Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रपुस्तक मेळा: स्त्री जाणिवांच्या अनुभूतीचे 'मनांगण'

पुस्तक मेळा: स्त्री जाणिवांच्या अनुभूतीचे ‘मनांगण’

[ad_1]

2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जालना येथील कवयित्री आरती सुहास सदाव्रते यांचा ‘मनांगण’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. सुयश प्रकाशनाने काढलेल्या या देखण्या पुस्तकाविषयी…

बदलत्या काळानुसार जसे ‘तिचे’ जगणे बदलले, तसे प्रश्न अन समस्याही बदलत गेल्या आहेत. एक स्त्री म्हणून आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य ती दाखविते, तशी ती व्यथा – वेदना आणि अन्यायाने आजही अस्वस्थ होते. आजच्या जागतिकीकरण अन डिजिटल जमान्यात ‘तिचे’ जगणे, यातना मात्र काहीशा परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ देतात. कुठल्याच स्त्रीच्या सुख-दुःखाचे पट तिला तिच्या मनाप्रमाणे उघडता येत नाहीत. तिचे हक्क, अधिकार, कर्तव्य अन जबाबादारीचे मानसिक ओझे घेवूनच आजची ‘ती’ घरसंसार सांभाळते, हे ही वास्तव आहेच… अशा एक ना अनेक जाणिवांचा संदर्भ मांडणाऱ्या कविता ‘मनांगण’ या कवितासंग्रहात दिसून येतात.

जालन्यातील आरती सुहास सदाव्रते यांचा ‘मनांगण’ हा पहिलाच कवितासंग्रह आला आहे. वास्तविक जीवनातून आलेले अनुभव हृदयस्पर्शी असतात. मनापासून व्यक्त झालेले असतात. खरे आणि प्रामाणिक असतात. अशीच माझ्या भावनांची आरास मी शब्दातून मांडत त्याला कवितासंग्रहाचे स्वरुप कधी आले, तेही कळले नसल्याची प्रांजळ भावना मनोगतात आरती सदाव्रते मांडतात.

आरती सदाव्रते यांच्या ‘मनांगण’ कवितासंग्रहातील बहुतेक कविता मुक्त छंदातल्या आहेत. कधी त्या गद्याकडे जातात. यमक, छंद, प्रतिमांमध्ये त्या अडकत नाहीत. कविता अती भावुकही नाहीत की, शब्दबंबाळ नाहीत. कवितासंग्रहात कवितांच्या विषयात वैविध्य असले तरी गेय, नाद आणि काव्यात्मकता या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष होते. एकूणच ‘मनांगण’ कवितासंग्रहातील कविता स्त्री जाणिवांची सकारात्मक भूमिका मांडणाऱ्या आहेत, अशी पाठराखण प्रास्ताविकात भूमिका मांडताना संभाजीनगर येथील महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखिका रेखा बैजल यांची पाठराखण कवयित्री आरती सदाव्रते यांच्या लेखनाला बळ देणारी अशीच म्हणावी लागेल. कवितासंग्रहातील कवितांमधून सामान्य स्त्रीच्या मनात असलेल्या भावनांचे कंगोरे,जगण्याचे संदर्भ समर्थपणे मांडले असल्याचे लेखिका रेखा बैजल लिहितात..

‘मनांगण’ कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ सचिन महाजन यांनी सुरेखपणे रेखाटले आहे. आजच्या काळात स्त्री जीवनाचे संदर्भ आणि मन – आंगण या दोन्ही गोष्टी बदलत चालल्या आहेत. कुटुंब संस्था अन् मुलांवरील सुसंस्कार व्हावेत साठीचे ‘गोकुळ’ असावे, अशा आशयाचे मुखपृष्ठ मनाला स्पर्शून जाते. आई अन लेक तिचा संवाद, अंगणासह तुळस अशा प्रतिमांमधून मुखपृष्ठाला वेगळी उंची प्राप्त होते.

‘मनांगण’ कवितासंग्रहातील विषयाची विविधता लक्ष वेधून घेते. आयुष्य, आई, मन, नातेबंध, भावविश्व, निसर्ग, वास्तवता, विठ्ठल, पाऊस, बळीराजा, जीवनाचा वेध अशा विषयांवरील कविता आहेत. कवितांचे वेगळेपण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न लता मंगेशकर, मैनावती रणरागिणी, साने गुरुजी, सिंधुताई सपकाळ अशा व्यक्तीत्वाच्या विचारांचा वसा – वारसा कसा प्रेरक ठरतो हे आरती सदाव्रते समर्पकपणे शब्दांतून मांडतात.

कवितासंग्रहातील ‘वटपौर्णिमा’, ‘फक्त दिनदर्शिका बदलते, ‘आईचा आजार- दहावी’ ,’असाही महिला दिन’ अशा कवितेतील प्रतिमांमधून स्त्री ने नव्या बदलाचा विचार मार्ग स्वीकारावा, असा आशावाद मांडते. कवितासंग्रहातील ‘कृष्णा, शस्त्रे पुरव’ या कवितेतून स्त्रीने बंधने झुगारून स्वतःच अन्यायाचा सामना करीत आपलेच रक्षण आपणच केले पाहिजे, यासाठी ‘लढण्याचे शस्त्र पुरव’ असा क्रांतीचा नवा विचार कवितेतून येतो.

‘मनांगण’ कवितासंग्रहातील अनेक कवितेतून जीवनातील अनेकविध घटनाक्रमांचा जगण्यावर होणाऱ्या परिणामांना शब्दातीत बांधण्याचा प्रयत्न कवितेतून दिसून येतो. जीवनाचा वेध घेताना परिवर्तनाची भूमिका कशी जोपासली जावी, अशा आशयांच्या कविता म्हणजे ‘कृष्णा शस्त्रे पुरव, ‘समतेचे मंदिर, ‘ स्वयंभू मी !, स्वतंत्र मी !, ‘ फक्त दिनदर्शिका बदलते, ‘नवी आशा- नवी दिशा, वटपौर्णिमा, ‘असाही महिला दिन’, ‘गुरुजींचे स्वप्न’ यासारख्या कवितेतील आशय – विषयाची दिशा जीवनाचा व्यापक दृष्टिकोन कसा यावर भाष्य करणारी संवेदनशील कविता ‘मनांगण’ कवितासंग्रहात दिसून येते.

कवितासंग्रहात ‘आई’ विषयावर पाच कविता असून व्यक्तीच्या हळव्या मनाच्या आत खोलवर दडलेला मातृप्रेमाचा झरा कसा असतो, याची साक्ष अनुभूती कविता वाचताना जाणवते. कवितासंग्रहातील अनेक कविता या ‘मन’ या विषयाभोवती फिरणाऱ्या आहेत. यात ‘मन पानगळ, भावगोंदण, मनतरंग, ‘निरागस मन, मनातील भावना ‘ अशा कवितांमधून मनामनातील भावस्पंदने कशी बदलत जातात, याचे यथार्थ चित्रण कवितेतून दिसून येते. कवितासंग्रहातील कवितांचे वेगळेपण अधोरेखित करताना निसर्ग – पाऊस अशा विषयावरील कवितांमधून कधी आशेचा, तर कधी निराशेचा सूर कसा वाट्याला येतो हे ‘नदी- सागरा’, ‘कोवळी पाने’, ‘जीवघेणा पाऊस’, नदीचा प्रवास’, मेघ कोरडा’ अशा कवितेतील प्रतिमांमधून दिसते.

मनांगण कवितासंग्रहात पहिलीच कविता ‘आई : एक आठवण’ ही आहे. आई नसण्याचे रितेपण आयुष्यात जपत, भावनांना सांभाळत कवितेतून कवयित्री आरती सदाव्रते भावना व्यक्त करतात, त्या अशा..

‘प्राजक्ताच्या सुगंधाने
भरलेली ओंजळ
आईची आठवण ‘

अशा कविता मनाला स्पर्शून जातात. अध्यात्म विचारांचा प्रभाव कवितेतून दिसून येतो. ‘कृष्णा , शस्त्रे पुरव!’ या कवितेत मात्र तिच्या आधुनिक ‘मन आणि मनगट’ बळकट करणारा परिवर्तन विचारांचा वेध घेण्याचा प्रयत्न दिसून येतो. कवितेत कवयित्री आरती सदाव्रते लिहितात…

‘कृष्णा..
सध्याही दुर्दैवाने तेच चालू
आहे रे !
दु:शासनाला जोपासून
महिला कशी रे निर्भय होणार..
तिला वस्त्रे नकोत, शस्त्रे पुरव
तीच वध करेल नराधमाचा
तिचे मन आणि मनगट
बळकट कर !
कृष्णा…

कवितासंग्रहातील अनेक कवितांचे आशय – विषय हे भिन्न स्वरुपाचे दिसून येतात. वैचारिक आणि मूल्यसंस्कार विचार देत खऱ्या अर्थाने सामान्यांसाठी ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘ हा साने गुरुजींचा समतेचा विचार कवितेत मांडण्यात आलेला आहे.

‘पांडुरंगासाठी
‘पांडुरंग’ धावला
दीनांना भेटवी तो विठ्ठलाला
सर्वधर्म समभाव शिकवण
विठ्ठलासाठी करी उपोषण’

अशा वैचारिक परिवर्तनाच्या कविता लक्ष वेधून घेतात. कवितासंग्रहातील अनेक कविता या ‘मन’ विषयावर विचारमंथन करायला लावणार्‍या आहेत. प्रत्येकाच्या मनामनात एक हळवा कोपरा असतो, तो ज्याचा त्यालाच कळतो..अशा आशयाची ‘ अधिकार ‘ कविता मात्र मनातील आठवणींना वाट मोकळी करून देते. ‘अधिकार’ कवितेत कवयित्री आरती सदाव्रते भावनांना वाट मोकळी करतात, ती अशी…

आयुष्य जगले जरी
कवटाळून वेदना मी
शब्दांत मांडण्याचा
मज अधिकार नाही..

नयनांच्या काठावरी
भावना ओथंबून आल्या
अश्रू तयांना करण्याचा
मज अधिकार नाही….

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments