Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: चिंता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीची

रसिक स्पेशल: चिंता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीची

[ad_1]

डॉ. श्रीरंग गायकवाड3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

विकासासोबत येणारे ‘साइड इफेक्ट’ आधी निसर्गाच्या आणि नंतर मानवाच्या मुळावर उठतात. अर्थात, त्यापूर्वी धोक्याची घंटा वाजलेली असतेच. आपली सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात एका धनिकपुत्राने गाडीखाली दोघांना चिरडून ही घंटा पुन्हा वाजवली आहे. ती आपल्याला वेळीच ऐकू यायला हवी.

संत, महात्म्यांच्या वास्तव्याने पावन झालेली, प्राचीन वैभवशाली पुण्यनगरी अर्थात पुणे शहर एकेकाळी आदिलशाहीने बेचिराख केले. गाढवाचा नांगर फिरवून पुणेकरांवर जरब बसविली. त्यानंतर राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी सोन्याच्या फाळाने जमीन नांगरून पुण्याला भयमुक्त केले. गतवैभव प्राप्त करून दिले. पेशव्यांनी पुण्याचा विस्तार केला. अटकेपार झेंडे फडकवले. पुढे स्वातंत्र्य चळवळ असो की सामाजिक सुधारणा; पुण्याने प्रत्येक ठिकाणी देशाचे नेतृत्त्व केले. असे हे ऐतिहासिक, शांत – समृद्ध शहर आता उपनगरांमधून प्रचंड विस्तारले आहे. पुण्याची लोकसंख्या आता पाऊण कोटीच्या घरात पोहोचली आहे. विशेष म्हणजे, यातील निम्मी लोकसंख्या तरुण म्हणजे तिशीच्या घरातील आहे. बाहेरून आलेले सुमारे २० लाख विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. यातील बरेचसे विद्यार्थी परराज्यांतील उद्योजक, राजकीय किंवा प्रशासनातील उच्चपदस्थ अशा धनवानांच्या कुटुंबातील असतात. हे विद्यार्थी इथल्या खासगी शिक्षण संस्थांमध्ये ‘पेमेंट शीट’वर शिकतात. आता तर पुण्यातील बहुतेक नामवंत महाविद्यालये ‘खासगी विद्यापीठ’ होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुण्यात अशा पैसेवाल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच जाणार आहे.

आता यात भर पडली आहे, ती आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या तरुणाईची. विद्यार्थ्यांना एकवेळ पॉकेटमनीची कमतरता भासेल, पण लाखोंचे पॅकेज घेणाऱ्या नवश्रीमंत तरुणाईला याची चिंता नाही. ते राहण्यासाठी फ्लॅट भाड्याने घेण्यापेक्षा थेट विकतच घेतात. त्यातून शहराभोवती मोठमोठे प्रोजेक्ट, स्काय स्क्रॅपर्स, टाऊनशिप्स उभ्या राहत आहेत. पुण्यात वर्षाला सुमारे लाखभर फ्लॅट विकले जात आहेत. आणि एका फ्लॅटची सरासरी किंमत असते एक कोटी रुपये! ‘एक्स्प्रेस वे’मुळे मुंबई ते पुणे हे अंतर तास दीड तासावर आल्याने पुण्यात सेकंड होम घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या सगळ्यामुळे स्थानिक बिल्डर मात्र आणखी गब्बर होऊ लागले आहेत.

पुण्याच्या विस्तारात मोठी भर घातली, ती औद्योगिक वसाहतींनी. पिंपरी-चिंचवड आणि चाकण येथील एमआयडीसींनी वाहन उद्योगात जगभर नाव कमावले आहे. जगभरातील नामांकित वाहने इथे तयार होतात. त्यांची उलाढाल ४० हजार कोटींच्या घरात गेली आहे. पुण्यातील हिंजवडी, खराडी, मगरपट्टा परिसरातील सुमारे ५०० आयटी, बीपीओ कंपन्यांत सहा लाख आयटी इंजिनिअर काम करत आहेत. या कंपन्यांची उलाढाल तब्बल एक लाख कोटींच्या घरात आहे. ही समृद्धी पुण्यातील मध्यमवर्गीयांपर्यंतही झिरपते आहे. त्यामुळेच तर पुण्यातील रस्त्यांवर लोकसंख्येपेक्षा जास्त वाहने धावत आहेत.

तरुणपणीच असा हाती पैसा हाती खुळखुळू लागल्यावर विरंगुळा हवाच. पुण्यातील नाट्य-सिनेमागृहे त्यासाठी पुरी पडत नाहीत. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावर मावळ आणि पनवेलपर्यंत डान्स बार सुरू झाले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यावर टाच आणली. नंतर शहराच्या आसपास रेव्ह पार्ट्या सुरू झाल्या. त्यांचे प्रमाण आटोक्यात येत नाही, तोवर आता पब, हुक्का पार्लर, टेरेस बार यांचे पेवच फुटले आहे. नशेत असलेल्या एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आपली अालिशान कार भरधाव चालवून दोघांचा जीव घेतला. त्यामुळे पुण्यातील नवी पब संस्कृती चर्चेत आली. तरुणांना बेभान करणारे सुमारे १५० पब पुणे आणि परिसरात अहोरात्र चालू असतात. तिथे दारू आणि वेगवेगळ्या ड्रग्जच्या नशेत तरुण थिरकत असतात. पबमधून बाहेर आल्यावर रस्त्यांवरही त्यांचा धिंगाणा सुरू असतो. महिन्यापूर्वीच पुणे पोलिसांनी तब्बल चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. पुणे कुठल्या वाटेवर निघाले आहे, हे यातून लक्षात येऊ शकते.

पुण्यातील उच्चभ्रू वस्त्याच नव्हे, तर शहरातील कुठल्याही रस्त्यांवर आणि पुण्याबाहेर जाणाऱ्या सिंहगड-पानशेत, ताम्हिणी, सासवड आदी घाटरस्त्यांवर वेळी-अवेळी ‘धूम स्टाइल बाइक’वरून सुसाट फिरणारी तरुण जोडपी म्हणजे पुण्यात शिक्षणासाठी आलेली अतिश्रीमंतांची मुले. रस्त्यावरच्या पोलिसमामांच्या हातावर ठराविक ‘तुरी’ देऊन ती सैराट होतात. शहर आणि उपनगरांमध्ये या मुला-मुलींसाठीच्या हॉस्टेलचा एक स्वतंत्र बिझनेसच उभा राहिला आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना हॉस्टेलची बंधने आवडत नाहीत. मग मुले आणि मुली मिळून सोसायट्यांमध्ये फ्लॅट घेऊन ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहतात. फ्लॅटमालकांनाही जादा भाडे देणारे हे भाडेकरू परवडतात.

काही काळापूर्वी सोसायट्यांमध्ये, रस्त्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्या या पोरांची कानउघाडणी एखादे ज्येष्ठ पुणेकर काका करताना दिसायचे. आता बदललेल्या वातावरणात ही ‘रिस्क’ कुणी घेत नाही. परराज्यात राहणाऱ्या पालकांनाही आपल्या या मुलांवर रोज लक्ष ठेवणे शक्य नाही. त्यामुळे ‘सातच्या आत घरात’ ऐवजी ‘सातनंतर बाहेर’ असे चित्र शहरात दिसते. मग स्वैर प्रेम, प्रेमाचा त्रिकोण, चौकोन आणि त्यातून बलात्कार, खून अशा अनेक घटनांनी अलीकडच्या काळात शांत पुण्याला हादरे बसू लागले आहेत. यामुळे केवळ पुणेकरांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या या सांस्कृतिक राजधानीची चिंता वाटू लागली आहे.

(संपर्कः dnyanabatukaram@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments