतत सुधारणा करत जातो.
दहा वर्षांत वेगाने विकसन : संगणकांनी माणसासारखं विचार करावा, यावर १९५० च्या दशकात संशोधन सुरू झालं आणि त्याचवेळी ‘एआय’चे बीज रोवले गेले. अलीकडच्या काळात मशिन लर्निंग (ML), डीप लर्निंग (DL) आणि बिग डेटा यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांमुळे ‘एआय’चे वेगाने विकसन झाले. आता ‘एआय’ फक्त आकडेमोड किंवा माहिती प्रक्रिया न करता शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता बाळगतो. ‘एआय’च्या विकासाची ही वाटचाल काही दशकांपासून सुरू असली, तरी गेल्या १० वर्षांत त्याने झपाट्याने प्रगती केली. मोठ्या प्रमाणातील डेटा (Big Data), संगणकांची वाढती क्षमता आणि अल्गोरिदममधील सुधारणांमुळे त्याने वेग घेतला आहे. गुगलचे सर्च इंजिन, अॅमेझॉनची शिफारस प्रणाली आणि सिरी किंवा अॅलेक्सा यांसारखे व्हाइस असिस्टंट ही ‘एआय’च्या यशाची काही सोपी आणि वास्तविक उदाहरणे आहेत. ऑनलाइन शॉपिंग ते अभ्यासक्रम : एखादी वस्तू विकत घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी लागणारा वेळ आठवला, तर त्यामध्ये आणि ‘एआय’आधारित ई कॉमर्स मोबाइल ॲपमध्ये जमीन-अस्मानाचा फरक दिसतो. आता ‘एआय’च्या मदतीने गंभीर आजारांचे निदान अधिक अचूकपणे करता येते. रूग्णांच्या वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण करून उपचार सुचवले जातात. दुसरीकडे, नव्या औषधांच्या संशोधनालाही वेग आला आहे. वैयक्तिक शिकवणी (Personalized Learning) देणे, ऑनलाइन अभ्यासक्रम सुधारणे आणि विद्यार्थी-शिक्षक संवाद वाढवणे यांसाठीही ‘एआय’ मदत करते. त्याशिवाय; स्वयंचलित कार, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि स्मार्ट सिटी यांसारख्या प्रकल्पांमध्येही ‘एआय’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याला तुमच्याविषयी सगळं माहितीय..! भारतीय माणूस दिवसातील सरासरी ७ तास ४२ मिनिटे मोबाइलवर घालवतो. त्यामुळे आता ‘एआय’ला तुमचा दिनक्रम, स्वभाव, वागणे, संवाद (आणि विसंवाद), कार्यपद्धती यातील मथितार्थ माहीत आहे. एका मोबाइल ॲपवरून तुम्ही विमानाचे पुणे ते बेंगळुरु तिकीट काढले, तर तुम्ही बेंगळुरुला किती दिवसांच्या अंतराने आणि कोणत्या कामासाठी जाता? कोणत्या ठिकाणी / परिसरात राहता? काय खाता-पिता? असा सगळा व्यक्तिगत ‘बिग डेटा’ त्याला माहीत असतो. आज ‘एआय’ ही फक्त एक वैज्ञानिक संकल्पना न राहता प्रत्यक्षात उपयोगात येणारे साधन बनले आहे. या नवतंत्रज्ञानामुळे आपल्याला ‘न भूतो’ अशी परिस्थिती अनुभवायला येत आहे. ‘एआय’ हे केवळ वर्तमानात थांबणारे तंत्रज्ञान नाही, तर त्याचा भविष्यातील प्रभावही अमर्याद आहे. त्याचवेळी या प्रगतीबरोबरच काही आव्हानेही उभी आहेत. गोपनीयता आणि सुरक्षिततेसंबंधी चिंता, मानवी नोकऱ्यांवरील परिणाम आणि डीपफेक तंत्रज्ञानासह ‘एआय’चा गैरवापर आदी गोष्टींवर तत्परतेने योग्य तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. एकूणच, या तंत्रज्ञानाची धास्ती घेण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती केली पाहिजे. त्याच्याशी गट्टी जमली की मोबाइल वापरू शकणाऱ्या प्रत्येकाला हे तंत्रज्ञान आणि वापरायला सोपी अशी अगणित ‘एआय’ टूल्स हाताच्या बोटांवर खेळवता येतील! चला तर मग, आपापले सीट बेल्ट घट्ट करा, आपल्या मेंदूतील ‘न्यूरल नेटवर्क’ पकडून ठेवा… घाबरून न जाता, आत्मविश्वासाने आणि एकमेकांच्या साथीने ‘एआय’च्या या नव्या, जादुई विश्वाची सफर करूया! (संपर्कः amey@aconsultancy.marketing)
Source link