रसिक स्पेशल: राजकारणाचे ‘बदला’पूर

0
17
रसिक स्पेशल:  राजकारणाचे ‘बदला’पूर




प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलंच पाहिजे का? विरोधासाठी विरोध झालाच पाहिजे का? सरकार आणि विरोधक एखाद्या संवेदनशील गोष्टीसाठी एकत्र येऊ शकत नाहीत का? बदलापुरात चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निमित्ताने जनतेच्या मनात अशा अनेक प्रश्नांनी गर्दी केली आहे. कोलकात्यातल्या आर. जी. कार हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून झाल्याचे नऊ ऑगस्टच्या सकाळी उघडकीस आले आणि देशभर खळबळ उडाली. संतापजनक प्रकार असा की, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरही गुन्हा दाखल करण्यास आणि आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ केली जात होती. शेवटी १८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली. सुनावणीत हॉस्पिटल प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले. या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकार न्याय देण्याऐवजी सत्य दडपण्याचा, पुरावे नष्ट करण्याचा आणि बलात्कार करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप करत विरोधी पक्ष भाजपने देशभर रान उठवले. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जींनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी स्वत:च या घटनेविरोधात रॅली काढली. या प्रकरणाचे देशभर पडसाद सुरू आहेत, तोच मुंबईजवळच्या बदलापूरमधील एका शाळेत साडेतीन-चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी आली. यातीलही संतापजनक बाब म्हणजे, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या पालकांना तब्बल १२ तास बसवून ठेवले. त्यात एका पीडित मुलीची गरोदर माताही होती. मग हायकोर्टात या प्रकरणाची दखल घेण्यात आली. कोर्टाने या प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. या दरम्यान माजी महापौर आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी, ‘तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,’ अशा असभ्य भाषेत आपल्यावर आगपाखड केल्याचा आरोप एका महिला पत्रकाराने केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालवण्याचे निर्देश दिले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘एसआयटी’ चौकशीचे आदेश दिले. अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी मोठे आंदोलन केले. तब्बल आठ तास रेल्वे वाहतूक रोखण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. ‘सरकारने लाडकी बहीण योजना आणली, मात्र राज्यात बहीण कुठे सुरक्षित आहे? बदलापूर शहर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री तिकडे फिरकले नाहीत,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर, ‘भाजपचे लोकसभेचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात सरकारी वकील म्हणून झालेली नियुक्ती रद्द करावी,’ अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. दुसरीकडे, ‘बदलापूरच्या आंदोलनात इतर ठिकाणांहून गाड्या भरुन लोक आणण्यात आले होते. काही लोक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. या योजनेचा पोटशूळ हा या आंदोलनातून दिसला,’ असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर ‘फेक नरेटिव्ह’चे आरोप केले. ‘मुख्यमंत्री म्हणाले होते की, लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन महिन्यांत फाशी दिली. त्या फाशी दिलेल्या आरोपीचे नाव मुख्यमंत्र्यांनी घोषित करावे. तसेच बदलापूरच्या आंदोलनात बाहेरचे लोक होते, असेही त्यांनी सांगितले. पण, पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहेत,’ असे वडेट्टीवार म्हणाले. त्यावर, ‘मुख्यमंत्री शिंदे असे बोलले नसते, तर बरे झाले असते. माझी त्यांना विनंती आहे की, याकडे तुम्ही जसे पाहात आहात तसे पाहू नये,’ असे शरद पवार यांनी म्हटले. याच दरम्यान स्थानिक आमदार किसन कथोरे यांनीही आक्रस्ताळे वक्तव्य केले. ही सगळी वक्तव्ये तपशिलाने देण्याचे कारण म्हणजे, अशा संवेदनशील घटनांमध्ये राजकारण होऊ नये, असे सर्वच पक्षाचे नेते म्हणत आहेत. मात्र, प्रत्यक्षात याबाबतीत कुणीच एकमेकांपेक्षा कमी नाहीत, हे वारंवार सिद्ध होत आहे. तथापि, बदलापूरच्या घटनेनंतरही महाराष्ट्रातील अशा प्रकारांची मालिका संपलेली नाही. १५ ऑगस्टला पुण्यातील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. २० ऑगस्टला अकोल्यात शिक्षकाने सहा मुलींचा विनयभंग केल्याची घटना उघड झाली. याच दिवशी ठाण्यात गतिमंद मुलीवर, तर चांदिवलीत एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटनाही समोर आली. लातूरमध्ये याच दिवशी साडेचार वर्षाच्या मुलीशी लैंगिक छेडछाड करण्यात आली. २१ ऑगस्टला नाशिकमध्ये साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याच तारखेला मुंबईत अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला. पुण्यात अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने दोन मित्रांनी अत्याचार केला. २२ ऑगस्टला नागपुरात आठ वर्षाच्या एका मुलीवर शेजाऱ्यानेच अत्याचार केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभेच्या दिवशीच २२ ऑगस्टला कोल्हापुरात १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. अशा अत्यंत गंभीर, संवेदनशील घटनांवर एकत्र येऊन परिस्थिती सावरण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेची निवडणूक समोर ठेऊन राजकीय ‘बदला’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्याची प्रतिमा डागाळणाऱ्या अशा घटना घडत असताना त्यांचे अतिशय हीन राजकारण होणे, ही पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सगळेच केवळ सत्तेच्या मागे धावत असल्याने यात कुणीही मागे राहिलेले नाही. (संपर्कः dnyanabatukaram@gmail.com)



Source link