Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर बंगल्यावर  आयकर विभागाचा छापा; राजकीय हालचालींची चर्चा तीव्र

फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर बंगल्यावर  आयकर विभागाचा छापा; राजकीय हालचालींची चर्चा तीव्र

फलटण: विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. पुणे, मुंबई आणि गोविंद डेअरीवरही छापेमारी करण्यात आली असून ही कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.

संजीवराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्याच्या तयारीत असताना ही कारवाई झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासूनच त्यांच्यावर चौकशी सुरू असून घरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानीही केंद्रीय तपास यंत्रणांनी छापा टाकला आहे. मात्र, या कारवाईचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राजकीय दबाव की नियमांची अंमलबजावणी?
संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली असल्यामुळे राजकीय दबाव असल्याचा अंदाज लावला जात आहे. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “आमच्या घराण्याने देशाला लाखो रुपये कर स्वरूपात दिले आहेत. आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही, त्यामुळे यामुळं काही नुकसान होणार नाही.”

रामराजेंची कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन
या छाप्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरून “कृपया गर्दी करू नका; खात्याला काम करू द्या, काळजी नसावी,” असा संदेश देत शांत राहण्याचे आवाहन केले.

तालुक्यातून निषेधाचे सूर
या कारवाईचा निषेध करत आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले, “गेल्या तीन पिढ्यांपासून निंबाळकर कुटुंब राजकारणात कार्यरत आहे. त्यांच्या राजकीय जीवनावर कधीही डाग लागलेला नाही. त्यामुळे अशा कारवाया अपेक्षित नाहीत. मात्र, ही कारवाई राजकीय आहे की नाही, याबाबत काही सांगता येणार नाही.”

ही कारवाई नेमकी कोणत्या संदर्भात झाली आहे आणि त्याचे पुढील परिणाम काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments