Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: ‘गोल’ राष्ट्रप्रेमाचा...

रसिक स्पेशल: ‘गोल’ राष्ट्रप्रेमाचा…

[ad_1]


युरो कप आणि कोपा अमेरिका या स्पर्धांमधून रोनाल्डो-मेस्सी यांच्यासारखे ग्लोबल सुपरस्टार जादुई खेळाची पुन्हा मोहिनी घालत आहेत. क्रीडा अर्थकारणाचा बाजारही तेजीत आहे. पण, या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, आपल्या देशाच्या गौरवासाठी जीव तोडून प्रयत्नांची शर्थ करण्याचा, राष्ट्रप्रेमाचा ‘गोल’ मने जिंकून घेत आहे! फुटबॉलचा देव मानला गेलेला ब्राझीलचा पेले हा त्या दिवशी हमसून हमसून रडत होता. कारण, वयाच्या अठराव्या वर्षी त्याने वर्ल्ड कप उंचावला होता! जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या मॅराडोनाचे अश्रू थांबतच नव्हते, कारण त्याच्या अर्जेंटिना संघाला अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते! ‘तुला जगभरातील सारी सुखे प्रिय असतील की फुटबॉल वर्ल्ड कपचे विजेतेपद?’ असे विचारता लिओनेल मेस्सीने क्षणार्धात उत्तर दिले- ‘झोपेतही मी सांगेन, वर्ल्ड कपचे विजेतेपद!’ आणि खरोखरच कतारमधील स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यावर मेस्सी अक्षरशः लहान मुलासारखा वर्ल्ड कप कुशीत घेऊन झोपी गेला! पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला सौदी अरेबिया सरकारने एखा‌द्या राजाप्रमाणे सर्व सुखसोयी प्रदान केल्या आहेत. पण, आपल्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकता न आल्याचे त्याला शल्य आहे. ही सगळी गाथा कथन करण्याचे कारण सध्या जर्मनीत रंगलेली युरो कप आणि अमेरिकेत सुरू असलेली कोपा अमेरिका स्पर्धा. युरोप आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडांतील देशांनीच आजवरचे सगळे फिफा वर्ल्ड कप उंचावले आहेत. आफ्रिका, आशिया आणि अरब देशांनी गेल्या काही वर्षांत लक्षवेधी कामगिरी केली असली, तरी अजूनही जागतिक फुटबॉलची महासत्ता म्हणून त्यांना स्थान नाही. दुसरीकडे, युरोपच्या इंग्लंड, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल या देशांतील व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये खेळण्याचे स्वप्न जगभरातील फुटबॉलपटू बाळगतात. वर्ल्ड क्लब कप विजेता मँचेस्टर सिटी, युरोपिय चॅम्पियन्स लीग विजेता रियल माद्रिद, बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, बायर्न म्युनिक, ज्युव्हेंटस् अशा ‘ग्लोबल ब्रँड’ क्लबकडून युरोपात लीग खेळणे ही प्रतिष्ठेची बाब आहेच; शिवाय ती कोट्यवधी युरोची कमाई करून देणारी नामी संधीही आहे. राष्ट्रप्रेमाचा आविष्कार फुटबॉल स्पर्धांमधून पैशाचे कितीही गोल साधले जात असले, तरी या अर्थकारणाच्या मायाजालापेक्षाही मोलाचे असलेले एक स्वप्न सर्व फुटबॉलपटूंनी उराशी बाळगलेले असते. ते म्हणजे, आपल्या देशाला सर्वोच्च बहुमान मिळवून देणे! आपल्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे! सध्या सुरू असलेल्या या स्पर्धांमध्ये सामन्यापूर्वी होणारे राष्ट्रगीत ही एकदा तरी जरूर अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणजे मी काय म्हणतोय, त्याची रोमांचित करणारी प्रचिती तुम्हालाही येईल. स्टार संघ, फुटबॉलपटूंची शर्थ युरो आणि कोपा अमेरिका स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या देशाला लौकिक प्राप्त करून देण्यासाठी जगभरातील स्टार फुटबॉलपटू प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. रोनाल्डो विक्रमी सहावा युरो कप खेळत आहे. चाळिशीकडे झुकलेल्या रोनाल्डोने त्यासाठी राखलेली तंदुरुस्ती अजोड आहे. यापूर्वी तीनदा कप उंचावलेला यजमान जर्मनी विजेतेपदाचा दावेदार आहे. या देशाने आजवरचा सर्वांत तरुण संघ उतरवला आहे. जर्मनीप्रमाणेच तीनदा युरो जिंकणारा स्पेनचा संघ कौशल्यपूर्ण खेळ करीत पूर्ण भरात आहे. त्यांच्याकडे अवघ्या १७ वर्षांचा लमील यमाल हा भविष्यातील तारा चमकतो आहे. युरो कपच्या दोन सामन्यांदरम्यान मिळालेल्या वेळेत आपला गृहपाठ पूर्ण करतानाचा त्याचा फोटो गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर तुफान गाजला. गतविजेत्या इटलीला किमान उपांत्य फेरी गाठण्याची आशा आहे. त्यानंतर बचाव अभेद्य ठेवून गेल्या स्पर्धेप्रमाणे पेनल्टी किकच्या माध्यमातून विजय मिळवण्याची त्यांची रणनीती आहे. इंग्लंडला मात्र १९६६ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणतेही विजेतेपद मिळवता आलेले नाही. प्राथमिक फेरीचा खेळ पाहता त्यांना बरीच सुधारणा करावी लागणार आहे. रोनाल्डोने प्रेरित पोर्तुगाल आणखी एका विजेतेपदाकडे मुसंडी मारण्यास उत्सुक असला, तरी प्रत्यक्ष सामन्यादरम्यानच्या संधी दवडणे त्यांना महागात पडेल. हॉलंड, बेल्जियम, क्रोएशिया, डेन्मार्क, पोलंड आदी संघांमध्ये गुणवान खेळाडू आहेत, पण त्यांना आपला खेळ आणि वेग उंचवावा लागेल. आणि सरतेशेवटी, जगातील सध्याचा सर्वोत्तम खेळाडू मानला जाणाऱ्या, कतारमधील फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक ठोकणाऱ्या आणि २०१८ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या किलियन एम्बापे याचा फ्रान्स! एम्बापेचे फटके आणि चेंडूसह जोरदार धाव यांसह फ्रान्सचा संघ लक्षवेधी कामगिरी करतो आहे. आता अंतिम फेरीत धडक मारुन युरो कप उंचावत जर्मनीत ‘फ्रेंच क्रांती’ घडवण्याचे त्यांचे ध्येय आहे. ‘कोपा’मध्ये अर्जेंटिना, ब्राझीलचाच बोलबाला कोपा अमेरिका स्पर्धेत दक्षिण अमेरिकेतील देश झुंजतात. १९३० मध्ये उद्घाटनाची फिफा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणारा उरुग्वे, कोलंबिया, चिली यासारखे अपवाद वगळता ‘कोपा’मध्ये मेस्सीचा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील यांचाच बोलबाला असतो. वर्ल्ड कप जिंकण्यापूर्वी मेस्सीने ब्राझीललाच पराभूत करून पहिले कोपा विजेतेपदही पटकावले होते. तेही ब्राझीलच्या प्रसिद्ध मराकाना स्टेडियममध्ये! ब्राझील आता त्याचा वचपा काढण्याची जिद्द बाळगून आहे. बड्या स्पर्धांचे राष्ट्रीय फायदे ऑलिम्पिक, फिफा वर्ल्ड कप, युरो कप अशा बड्या स्पर्धांच्या आयोजनाचे राष्ट्रीय फायदेही असतात. स्पोर्ट्स डिप्लोमसीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय भू-राजकीय पटलावर आपल्या देशाची छबी उंचावण्याचा प्रयत्न होतो. वर्ल्ड कप, युरो कप यांसारख्या राष्ट्रीयत्वाची प्रचिती देणाऱ्या स्पर्धांमुळे दारिद्र्य, बेरोजगारी, नैराश्याच्या गर्तेत बुडालेली मने उल्हसित होतात. अर्थात, या स्पर्धा आणि त्यांचा अवाढव्य खर्च डोईजड होण्याचा धोकाही असतो. तो टाळला तर भावी पिढ्यांचे भवितव्य घडवत राष्ट्रीय प्रगतीची दालने अशा स्पर्धांमुळे नक्कीच खुली होतात. भारतामध्ये प्रत्येक खेपेला एशियाड, ऑलिम्पिक स्पर्धा जवळ आल्या की, आपण ‘गो फॉर गोल्ड’ म्हणत मार्केटिंगच्या मोहिमा हाती घेतो. पण, अशा स्पर्धांचे आयोजन तसेच युरो-कोपा अशा स्पर्धा टीव्हीवर लाइव्ह बघताना होणारा राष्ट्रप्रेमाचा संस्कार आणि रुजणारी क्रीडासंस्कृतीची बीजे जोपासली, संवर्धित केली जायला हवी. अशा स्पर्धांच्या निमित्ताने आपण याबाबतीत कृतिशीलही झाले पाहिजे. डोळे दीपविणारे अर्थकारण इंग्लिश प्रीमियर लीगचे वार्षिक उत्पन्न सुमारे साडेसहा अब्ज युरो आहे. स्पेनच्या ‘ला- लिगा’तील वार्षिक उत्पन्न सहा अब्ज युरोच्या घरात आहे. युरोपातील सर्वोत्तम क्लब खेळत असलेल्या चॅम्पियन्स लीगमधून विविध स्तरांवर सहभागी क्लबना सुमारे २.५ अब्ज युरो बक्षीस म्हणून देण्यात येतात. युरो कपची एकूण बक्षीस रक्कम सुमारे साडेतीन अब्ज युरो आहे. स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाला किमान एक कोटी युरो इतकी रक्कम निश्चित केलेली असते. विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किमान पाच कोटी युरोपर्यंतची रक्कम मिळते. या व्यतिरिक्त पुरस्कर्ते, जाहिरातदार आदी स्त्रोतांमधूनही उत्पन्न मिळतेच. ‘युरो’च्या तुलनेत ‘कोपा’मध्ये आर्थिक उलाढाल कमी आहे. तिथे बक्षीस म्हणून सर्व सहभागी संघांना सुमारे ७.५ कोटी डॉलर दिले जातात, तर विजेत्यांना सुमारे १.५ कोटी डॉलर मिळतात. ही सर्व रक्कम संबंधित देशाच्या फुटबॉल महासंघाला देण्यात येते. प्रत्येक महासंघाचा खेळाडूंशी करार असतो. त्यानुसार त्यांना बक्षीस रक्कम मिळते. अर्थात, खेळाडू आपल्या व्यावसायिक क्लबकडून खेळण्यासाठी यापेक्षा किती तरी अधिक पटीने पैसे घेतात. पण तरीही, आपल्या देशासाठी सामना जिंकण्याचे मोल या रकमांपेक्षा कैक पटीने अधिक असते! असे करार… अशी कमाई! किलियन एम्बापे (फ्रान्स) करार : स्पेनच्या रियल माद्रिद संघासोबत कमाई : 5 वर्षांत 3 कोटी युरो लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) करार : इंटर मियामी एफसी संघासोबत कमाई : दरवर्षी किमान 2 कोटी डॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) करार : सौदीच्या अल नसार क्लबसोबत कमाई : 215 दशलक्ष डॉलर (संपर्कः ashpen6@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments