सातारा : होर्डिंग्जचे मायाजाळ… डोक्यावर घोंगावतोय काळ

0
17









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह महामार्गालगत सुरू असलेली अवाढव्य आकाराच्या होर्डिंग्जची स्पर्धा जीवघेणी ठरू लागली आहे. सध्या वादळी वार्‍यासह वळवाचे तांडव नृत्य सुरू आहे. त्यामध्ये ही होर्डिंग्ज कोसळू लागली आहेत. स्वस्तात जाहिरातीचा पर्याय ठरलेले या होर्डिंग्जचे मायाजाळ… लोकांच्या, प्रवाशांच्या, वाहनचालकांच्या डोक्यावर काळ बनून घोंगावताना दिसत आहे. बेकायदा होर्डिंग्जबाबत सर्वेक्षण करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मुंबईत घाटकोपर येथे सोमवारी वादळी वार्‍याच्या तडाख्यात बेकायदा होर्डिंग कोसळून 14 जणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने बेकायदा होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सातारा शहरासह राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख रस्त्यालगत तसेच मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग्जचे जाळे पसरले आहेत. काही होर्डिंग्ज रितसर परवानगी घेऊन उभी असली तरी अनेक होर्डिंग्ज बेकायदा असल्याचे वास्तव आहे. अशा होर्डिंग्जमुळे सातारा शहराचे तसेच त्या त्या परिसराचे अक्षरश: विद्रुपीकरण होत आहे.

आपल्या उत्पादनाची जाहिरात व्हावी, म्हणून व्यावसायिक अनेक पर्यायांचा शोध घेतात, त्यापैकी होर्डिंग्ज हा एक पर्याय ठरत असल्याने होर्डिंग्ज व्यवसायातही नफेखोरी करण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसते. यातूनच शहर, गावातील मुख्य चौक, जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या शेतात, उंच टेकडी अशा ठिकाणी हे व्यावसायिक होर्डिंग उभारतात. ज्या ठिकाणी लोकांची वर्दळ मोठी आहे, त्याच ठिकाणी असे होर्डिंग्ज उभारले जातात. अजस्र आकाराची होर्डिंग्ज उभारताना लोखंडी अँगलचा वापर केला जातो. मात्र, अनेक वर्षे एकाच ठिकाणी उभे असलेल्या होर्डिंग्जच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ नफेखोरी कमावण्याच्या नादात होर्डिंग्ज व्यावसायिक असे दुर्लक्ष करतात, आणि मग घाटकोपर येथे ज्या पद्धतीने वादळी वार्‍यात होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना घडली, त्याच पद्धतीने जिल्ह्यातही अनेक ठिकाणी होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटना घडण्याचा धोका आहे. यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करणे आवश्यक
आहे.

फ्लेक्स लावण्याची काय आहे नियमावली?

  • ठराविक कालावधीसाठी उभारण्यात येणार्‍या फलकासाठी शहरात पालिका आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • विशिष्ट कर भरून घेऊन पालिका, ग्रामपंचायत फ्लेक्स उभारणीला परवानगी देते, परंतु या फ्लेक्सवर परवानगी मिळालेल्या तारखेपासून किती तारखेपर्यंत फ्लेक्स लावायचा, याचा उल्लेख दर्शनी भागात करणे सक्तीचे असते.
  • त्याचबरोबर ज्या जागेमध्ये होर्डिंग लावले जाणार आहे, त्या जागा मालकाची परवानगी घेणेही आवश्यक असते.

लाईफ टाईम इन्कम… शॉर्ट टम लाईफ

महामार्गाच्या भोवतीने, शहरातील मुख्य चौकांतील इमारतींवर अजस्र होर्डिंग्ज अनेक वर्षे उभे असतात. ज्याच्या इमारतीवर हे होर्डिंग्ज आहेत, त्याला यातून ‘लाईफ टाईम इन्कम’ पिढ्यान्पिढ्या मिळत राहतो. होर्डिंग्ज मालकाचा मोबाईल क्रमांक या बोर्डवर असल्याने जाहिरातदार त्यावर संपर्क साधून जाहिरात लावतात. मात्र वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या फलकांच्या दुरुस्तीबाबत तितकी काळजी घेतली जाते का? हा प्रश्न सर्वसामान्यांना नेेहमीच सतावत असतो.











Source link