
अरविंद जगताप10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एवढ्या जंगलात हा कुल्फी का विकतोय, हे विनीत आणि सखीला लक्षात आलं नाही. पण, पंधरा मिनिटं झाली, तो कुल्फीवाला.. ‘कुल्फी घ्या, कुल्फी..’ असं ओरडत राहिला.
शहरात झाडं नाहीत, याचं विनीतला खूप वाईट वाटतं. त्यांच्या शहराशेजारी एक छोटं जंगल आहे. जंगल नावाला. आता ती बागच झालीय. विनीत तिथं नेहमी जातो. तिथली सगळी झाडं त्याला पाठ आहेत. मागच्या पावसात तिथलं गुलमोहराचं झाड पडलं, तेव्हा खूप उदास झाला होता तो. त्या झाडावर त्याचं विशेष प्रेम होतं. आजही तो जंगलात आला होता. रोजच्यासारखा. त्याच्या आवडत्या वडाच्या झाडाखाली बसला होता. त्याला नेहमीप्रमाणं सखीची आठवण आली.
सखी आणि तो त्याच झाडाखाली बसायचे खूपदा. सखी त्याची प्रेयसी. दोघे लॉ करत होते. विनीत बाहेरून आला होता शिकायला. सखी त्याच शहरातली. दोघांचं प्रेम जुळलं. विनीत उत्तम वक्ता होता. खूप स्पर्धा जिंकायचा. एका स्पर्धेला दोघे एकत्र गेले होते. तिथं सखी भाषण करता करता चक्कर येऊन पडली. आणि मग विनीतच्या प्रेमात पडली. कारण विनितने तिला लगेच दवाखान्यात नेलं. काळजी घेतली. त्या स्पर्धेत तो बोलला नाही. तिच्यापाशी बसून राहिला. मग दोघेच बोलत राहिले. सखी शहरात त्याला भेटणं टाळायची.
कुणी पाहिलं तर? अशी भीती होती. म्हणून दोघे शहराजवळ असलेल्या जंगलात जायचे. प्रेमी जोड्यांना ते जंगल एक आधार वाटायचं. प्रत्येक जोडी आपलं आपलं एक झाड पकडून बसलेली असायची. अर्थात ते शहरापासून एवढं दूर होतं की फार लोक यायचे नाहीत. एक तर निसर्गावर प्रेम करणारे यायचे, नाहीतर एकमेकांवर प्रेम करणारे. विनीत आणि सखीला आता तिथली झाडं पाठ झाली होती. फक्त अडचण अशी होती की, झाडाखाली गप्पा तरी किती वेळ मारणार? प्रेम गप्पांच्या पुढं गेलं होतं. पण, आसपास आणखी जोडपी आणि फिरणारे लोक असल्यामुळं साधा हात हातात धरायचा तरी अडचण होती. मग विनीत आणि सखी जंगलात आत जायला लागले, जिथं कुणी बघणार नाही.
जंगल फार दाट नव्हतं, पण भीतीपोटी लोक फार आत जायचे नाहीत. विनीत आणि सखी मग धाडस करून थोडे दूर जायला लागले. तिथं कुणी बघणार नाही, अशा झाडाखाली एकमेकांच्या मिठीत संसाराची स्वप्न पाहायला लागले. पण, इथं कुणी येणार नाही, हा त्यांचा भ्रम पहिल्या दिवशीसुद्धा टिकला नाही. तिथं एक कुल्फीवाला यायचा. त्या एवढ्या जंगलात आणि एकांतात तो कुल्फी का विकतोय, हे काही विनीत आणि सखीला आधी लक्षात आलं नाही. पण, पंधरा मिनिटं झाली, तो कुल्फीवाला त्या दोघांच्या आसपास.. ‘कुल्फी घ्या, कुल्फी..’ असं ओरडत राहिला. आधी विनीतने थेट नाही म्हणून सांगितलं. कुल्फीवाला थोडा पुढं गेला आणि पुन्हा मागं आला. ‘कुल्फी घ्या, कुल्फी..’ म्हणून तो तिथंच चकरा मारत राहिला.
विनीत आणि सखीसाठी ही नवीनच डोकेदुखी झाली होती. जंगलात एवढं लांब येऊनही प्रायव्हसी नाही. शेवटी कंटाळून विनीतने कुल्फी घेतली. एरवी दहा रुपयाला मिळणारी कुल्फी तो वीस रुपयाला विकत होता. जंगलात भाव जास्त असतो म्हणून. खरं तर विनीतकडे पैसे जेमतेम असायचे. त्यात गाव सोडून शिकायला शहरात आलेला. घरून मोजकेच पैसे यायचे. तर, त्यानं एकच कुल्फी का घेतली, असं विनिताने विचारलं. विनीत म्हणाला, ‘मला गोड आवडत नाही’. मग तिनं स्वतः कुल्फीचा एक घास खाल्ला. उरलेली कुल्फी विनीतच्या हातात दिली. आता आवडेल तुला म्हणाली. विनीतला या प्रेमाची सवय नव्हती. दोघांनी दोन मिनिटांत कुल्फी संपवली. खरं तर कुल्फी खाण्याची इच्छाही नव्हती. पण, ती घेतल्यामुळं प्रायव्हसी मिळाली. दोघांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. सखी लाडाने विनीतच्या मिठीत शिरली.
प्रेमाचे दोन क्षण अनुभवायला लागले, तेव्हा कुल्फीवाला पुन्हा आला.. कुल्फी घ्या, कुल्फी… आता मात्र विनीत भडकला. उठून कुल्फीवाल्याकडे गेला. रागात. त्याला चिडून बोलू लागला. कुल्फीवाल्याने चाकू काढला. आणि गाणं म्हणत कुल्फीच्या काड्या कापू लागला. चाकू बघून विनीतची बोबडी वळली. तो आता शक्य तेवढा आवाज बदलून आणि प्रेमाने त्या कुल्फीवाल्याशी बोलू लागला. ‘आता घेतली ना कुल्फी? आता आम्हाला डिस्टर्ब का करतोस?’ असं विनवू लागला. कुल्फीवाला म्हणाला, ‘वीस रुपयांत मी पाच मिनिट चक्कर मारत नाही. शंभर रुपये द्या, मी अर्धा तास येत नाही..’ विनीत हे ऐकून हैराण झाला. जंगल काय तुझ्या बापाचं आहे का? असं बोलायचं विनीतच्या मनात आलं, पण तो बोलला नाही. तो मेसचा, फीसचा आणि इतर खर्च मोजत राहिला. शेवटी पाकिटात नीट घडी करून लपवून ठेवलेली शंभरची नोट त्याने कुल्फीवाल्याच्या हवाली केली. आता कुल्फीवाला अर्धा तास डिस्टर्ब करणार नव्हता.
विनीत आणी सखी तिथं कायम यायचे. केवळ एकमेकांच्या मिठीत अर्धा तास बसून राहण्यासाठी विनीत खूप जुळवाजुळव करून पैसे आणायचा. उधारीही वाढली होती. पण, प्रेम माणसाला हे सगळे कुटाणे करायला लावतंच. बघता बघता विनीतवर हॉस्टेलच्या पोरांची दहा हजारापेक्षा जास्त उधारी झाली होती. विनीतला हॉस्टेलवर जाणं अवघड झालं होतं. सखीकडं पैसे मागायला बरं वाटत नव्हतं. करणार काय? विनीत एक दिवस झाडाखाली बसून सखीला सांगत होता की, आता आपण जंगलात भेटायचं बंद करूया.. आधी सखीला कारणच लक्षात येत नव्हतं. मग शेवटी विनीतने खरं खरं सांगितलं. सखी म्हणाली, एवढं काय घाबरतोस त्याला? सरळ थोबाडीत ठेऊन द्यायची. विनीतची खरं तर हिंमत नव्हती. आणि नको त्या भानगडी कशाला करायच्या? म्हणून तो शांत होता. पण, सखीने आता त्याच्या इगोला ठेच पोचवली होती. नेहमीप्रमाणं कुल्फीवाला आला. कुल्फी घ्या, कुल्फी… सुरू झालं. विनीत त्याच्याकडं रागाने बघत होता. विनीत फक्त रागाने बघतोय म्हणून सखी त्याच्याकडं अजून रागाने बघत होती. विनीत उठून उभा राहिला त्याला मारायला. पण, त्याला कुल्फीवाल्याकडच्या चाकूची आठवण झाली.
कुल्फी घ्या, कुल्फी.. चालूच होतं. विनीत जागच्या जागीच दातओठ खात उभा होता. सखीला हे सहन झालं नाही. ती उठली आणि तिनं कुल्फीवाल्याच्या थोबाडीत मारली. पाय आपटत निघून गेली. कुल्फीवाला शांत उभा राहिला. त्यानं फोन काढला. पाच मिनिटांत त्यानं सखीच्या वडिलांना फेसबुकवर शोधलं. त्यांना विनीत आणि सखी दोघांचा फोटो पाठवला. कुल्फीवाला डिजिटल इंडियाचा तयारीचा गडी होता. त्या दिवसापासून सखीचं विनीतला भेटणं बंद झालं. प्रेमकहाणी संपली.
विनीत आजही तिथं जातो. रोज. एकटा. आणि हो, एक सांगायचं राहिलं.. तिथं हल्ली दोन कुल्फीवाले झालेत. आता विनीत पण कुल्फी विकतो. हॉस्टेलची उधारी तर चुकवावीच लागेल ना…
(संपर्कः jarvindas30@gmail.com)