Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रआदरांजली: महान समाजसाधक

आदरांजली: महान समाजसाधक

आदरांजली:  महान समाजसाधक

[ad_1]

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या कार्याविषयी ह. भ. प. श्री. धुंडा महाराज देगलूरकर यांना माहिती देताना ह. भ. प. श्री. किसन महाराज साखरे आणि प्रस्तुत लेखाचे लेखक डॉ. वि. दा. कराड.

ह. भ. प. किसन महाराज साखरे हे एका अर्थाने ज्ञानविज्ञानस्वरूप वेदब्रह्मऋषीचे मूर्तिमंत स्वरुप होते. वारकरी संप्रदायातील योगदानाप्रमाणेच श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकासासाठी त्यांनी केलेले कार्य त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचिती देणारे आहे. त्यांच्या निर्वाणामुळे, भक्तिसाधनेसोबतच सद्कार्याच्या सिद्धीची दुर्मिळ दृष्टी लाभलेल्या एका महान समाजसाधकाला आपण मुकलो आहोत.

माझे परमस्नेही श्रीकृष्ण भिडे हे आमच्या पूना इंजिनिअरिंग कॉलेजच्या वर्कशॉप विभागाचे प्रमुख असताना तिथे एकदा ह. भ. प. श्री. किसन महाराज साखरे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी योगायोगाने माझी आणि महाराजांची पहिली भेट झाली. पुढे संपर्क वाढत गेला, स्नेहबंध जुळत गेले. माझ्या पूज्य भगिनी प्रयागअक्कांची साखरे महाराजांवर खूप श्रद्धा होती. त्या अनेक वर्षापासून आळंदी-पंढरपूर या ठिकाणी त्यांची कीर्तने-प्रवचने न चुकता ऐकत. त्यामुळे साखरे घराण्याशी आमचे निकटचे संबंध प्रस्थापित झाले. याच दरम्यान, इंद्रायणीकाठचा परिसर स्वच्छ – सुंदर करण्याची आणि तिथे छोटासा का होईना, एक घाट बांधण्याची माझ्या मनातील संकल्पना साखरे महाराजांना बोलून दाखवली. त्यावर ते म्हणाले, “माझ्याही मनात अनेक वर्षापासून हा विचार घोळतो आहे. मलाही वारकरी भाविकांच्या स्नानासाठी आणि तीर्थ म्हणून स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची तीव्र इच्छा आहे. आपण सर्वांनी मिळून काहीतरी करुया.”

पुढे २८ नोव्हेंबर १९८६ या दिवशी मला आळंदीत महापुजेला जाण्याचा योग आला. महापूजेनंतर सर्व भक्तमंडळी आणि प्रमुख वारकरी चहापानासाठी एकत्र आले. त्या दिवशी राज्याच्या सहकार खात्याचे तत्कालीन आयुक्त श्री. श्रीवास्तव, साखरे महाराज, शंकरबापू आपेगावकर, माझे बंधू तुळशीराम कराड, भगिनी पूज्य प्रयागअक्का, आळंदी संस्थानचे बाळ ज. पंडित, प्रा. नूलकर, प्रा. प्र. ल. गावडे, आळंदीचे तत्कालीन नगराध्यक्ष दत्तोबा कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. श्री. श्रीवास्तव मला म्हणाले की, तुम्ही नेहमी आळंदी- देहूतील इंद्रायणीच्या परिसर विकासाची आणि घाटबांधणीची संकल्पना बोलून दाखवता. खरोखरच तुम्हाला काही कार्य उभारायचे असेल, तर आळंदी-देहू परिसर विकास कार्यासाठी एखादी समिती वा विश्वस्त मंडळ का स्थापन करीत नाही? असा एखादा ट्रस्ट वा समिती स्थापन केल्याशिवाय या प्रकारचे सामुदायिक कार्य उभे राहू शकणार नाही. आपण पुढाकार घेऊन या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी. ही सूचना ऐकताच मी म्हणालो की, या कार्यासाठी समिती स्थापण्याची संकल्पना मला मान्य आहे. मात्र, तिचे अध्यक्ष ह. भ. प. श्री. किसन महाराज साखरे असतील आणि ह. भ. प. श्री. शंकरबापू आपेगावकर हे प्रमुख विश्वस्त असतील. मी प्रमुख कार्यवाह वा कार्याध्यक्ष म्हणून काम करायला तयार आहे. या प्रस्तावाला सर्वांनी सहमती दर्शवली आणि तिथेच अनेकांनी देणगीही दिली. अवघ्या तासाभरातच सुमारे १ लाख ११ हजार रुपयांचा निधी जमा झाला.

श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती गठीत झाली आणि तिच्या कार्याला गती येऊ लागली. २ ऑक्टोबर १९८७ ला विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ झाला. पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रण या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन ही पवित्र तीर्थस्थाने स्वच्छ, सुंदर, सुशोभित करण्याचे काम सुरू झाले. हे कार्य मोठे असल्याने खर्चाचेही नियोजन करावे लागणार होते. त्यासाठी लोकांकडे जाऊन वर्गणी गोळा करताना साखरे महाराज आमच्यासोबत आवर्जून यायचे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही ते पहाटे चार – पाचपासून हजर असायचे. राबणाऱ्या कारागीर, मजुरांना काही अडचण येणार नाही, त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होणार नाही, याकडे स्वत: लक्ष पुरवायचे. काम करणाऱ्यांना सतत प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे आळंदी-देहूतील विकासकामांनी गती घेतली. आळंदीतील प्रदक्षिणा मार्ग, पालखी मार्ग, दर्शनबारी मार्ग सुयोग्यपणे बांधण्यात आला. इंद्रायणीत सोडले जाणारे सांडपाणी बाहेरच अडवून शेतीकडे वळवण्यात आले. नदीच्या दोन्ही तीरांवर मजबूत आणि सुंदर घाट बांधण्यात आले. त्यामुळे भाविकांसाठी स्नानाची चांगली व्यवस्था होऊ शकली. देहू येथेही सुंदर प्रवेशद्वार आणि आखीव-रेखीव घाट उभा राहत आहे. ज्ञानविज्ञानाची सांगड घालत या कामांमध्ये मी कल्पकता आणत होतो, पण त्यामागे असलेला साखरे महाराजांचा विश्वास खूप मोलाचा होता. आज या तीर्थस्थानांचा जो चेहरामोहरा बदललेला दिसतो, त्यामागे सदैव त्यांचीच प्रेरणा होती.

साखरे महाराज हे एका अर्थाने ज्ञानविज्ञानस्वरूप वेदब्रह्मऋषीचे मूर्तिमंत स्वरुप होते. त्यांची विद्वत्ता, वेदाभ्यास पाहून वाराणशीतील विद्वतसभेनेही त्यांचा सन्मान केला होता. त्यांचे ज्ञानेश्वरीवरील प्रभुत्व, व्रतस्थ जीवन, आषाढी वारीच्या वेळी उपवास करून पायी चालण्याचा प्रघात, कुठलीही पदवी प्राप्त केलेली नसताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पीएच. डी. चे गाइड असणं अशा अनेक गोष्टींमुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर होता. त्यांच्यासारख्या विभूतींना जीवनाचा खरा अर्थ कळलेला असतो. वारकरी संप्रदायातील योगदानाप्रमाणेच श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकासासाठी साखरे महाराजांनी केलेले कार्य त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचिती देणारे आहे. त्यांच्या निर्वाणामुळे, भक्तिसाधनेसोबतच सद्कार्याच्या सिद्धीची दुर्मिळ दृष्टी लाभलेल्या महान समाजसाधकाला आपण मुकलो आहोत. त्यांना विनम्र आदरांजली!

(संपर्कः vdkarad@mitpune.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments