रसिक स्पेशल: फिनफ्लुएन्सर्सचे मायाजाल

0
14
रसिक स्पेशल:  फिनफ्लुएन्सर्सचे मायाजाल


भूषण महाजन1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

‘सेबी’ने अलीकडेच ‘बाप ऑफ चार्ट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘फिनफ्लुएन्सर’ला कथित बेकायदेशीर मार्गाने गोळा केलेले १७ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेश दिले. शिवाय, बेकायदा कृत्यासाठी दंड का करू नये? अशी नोटीसही दिली. या घटनेने शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांच्या विश्वात खळबळ तर उडालीच; पण ‘फिनफ्लुएन्सर’ची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

कोरोना महामारीनंतर आपल्या जगण्याशी आणि रोजच्या व्यवहाराशी संबंधित अनेक गोष्टी बदलल्या. प्रत्यक्षातील गाठीभेटींऐवजी आभासी भेटी सुरू झाल्या. झूम, गुगल आणि तत्सम मीटिंग लोकप्रिय झाल्या. त्याप्रमाणेच यूट्यूबच्या युगाचीही सुरूवात झाली. डेटा स्वस्त झाला, घराघरात आणि प्रत्येक हातात स्मार्ट फोन आले. समाजाच्या सर्व थरांमध्ये ज्ञान – माहिती – मनोरंजनाची गंगा वाहू लागली. याच दरम्यान शेअर बाजार कोसळले आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू झाले. उर्वरित जगाच्या मानाने भारतीय अर्थव्यवस्था बरीच स्थिर होती. परदेशात स्वस्त झालेला पैसा भरभरून भारतात आला. बाजार खाली आल्याने ब्लू-चिप शेअर्स अत्यंत आकर्षक भावाला आले होतेच, मागणी वाढल्यामुळे ते वर जाऊ लागले.

याच दरम्यान ‘घरी राहून काम’ करण्याची (Work from Home) पद्धत रुढ झाली आणि कमावती मंडळी घरातून काम करु लागली. अशातच आधी उत्सुकतेतून आणि नंतर छोट्या ट्रेडमध्ये मिळालेल्या पैशांमुळे शेअर बाजाराचे आकर्षण वाढू लागले. कॉलेजमध्ये जाणारी मुले घरीच होती. ती आधीच तंत्रस्नेही असल्याने शेअर बाजाराचा मोह आणि झटपट श्रीमंत होण्याचा नाद वाढला. त्यामुळे यूट्यूबवर अर्थविषयक शिक्षण देणारी मंडळी वाढली. त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून (Likes किंवा Hits) किंवा फॉलोअर / सबस्क्रायबरच्या संख्येवरून त्यांची लोकप्रियता ठरत होती.

जितके अधिक सबस्क्रायबर तितका तो ‘तज्ज्ञ’ शिक्षक असे मानून आभासी विश्वातील अशा गुरुजींची आणि त्यांच्या भक्तांची संख्या वाढायची. ही गर्दी वाढेल तशी अधिक लाभाच्या अपेक्षेने अशा प्रकारच्या संवादकांच्या आणि त्यांच्या सबस्क्रायबरच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत गेली. पुढे या प्रकारे आभासी माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय ठरणाऱ्या आर्थिक विषयातील संवादकांना ‘फिनफ्लुएन्सर’ असे संबोधले जाऊ लागले.

यामध्ये चांगला अभ्यास असलेले, तळमळीने अर्थविषयक जागृती करणारे तज्ज्ञ जसे होते, तसे निरागस आणि भाबड्या लोकांचा विश्वास कमावून त्याचा फायदा घेणारे ‘स्वयंघोषित तज्ज्ञ’ही होते. त्यातूनच शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने एक नवा फंडा सुरू झाला. गुंतवणूकदारांचा विश्वास मिळण्यासाठी उच्च परताव्याचा दावा केला जाऊ लागला. उदाहरणार्थ, तुमचे पैसे दुप्पट, चौपट, अनेक पट करा, त्यासाठी आमच्या वर्कशॉपमध्ये प्रवेश घ्या. किरकोळ फी भरून लक्षाधीश अथवा कोट्यधीश व्हा वगैरे वगैरे…

असे शिक्षण घेण्याच्या निमित्ताने भोळाभाबडा पण झटपट पैसे मिळवण्यासाठी उतावीळ झालेला गुंतवणूकदार जाळ्यात आला की, त्याला आपल्या व्हाट्स अॅप किंवा टेलिग्राम समूहाचे सदस्य करून पैसे काही पटीने वाढण्याची टीप देतो म्हणून सांगायचे. कित्येकदा गुंतवणूकदाराला शेअर्स विकत घ्यायला सांगण्याआधी स्वत:च ते शेअर विकत घ्यायचे आणि मोठ्या संख्येने शेअरची मागणी वाढली की, जवळचे शेअर विकून टाकायचे… असाच दावा करत ‘चार्ट का बाप’ने किमान १७ कोटींचा नफा मिळवल्याचा आरोप आहे.

दुसरी पद्धत म्हणजे, निम्म्या लोकांना एकच शेअर विकत घ्यायला सांगायचे आणि उरलेल्यांना तोच शेअर विकायला सांगायचे. यात कुणाला तरी पैसे मिळणारच. मधल्या मध्ये हा फिनफ्लुएन्सर मात्र स्वत:चे साम्राज्य वाढवतो. आणखी एक प्रकार म्हणजे, टीव्हीवरील लोकप्रियतेचा फायदा घेऊन, ‘आज घ्या, उद्या विका’ योजनेखाली सामान्य गुंतवणूकदारांना कुठला तरी शेअर घ्यायला सांगायचे. त्या आधीच आपले बगलबच्चे तो शेअर विकत घेतील, हे बघायचे. दुसऱ्या दिवशी सामान्य गुंतवणूकदार विकत घ्यायला आले की, आपल्या खिशातले हे शेअर्स त्यांच्या गळ्यात मारायचे आणि स्वत:चे उखळ पांढरे करायचे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाने असे गैरमार्ग अवलंबणाऱ्या किंवा अवास्तव प्रलोभने दाखवणाऱ्या फिनफ्लुएन्सर्सच्या मायाजालापासून सावध राहिले पाहिजे. आपली गुंतवणूक केवळ अधिक लाभदायी होण्याकडे नव्हे, तर ती तितकीच सुरक्षितही असेल, याकडे लक्ष द्यायला हवे.

‘सेबी’कडे नोंदणी आवश्यक

– ‘सेबी’ने गैरमार्गाने पैसे मिळवणाऱ्यांना शेअर बाजारात भाग घेण्यास मनाई केली आहे.

– आर्थिक शिक्षण देण्यास हरकत नसली, तरी त्या व्यक्तीची ‘सेबी’कडे नोंदणी हवी.

– सदर व्यक्तीने गुंतवणूकदाराला कुठलेही अवाजवी प्रलोभन (उदा. आमचा शिक्षणक्रम केल्यास करोडपती व्हाल / आमच्या समूहाचे सदस्य झाल्यास तुम्हाला टीप देऊ / अमुक शेअर दोन वर्षांत पाचपट होणार आहे.) दाखवू नये.

सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे?

– केवळ झटपट पैसे मिळवण्याचा मोह आणि स्वत:ला त्यातले ज्ञान नसणे ही दोन कारणे अशा फसवणुकीमागे असल्याचे ‘सेबी’चे म्हणणे आहे. मग अशा वेळी सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे?

– शेअर बाजार हा जुगार किंवा जादू नव्हे. त्यामुळे कोणत्याही अवास्तव प्रलोभनांवर विश्वास ठेऊ नये.

– जो माणूस आपले पैसे वर्षभरात दुप्पट करू शकतो, त्याला आपली गरजच काय? तो स्वत:चे पैसे काही पटींनी का वाढवत नाही, हा साधा विचार करावा.

– शेअरची किंमत त्या कंपनीच्या कामगिरीवर आणि तिच्या भविष्यावर अवलंबून असते. अपेक्षेप्रमाणे घडले नाही तर तोटाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवावे.

– दीर्घकालीन फायद्यासाठी संबंधित कंपनीचे व्यवस्थापन चोख आणि कामकाज उत्तम हवे. तसे असेल तर थोडा संयम आणि वाजवी अपेक्षा ठेवल्यास दीर्घकाळात भांडवलात नक्की वाढ होते.

– शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीत धोका वाटत असल्यास म्युचुअल फंडाला प्राधान्य द्यावे. संपत्ती निर्मितीचा तो राजमार्ग आहे.

(संपर्कः kreatwealth@gmail.com)



Source link