माझ्या हिश्श्याचे किस्से: कृष्णा जेव्हा पायी 6 मजले चढून गेल्या…

0
17
माझ्या हिश्श्याचे किस्से:  कृष्णा जेव्हा पायी 6 मजले चढून गेल्या…


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पती राज कपूर यांच्यासमवेत कृष्णा कपूर. (संग्रहित छायाचित्र). १ ऑक्टोबरला कृष्णा कपूर यांची सहावी पुण्यतिथी आहे. 

आज मी ज्यांच्याबद्दल लिहिणार आहे, त्यांना फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट यजमान, सर्वांत ग्रेसफुल आणि क्लासी लेडी ही पदवी मिळाली होती. पण, त्यांच्याबद्दल फार कमी लिहिले गेले आहे. ही अप्रतिम व्यक्ती म्हणजे कृष्णा आंटी अर्थात श्रीमती कृष्णा राज कपूर.

जरा विचार करा, कृष्णा आंटींचे सासरे पृथ्वीराज कपूर, दीर शम्मी कपूर आणि शशी कपूर. गीता बाली, नीला देवी आणि जेनिफर या जावा. रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, रितू नंदा, रीमा जैन ही मुले. बबिता आणि नीतू सिंग या सुना. करण कपूर, कुणाल कपूर, रणबीर कपूर हे नातू. करिश्मा कपूर, करीना कपूर, रिद्धिमा कपूर या नाती. अरमान जैन, आधार जैन असे आप्त… याशिवाय, अवघी फिल्म इंडस्ट्री त्यांच्या अवतीभवती होती. ज्या कृष्णा आंटींच्या कुटुंबात इतके स्टार होते आणि इंडस्ट्रीतील स्टारही ज्यांचा आदर करत असतील, तर त्यांचा मानमरातब कसा असेल? पण, तरीही कृष्णा आंटी खूप साध्या, डाऊन टू अर्थ होत्या. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीने त्यांच्यापुढे आदराने डोके टेकवायची, पण त्या मात्र तितक्याच साध्या, सरळ आणि प्रेमळ होत्या. मी खूप भाग्यवान आहे की मला त्यांचे अपार प्रेम मिळाले. त्या मला त्यांच्या कुटुंबातीलच एक समजत होत्या.

माझ्या आयुष्यात त्यांचे सर्वांत महत्त्वपूर्ण योगदान होते. लग्न झाल्यावर मी पत्नी हनानला पहिल्यांदाच परदेशात म्हणजे अमेरिकेत ‘आ अब लौट चले’च्या शूटिंगच्या वेळी घेऊन गेलो. सोबत कृष्णा आंटीही होत्या. माझी पत्नी एक महिना त्यांच्यासोबतच होती. ती त्यांच्या सहवासात राहिली. मी दिवसभर शूटिंगमध्ये गुंतलेलो असताना कृष्णा आंटी तिला बाहेर फिरायला, शॉपिंगला घेऊन जायच्या, नवी ठिकाणे दाखवायच्या. एकेदिवशी शूटिंगमधून मी मोकळा झाल्यावर त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला दोन-तीन तास ड्रायव्हिंग करून अटलांटिक सिटीमधील एका कॅसिनोमध्ये नेले. तिथे आम्हाला एक हजार डॉलर दिलेे आणि एन्जॉय करुन या, असे सांगितले. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की, त्या खूप मोठ्या मनाच्या आणि उमद्या स्वभावाच्या होत्या. त्यामुळे माझ्या पत्नीवर कृष्णा आंटींचा इतका प्रभाव पडला की, तिने त्यांना आपला आदर्श मानले. मीसुद्धा कृष्णा आंटींसारखी बनेन, लोक त्यांचा जसा आदर करतात, त्यांच्यावर प्रेम करतात, प्रशंसा करतात, त्याप्रमाणे लोकांनी आपलेही कौतुक करावे, प्रेम करावे, आदर करावा, असे तिला वाटायचे. माझी पत्नी पूर्णपणे कृष्णा आंटींसारखी बनू शकली नाही. पण, ती नक्कीच त्यांच्या खूप जवळ पोहोचली होती. म्हणतात ना, चांगल्या संगतीचा परिणाम होतो. तसा परिणाम माझ्या पत्नीवरही झाला. यावरुन मला फरहत एहसास यांचा एक शेर आठवतोय…

चांद भी हैरान

दरिया भी परेशानी में है,

अक्स किस का है कि

इतनी रोशनी पानी में है।।

१९९९ मध्ये माझी मुलगी अल्फियाचा जन्म झाला, तेव्हा कृष्णा आंटी तिला पाहायला माझ्या घरी आल्या होत्या.बिल्डिंगची लिफ्ट बिघडली होती. त्यामुळे त्या सहा मजले पायऱ्या चढून आल्या आणि घरात येऊन बसल्या. विचार करा, त्यावेळी त्या साधारण ७० वर्षांच्या होत्या. आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी मला पहिला फोन आला तो करिश्मा कपूरचा. तिने विचारले की, आजी तुमच्या घरी आली होती, ती कशी आली होती? त्यानंतर आणखीही काही लोकांचे मला फोन आले. सगळे एकच गोष्ट आश्चर्याने विचारत होते की, कृष्णा आंटी तुमच्या घरी कशा आल्या होत्या? तेव्हा मला समजले की, कृष्णा आंटी आपल्या कुटुंब आणि नातेवाईकांशिवाय कुणाच्याही घरी जात नसत. फक्त अनिल कपूरच्या आई, ज्या त्यांच्या घनिष्ट मैत्रीण होत्या, त्यांच्या घरी त्या जायच्या. म्हणून त्या माझ्या घरी कशा आल्या, याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते.

३० सप्टेंबर २०१८ ची ही गोष्ट आहे, जेव्हा ऋषी कपूर यांना स्वत:च्या कॅन्सरविषयी समजले होते. नीतूजी आणि रणबीर लगेच त्यांना अमेरिकेला घेऊन गेले. ३० सप्टेंबरला नीला आंटी म्हणजे श्रीमती शम्मी कपूर यांचा वाढदिवस होता. मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्या खूप दु:खी होत्या. ऋषी कपूर यांच्याविषयी ऐकून मलाही वेदना होत होत्या. मी म्हणालो, ‘नीला आंटी, मला चिंटूजींची काळजी वाटतेय, पण ईश्वराच्या कृपेने तिथल्या उपचारानंतर ते नक्की बरे होतील.’ मात्र, मला त्यावेळी सर्वांत जास्त काळजी वाटत होती, ती कृष्णा आंटींची. कारण त्यांना ही बातमी सहनच होणार नव्हती.

मी इतका बेचैन होतो की मला रात्रभर झोपही आली नाही. मला आठवतंय, रात्री अडीच-तीन वाजता मी आणि बोनी साहेब बोलत होतो. मी त्यांना म्हणालो की, मला कृष्णा आंटींची खूप चिंता वाटतेय, देवाने त्यांची काळजी घ्यावी. चिंटूजींच्या आजाराची बातमी त्यांनी मनावर घेऊ नये.. पण, नंतर तेच झाले ज्याची मला भीती होती. सकाळी उठल्यावर मला बातमी समजली की, ३० सप्टेंबरच्या उत्तररात्री म्हणजे १ ऑक्टोबरच्या पहाटे, जेव्हा मी आणि बोनी साहेब बोलत होतो, तेव्हा कृष्णा आंटी आम्हा सर्वांना सोडून गेल्या होत्या. आपले शब्द, सुखद आठवणी आणि आदर्श उदाहरण मागे ठेवून त्या गेल्या. मला खात्री आहे, ईश्वरानेही त्यांना स्वर्गात उच्च स्थान दिले असेल. आज त्यांच्या स्मरणार्थ “आप की कसम’मधील हे गाणे ऐका…

ज़िंदगी के सफ़र में

गुज़र जाते हैं जो मक़ाम

वो फिर नहीं आते,

वो फिर नहीं आते…

स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link