Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रवेब वॉच: 'मिसेस' हे ‘ती’च्या विदारक मनोवस्थेचे चकाचक रूप

वेब वॉच: ‘मिसेस’ हे ‘ती’च्या विदारक मनोवस्थेचे चकाचक रूप

वेब वॉच:  ‘मिसेस’ हे ‘ती’च्या विदारक मनोवस्थेचे चकाचक रूप

[ad_1]

सुहास किर्लोस्कर3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ज्यो बेबी लिखित-दिग्दर्शित ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळी सिनेमाचा हिंदी रिमेक असलेला ‘मिसेस’ अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. २०२१ मध्ये मूळ मल्याळी सिनेमा ‘प्राइम’वर आला होता, तर त्याचा रिमेक ‘झी फाइव्ह’वर प्रदर्शित झाला आहे. अर्थात, या दोन्हींचा विषय सारखाच असला, तरी त्यांच्या कथानकात आणि त्याच्या सादरीकरणात कमालीचे अंतर आहे. त्यामुळे ‘द ग्रेट इंडियन किचन’प्रमाणे ‘मिसेस’च्या नायिकेची मनोवस्था प्रेक्षकांना भिडत नाही.

मूळ मल्याळी सिनेमातून स्वयंपाकघरात तासनतास राबणाऱ्या स्त्रियांची कुचंबणा दाखवली होती. त्या कथेच्या केंद्रस्थानी कुटुंबातील नवविवाहिता होती. व्हरांड्यात आरामखुर्चीवर वृत्तपत्र वाचत बसलेल्या सासऱ्याला टूथब्रश हातात आणून द्यावा लागणे, डायनिंग टेबलवर ताट मांडल्यावर पानात वाढल्याशिवाय न खाणारा सासरा आणि नवरा बघितल्यावर तिला आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना येते.

मल्याळी सिनेमात संवाद खूप मोजके आहेत. इतके की आपल्याला नायिकेचे नावही समजत नाही. तिच्या रोजच्या कामातून कथानक उलगडत जाते आणि एका नृत्यकुशल, हुशार स्त्रीची स्वयंपाकघर आणि रोजच्या कामात कशी कुचंबणा होत आहे, हे लक्षात येते. कथानक पुढे सरकताना, सबरीमला आंदोलन, अय्यप्पा मंदिर आणि त्या अनुषंगिक परंपरा यांचा उल्लेख येत राहतो; पण ठोस विधाने, चटपटीत संवाद नसतानाही आपल्याला तिथल्या वास्तवाचे गांभीर्य समजते.

निमिषा सजयन आणि सूरज वेंजरामोड्डू यांच्या नैसर्गिक अभिनयाने रोजचे प्रसंग जिवंत होतात. निमिषाच्या मनातले द्वंद्व, होणारी फरपट तिच्या कृतीतून आणि चेहऱ्यावरून जाणवत राहते. हिंदीमध्ये ‘मिसेस’ नावाने या सिनेमाचा रिमेक तयार करताना लेखक हरमन बावेजा आणि अनुसिंग चौधरी यांनी नवरा व सासरा या दोघांना डॉक्टर बनवले आहे.

मूळ सिनेमात सासरा कर्मठ होता. हिंदीमध्ये त्याला डॉक्टर दाखवून लेखकाने नेमके काय साध्य केले आहे, कळत नाही. नववधूला मासिक पाळीच्या दिवसांत ‘बाहेर बसण्याची’ प्रथा या डॉक्टरांच्या घरातही पाळावी लागते, हे जरा विचित्र वाटते. मल्याळीमध्ये नायिकेला सतत स्वयंपाकघरात बघून प्रेक्षकांना काहीसा उबग येतो.

पण हिंदीमध्ये मात्र, डिझायनर ड्रेस घालणारी सुंदर नायिका सासूकडून अनेक उत्तमोत्तम पदार्थ शिकून घेताना अशाप्रकारे दाखवली आहे की, नायिका आणि प्रेक्षकही स्वयंपाक बनवण्याची प्रक्रिया बघण्याचाच आनंद घेतात. स्वयंपाकघरात रोज दिवसभर काम करणाऱ्या नायिकेला उत्तमोत्तम ड्रेस परिधान करुन इतके सजवले आहे की, अशा उत्तम दृश्यांमुळे तिला होणारा मनःस्ताप प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही.

‘मिसेस’मधील नायिका नृत्याचा रियाज करण्याऐवजी नृत्य करताना दिसते. ती भरतनाट्यम किंवा कथक न शिकता बॉलिवूड डान्स करते. मल्याळी सिनेमाच्या सुरूवातीला नायिका नृत्याचा रियाज करताना दिसते. त्यातून तिचा नृत्याचा ध्यास जाणवतो. पण, हिंदीत सिनेमाची सुरूवातच नायिकेच्या बॉलीवूडछाप नृत्याने होते.

मूळ सिनेमा एकूणच केरळची संस्कृती, तिथले निसर्गसौंदर्य, स्थानिक लोकांची मानसिकता निर्भीडपणे दाखवतो. ‘मिसेस’मध्ये तो आणि ती नेमके कोणत्या राज्याचे आहेत, हे कळत नाही. सासरच्या लोकांची जुनाट मते दाखवताना कोणत्याही संस्कृतीवर भाष्य वा टीका करणे हेतुपूर्वक टाळले आहे. त्यामुळे हिंदी सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक इतके कडेकडेने का पोहतात, हा प्रश्न पडतो.

मूळ सिनेमात सलू थॉमस कॅमेरा यांचा बोलतो. नायिका सर्वांच्या पानातले खरकटे काढत असल्याचे बघताना आपल्याला अस्वस्थ वाटत असेल, तर आपल्या घरातल्या स्त्रिया रोज हेच काम कसे करत असतील, असा विचार प्रेक्षकांच्या मनात येतो. बेडरूममध्येही स्त्रीला स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, नकाराधिकार वापरता येत नाही, हे दृश्य मूळ मल्याळी सिनेमामध्ये जितके प्रभावी झाले आहे, तितके हिंदी रिमेकमध्ये ते मनाला भिडत नाही.

‘मिसेस’च्या शेवटी नायिका नवऱ्याच्या कारची किल्ली घेऊन घर सोडते, तेव्हा आतमध्ये सासऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते. ती कार स्वत: चालवत माहेरी जाते आणि लगेच बॉलीवूडछाप नृत्य करते. ते नृत्य होताच तिला उदंड प्रतिसाद मिळतो. मूळ मल्याळी सिनेमाच्या शेवटी नायिकेच्या घरात पुरुषप्रधान कर्मकांड सुरू असते. ती घर सोडून रस्त्याने तडफेने चालू लागते, त्यावेळी पार्श्वभूमीवर घरातल्या बायका रोजची कामे करताना दिसतात. मुली घरकाम करताना आणि मुलं खेळताना दिसतात. काही स्त्रिया मंदिरात प्रवेश न मिळणे आणि रीतीरिवाज पाळण्याविरुद्ध निषेध करताना दिसतात. कालांतराने ती नृत्यामध्ये करिअर करताना जे नृत्य-नाट्य सादर होते, तेसुद्धा अर्थपूर्ण आहे.

एकूणच, मूळ मल्याळी सिनेमा आणि त्याच्या हिंदी रिमेकमधील फरक जाणवण्यासारखा आहे. ‘मिसेस’ची नायिका सान्या मल्होत्राचा अभिनय उत्तम आहे. पण, दिग्दर्शकाने तिची व्यक्तिरेखा उजळवून दाखवण्याचा अनावश्यक प्रयत्न केल्याने सिनेमा अपेक्षित परिणाम साधत नाही. प्रतीक उत्पल यांचे कलादिग्दर्शन सिनेमा सुंदर आणि प्रेक्षणीय करण्यावर भर देते, जे या विषयाला अजिबात अनुरूप नाही. हिंदीवाले सिनेमा चकाचक करण्यावर भर देतात. त्या उलट मल्याळी दिग्दर्शक कथेचा विषय प्रभावीपणे पोहोचवण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे मल्याळी सिनेमे आशयघन ठरतात आणि त्यांचे हिंदी रिमेक केवळ प्रेक्षणीय होतात.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments