कबीररंग: परनिंदा नाहीं करै…सो कोइ बिरला दीठ

0
1
कबीररंग:  परनिंदा नाहीं करै…सो कोइ बिरला दीठ


हेमकिरण पत्की8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण दिवसातले किती क्षण स्वस्थ असतो आणि किती क्षण नसतो, याचं निरीक्षण करणं मोठं गमतीचं होईल. मुळात स्वस्थ असणं म्हणजे काय, याची नुसती व्याख्या करून भागणार नाही. स्वस्थता ही आपल्या मनाची स्वाभाविक स्थिती आहे. असं बघा की, आपण फिरायला बाहेर पडतो, तेव्हा फक्त फिरण्याची क्रिया घडत असते का? आपण जेवतो तेव्हा जेवतच असतो का? या विचारातलं तथ्य शोधणं महत्त्वाचं आहे. शरीराच्या कष्टात, भुकेच्या संवेदनेत मनाचं, विचाराचं काय काम? पण, आपल्या साऱ्या दैनंदिन क्रिया मनाच्या, विचाराच्या हस्तक्षेपासह होतात. यामुळं आपलं मन बहुधा थाऱ्यावर नसतं. आपण अस्वस्थ असतो. या अस्वस्थतेतून मन बाहेरच्या घटना-प्रसंगात हरवतं. मनाबाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतून पडतं. अनावश्यक कृतींमागे धावतं. तुलनेच्या भावनेनं गढूळ होऊन जातं. मनाच्या बहिर्मुख होण्यातून आपण कधी प्रगतशील माणसाची थट्टा करतो, तर आपल्या दृष्टीनं एखादा संवेदनशील माणूस निंदेचा विषय होतो. ही आपल्या मनाची असंवेदनशीलताच असते.

कबीरांना अशा बाहेरच्या पसाऱ्यात हरवलेल्या मनांची काळजी वाटते. कारण अशी मनं दुसऱ्या जीवाची निंदा करण्यात आपल्या जगण्याची गती आणि दिशा हरवत असतात. कबीर म्हणतात…

माखी गहै कुवास को,

फूल वास नहिं लेयं।

मधुमाखी है साधुजन,

पुष्प वास चित्त देयं।।

दुसऱ्याची निंदा करणाऱ्या माणसाच्या वृत्तीविषयी बोलताना कबीर साधी माशी आणि मधमाशी यांचा दाखला देतात. साधी माशी दुर्गंध येत असलेल्या वस्तूवर बसते; पण मधमाशी मधुकर असते. ती फुलांवर बसते. फुलांच्या नाजूक पाकळ्यांना जराही इजा न करता त्यातील मध गोळा करते. निंदक आणि गुणग्राहक यांच्यातील फरक या दाखल्यानं आपल्या मनात उजेड पडतो. आपण माशीचं अनुकरण करायचं की मधमाशीला अनुसरायचं, याचा विवेक कबीर खूप मार्मिकतेनं सूचित करतात.

‘निंदा’… मग ती लहान जीवाची सुद्धा व्हायला नको. कारण जीव कितीही लहान-मोठा असला, तरी त्यातील प्राणचेतना लहान- मोठी नसते. ती नुसती असते. प्राणचेतना संवेदनेआड होऊ नये म्हणून कबीर हा दुसरा मार्मिक दाखला देतात…

तिनका कबहुं न निंदिये,

पांव तले जो होय।

कबहूँ उडि आंखों परै,

पीर घनेरी होय।।

कबीरांचं निरीक्षण दृष्टिबोध घडवणारं आहे. चालता चालता आपल्या पायांखाली वाळलेल्या गवताची काडी येते. ती पायाच्या बोटाला खुपते. आपण तिला टाकून बोलतो. पण कबीर म्हणतात, तिला बोल लावू नका. हीच गवताची काडी वाऱ्यामुळं डोळ्यात गेली तर किती वेदना सहन कराव्या लागतील? भावार्थ असा की, ज्याची आपण निंदा करतो ती गोष्ट आपल्याला क्लेश देते. हे क्लेश आपलं ध्यान वस्तुस्थितीपासून वेगळं करतात. यामुळं आपलं मन थाऱ्यावर राहत नाही. मग आपल्या मनाचा स्वभाव आपल्याला कळणार तर कधी?

निंदा करण्याची ही मनाची सवय त्याला जीवन-व्यवहारातल्या तथ्यांपासून दूर नेणारी आहे. कबीरांचं हे सूचन बहिर्मुख माणसाला हृदयाशी जोडणारं आहे. पण, आपण आजूबाजूला पाहतो की, धनवान निर्धनाची निंदा करतो, रूपवान कुरूप असणाऱ्याला पाण्यात पाहतो. सामान्य व्यवहार-कौशल्ये असलेल्या भाबड्या माणसाला उपेक्षेनं मारतो. कलेच्या क्षेत्रात लौकिकदृष्ट्या यश लाभलेले कलावंत सहकलावंतांना, कारागिरांना कित्येक वेळेला निंदेच्या नव्या प्रकारांसह दूर ठेवतात. कबीर म्हणतात, हे निंदक कुठं आढळत नाहीत? ते पृथ्वीच्या पाठीवर आपण जाऊ तिथं भेटतात.

सातों सागर मैं फिरा,

जंबूद्वीप दै पीठ।

परनिंदा नाहीं करै,

सो कोइ बिरला दीठ।।

कबीरांचं हे निरीक्षण माणसाच्या मूळ स्वभावाचं दर्शन घडवणारं आहे. प्रत्येकात एक निंदक आहे. तो दुसऱ्याची निंदा करत राहतो. हा नकारात्मक भाव चांगल्या प्रापंचिकासाठी, प्रामाणिकपणे चरितार्थ चालविणाऱ्यासाठी, कलेचा ध्यास घेतलेल्या कलावंतासाठी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जाणून घेणाऱ्या जीवन-साधकासाठी घातक आहे. हा भाव जाणून आपल्याकडून कुणाचीही निंदा होणार नाही, ही काळजी घेणं कबीरांना अपेक्षित आहे. आपल्या साऱ्यांची स्वस्थता यातच दडलेली आहे.



Source link