Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण-कोरेगावमध्ये परिवर्तनाची लाटः प्रा. रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ ऐतिहासिक जाहीर सभा"

फलटण-कोरेगावमध्ये परिवर्तनाची लाटः प्रा. रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ ऐतिहासिक जाहीर सभा”

फलटण :- फलटण विधानसभेतील परिवर्तन समर्थक उमेदवार प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रचारार्थ फलटण येथे 17 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. परिवर्तन महाशक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ही सभा स्थानिक मतदारांमध्ये नव्या आशा निर्माण करणारी ठरणार आहे.

यावेळी बोलताना प्रा. रमेश आढाव म्हणाले, “फलटण-कोरेगाव मतदारसंघात फिरताना आम्हाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात परिवर्तनाची मागणी आहे आणि हे परिवर्तन अटळ आहे. ही निवडणूक आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. आमच्या समाजाचे संख्याबळ असूनही आम्हाला दुर्लक्षित केले जात आहे. आता समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो असून हा विजय निश्चित आहे.”

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी या लढतीला कारखानदार विरुद्ध शेतकरी असे संबोधले. ते म्हणाले, “महाविकास व महायुतीचे उमेदवार कारखानदारांचे हित पाहणारे आहेत, तर प्रा. रमेश आढाव शेतकरी व समाजाच्या हितासाठी लढत आहेत.”

कामगार संघर्ष संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सनी काकडे म्हणाले, “फलटण-कोरेगाव मतदारसंघात 68 हजार बौद्ध मतदार आहेत. यापैकी 50 हजार आणि इतर परिवर्तन महाशक्तीचे मत मिळवून प्रा. रमेश आढाव विजयाची घोडदौड करणार आहेत. मतदारसंघाला शिक्षक, उद्योजक नको, तर समाजसेवक असलेले नेतृत्व हवे, ज्यामध्ये प्रा. आढाव हे दोन्ही उमेदवारांपेक्षा अधिक योग्य आहेत.”

सचिन अहिवळे म्हणाले, “ही लढाई आमच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची आहे. फलटण-कोरेगावला आम्ही तिसरा पर्याय म्हणून प्रा. रमेश आढाव यांना उभे केले आहे, आणि तेच विजयी होणार आहेत.”

कपिल काकडे म्हणाले, “गेल्या पंचवीस वर्षांपासून एकहाती सत्ताधारी असूनही फलटणमध्ये युवकांना रोजगार मिळत नाही. ग्रॅज्युएट झालेले तरुण गवंडी बिगाऱ्याचे काम करतात, या परिस्थितीत बदल होणे आवश्यक आहे. म्हणून जनतेने प्रा. रमेश आढाव यांना निवडून द्यावे.”

प्रा. रमेश आढाव यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा फलटण-कोरेगाव विधानसभेतील मतदारांसाठी परिवर्तनाची दिशा ठरावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. 17 नोव्हेंबर 2024 रोजी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिवर्तन महाशक्तीने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments