Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रमहान सुपुत्राची अवहेलना ; चक्रवर्ती सम्राट अशोक

महान सुपुत्राची अवहेलना ; चक्रवर्ती सम्राट अशोक

काळा कुरूप, शीघ्रकोपी, ९९ भावांना मारणारा, चंड अशा अनेक बिरुदावली लावून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या विषयी येवढा मत्सर येवढा तिरस्कार इथल्या नागरिकांनाच्या मनात कोणी आणि कशासाठी रूजवला ? खरच ते काळे कुरूप होते का ? खरच ते शीघ्रकोपी होते का ? खरच ते चंड होते का ? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे “नाही” असेच देता येतील.

सम्यक समबुध्दांनी उपदेशलेली नितीमुल्य जोपासण्याच्या उद्दिष्टेने घेतले निर्णय ( पशु हत्या बंदी ) आणि आपल्या साम्राज्यात लागू केले निर्बंधने यातुन चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे चरित्र मलिन करण्यात आले आहे.
खालील दिलेल्या उतार्यावरून ते अधिक स्पष्टपणे कळून येते.

त्यावेळी जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म प्रचलित होते, हा त्यांच्यापैकी एक नव्हता ( बुध्द धम्म).
अशोकाने त्याला राज्याचा धर्म ( अर्थात राष्ट्रीय धर्म ) केला. हा निश्चितपणे ब्राम्हणधर्माकरिता एक फार मोठा कुठाराघात होता. ब्राम्हणांना राज्याचे संरक्षण मिळणे बंद झाले आणि ते अशोकाच्या साम्राज्यमध्ये दुय्यम व आश्रितांच्या स्थितीमध्ये येऊन उपेक्षित झाले. निश्चितपणे म्हणता येईल की दडपणाचे एक सामान्य कारण होते की, अशोकाने सर्वप्रकारच्या पशूंच्या हत्येवर प्रतिबंध लावलेले होते व पशूहत्या हा ब्राम्हणांच्या धर्माचा मुख्य आधार होता. ब्राम्हणांनी केवळ राज्याचे संरक्षणच गमावले नाही तर त्यांनी आपले व्यवसाय सुध्दा गमावले. त्यांचा मुख्य व्यवसाय होता यज्ञकर्म करणे व त्याकरिता मोबदला ( Fee ) वसुल करणे. हा मोबदला कधी कधी फार अधिक सुध्दा असायचा आणि हेच त्यांच्या जगण्याचे, पोट भरण्याचे मुख्य साधन होते. अशाप्रकारे ब्राम्हण १४० वर्षेपर्यंत म्हणजेच मौर्य साम्राज्याच्या शेवटपर्यंत, दबावात व उत्पीडित वर्ग म्हणून राहिले.
तेव्हा वंचित ब्राम्हणांना बौध्द राज्याच्या विरूध्द विद्रोह करणे हाच एकमात्र मार्ग उत्पीडनातून मुक्त होण्याचा होता. हेच विशेष कारण आहे की पुष्यमित्राने मौर्य साम्राज्याच्या विरूध्द विद्रोहाचा झेंडा उभा केला. पुष्यमित्र हा गोत्राने सुंग ( sung ) होता. सुंग हे सामवेदी ब्राम्हण होते. त्यांचा पशुहत्येवर विश्वास होता आणि सोम हत्येवरसुध्दा. म्हणून संपूर्ण मौर्य साम्राज्यामध्ये पशुहत्येवर बंदी घातल्यामुळे आणि अशोकाद्वारे ठिकठिकाणी शिलालेखामध्ये तशाप्रकारच्या घोषणा लिहिण्यात आल्यामुळे सुंगांची तळपायाची आग मस्तकात जाणे स्वाभाविक होते. यात मुळीच आश्चर्य नाही की, पुष्यमित्र जो एक सामवेदी ब्राम्हण होता, त्याचे पहीले काम होते की ब्राम्हणांच्या अधपतनाला जबाबदार बौध्द साम्राज्य नष्ट करणे व ब्राम्हणांचे वर्णवर्चस्व स्थापित करणे आणि ब्राम्हणांना त्यांच्या ब्राम्हण धर्माच्या आचरणाचे पालन करण्यास स्वातंत्र्य मिळवून देणे.
( प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती : लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर )

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे आपल्याला सहज लक्षात येते ती बाब म्हणजे सम्राट अशोक यांच्या विषयी ब्राम्हणांच्या मनात त्यांचा प्रति किती राग किती मत्सर भरलेला होता व त्यातून “काही” ब्राम्हणी इतिहासकारांनी त्यांचे चरित्र मलीन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यांची री काही ईतर इतिहासकार ओढताना दिसतात.

सम्राट अशोक यांचा जीवनपट.

प्रियदर्शी सम्राट अशोक

इ स पूर्व ३०४ : जन्म
इ स पूर्व २८६ : उज्जैन येथे नेमणूक
इ स पूर्व २८६ : विवाह
इ स पूर्व २८४ : मुलगा महेंद्र यांचा जन्म
इ स पूर्व २८२ : मुलगी संघमित्रा हिचा जन्म
इ स पूर्व २६२ : कलिंगविजय
इ स पूर्व २६० : बौध्द धम्माचा स्वीकार केला
इ स पूर्व २३५ : कुणालची तक्षशिलेला नेमणूक
इ स पूर्व २३१ : मृत्यू

( राज्यकारभार इ स पूर्व २७३ ते इ स पूर्व २३६ : ३५ वर्षांची कारकीर्द. )

१) मौर्य घराण्याचे संस्थापक चंद्र गुप्त मौर्य ( शिशुनाग वंशाच्या शेवटच्या सम्राटांच्या कुटुंबाशी संबंधित होते ,म्हणून म्हणता येईल की, चंद्रगुप्त मौर्या यांनी जी क्रांती केली ती वास्तविकपणे मगधमध्ये नाग साम्राज्याची पुनर्स्थापना होती. )

२) सम्राट बिंदुसार ( वडील ) , शुभद्रांगी ( आई )

३) सम्राट अशोक यांच्या पत्नी : १) कारूवाकी २) तिष्यरक्षीता ३) असंघमित्रा ४) पद्मावती

४) मुले : १) महेंद्र २)संघमित्रा ३) कुणाल

५) सख्ख्या भाऊ : तिष्य जो लहानपणापासून बौध्द भिख्खू बनला होता.

६)सावत्र भाऊ : सुशिम ( सुशिमचा मुलगा निग्रोध )

७) कुणालचा मुलगा : दशरथ

कालाअशोक / काकवर्ण : जन्म इ स पूर्व ३९५ मृत्यू इ स पूर्व ३६७ ( यांच्या कारकिर्दीत दुसरी धम्म संगिती भरवली गेली होती ) यांच्यात आणि सम्राट अशोक यांच्यात तब्बल ६३ वर्षांचा फरक आहे ( अशोक जन्म इ स पूर्व ३०४ मृत्यू इ स पूर्व २३१ ) या दोन व्यक्तिरेखांना एकत्रीत करुन मांडण्याचा देखील खटाटोप काही इतिहासकारांनी केला सम्राट अशोक यांच्या आईचे नाव शुभद्रांगी म्हणजे गोरा रंग या अर्थी शुभद्रांगी असे समर्पक नाव त्यांचे होते म्हणजे सम्राट अशोक हे काळे करूप नक्कीच नव्हते.

प्रांतअधिकारी म्हणून इ स पूर्व २८६ व्या वर्षी त्यांना उजैनीचा बंड शमवण्याची जबाबदारी देण्यात आली होती तेव्हा ते अगदीच तरूणपणाच्या उंबरठ्यावर होते या वयात त्यांनी समंजसपणे आणि आपल्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणांनी उजैनचा बंड सामोपचाराने मोडीत काढला ही घटना सूचक आहे की सम्राट हे शीघ्रकोपी देखील नव्हते नाहीतर युध्द प्रसंग निर्माण झाला असता तसे न होता हा बंड प्रेमाने सामोपचाराने शमवण्यात आला यांच्यातून त्यांचे संयमित वागणेच समोर येते तर दुसरी घटना त्याच काळातील आहे उजैनला जाण्या आधी ते विदिशा येथे काही काळ वास्तव्यास होते इथली एक महत्त्वपूर्ण घटनेचा ती म्हणजे सम्राट अशोक यांच्यावर लहानपणापासूनच बौध्द धम्माचे संस्कार होते ते या घटनेवरून सिध्द होते.
खालील दिलेल्या उतार्यावरून ते अधिक स्पष्ट होते.
सम्राट अशोकच्या साम्राज्यात ब्राम्हणी तत्वज्ञान, आजीवक तत्वज्ञान, लोकायत तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान, बौध्द तत्वज्ञान अशा मतप्रवाहचे लोक समाजात गुण्यागोविंदाने रहात होते. कलिंग युध्दात झालेली जीवितहानी पाहून व्यथीत होऊन सम्राट अशोक बौध्द तत्वज्ञानाकडे आकृष्ट झाला असे अनेक लोक सांगत असले तरी सम्राट अशोकाच्या मनावर तरूणपणापासूनच बौध्द तत्वज्ञानाचा प्रभाव होता हे आवर्जून सांगणे मला अधिक महत्त्वाचे वाटते. भारताच्या इतिहासाचे सखोल अभ्यासक, ब्रिटिश माता पित्यांच्या पोटी भारतातील कानपूर शहरात १९४० साली जन्मलेले चार्ल्स अॅलन यांनी सम्राट अशोकाचा सखोल अभ्यास करून तरूण अशोकाच्या मनावर बौध्द तत्वज्ञानाचा प्रभाव होता, या सत्यावर भारतीय तथाकथित विद्वानांनी टाकलेला पडदा सप्रमाण दूर केला आहे. या सत्याचे प्रमाण म्हणून चार्ल्स अॅलन यांनी मध्यप्रदेशातील पांगुरारीया ( प्रत्यक्ष नक्तितालाई ) या खेड्याजवळ इ स १९७१ मध्ये सापडलेल्या सम्राट अशोकाच्या शिलालेखाचा दाखला दिला आहे.
सम्राट अशोक युवराज असताना उजैन प्रांताचा प्रमुख होता, उजैन पासून सुमारे सव्वाशे कि मी वर विदिशा हे ठिकाण आहे. विदिशा नगरीतील व्यापाऱ्याची कन्या “देवी विदिशा” हिच्याशी त्याचे अनुबंध जुळले होते. याचा लिखित पुरावा भोपाळपासुन काही अंतरावरील होशिंगबाद शहरापासून जवळ असलेल्या एका लहान खेड्याजवळ सापडलेल्या सम्राट अशोकाच्या शिलालेखाच्या वरच्या भागात दिसतो. विदिशा पासून सुमारे सव्वाशे कि मी वर सलकनपुर हा डोंगराळ प्रदेश आहे. या सलकनपुर जवळ डोंगराच्या गावाजवळच नक्तितालाई हे अगदीच लहान खेडे आहे. या खेड्याच्या जवळ डोंगराच्या उतारावर हा शिलालेख आहे. हा शिलालेख मी १० फेब्रुवारी २०१९ रोजी प्रत्यक्ष पाहीला. नक्तितालाई हे खेडे खूपच लहान असून ते पांगुरारीया या गावाच्या अंतर्गत येत असल्यामुळे या शिलालेखाला पांगुरीया शिलालेख म्हणतात.
या शिलालेखाचा देवनागरी लिप्यांतर खालीलप्रमाणे आहे.

“पियदसि नाम राजकुमार व संवसमाने (इ)मं देस पपुनिथ विहारयाताये”

या शिलालेखाचा प्रथम अनुवाद तत्कालीन भारतीय पुरातत्व आणि इतिहासकार दिनेशचंद्र सरकार यांनी केला होता तो पुढील प्रमाणे : The King named Piyadarin ( speaks) to Kumar Samva from ( his) march ( of pilgrimage) to Upanitha -Vihara (or Opunitha -Vihara) in Manema Desa.

याच लेखाचा इंग्लिश अनुवाद बर्लिन शहरातील विद्यापीठातील भारतीय इतिहास तज्ञ प्रो हॅरी फाल्क यांनी खालील प्रमाणे केला आहे.

The King who is called Piyadassi, (Once) came to this place on pleasure tour while he was still a prince, living together with his ( unwedded) consort.

चार्ल्स अॅलन यांचा अशोक राजकुमार संव, उपनिथ विहार आणि मनेमा देश या डि सी सरकार यांनी मांडलेल्या संकल्पना कपोल कल्पित वाटतात. कारण सम्राट अशोक संव नावाचा राजकुमार होता असा कोणताही उल्लेख आजवर संशोधिलेल्या इतिहासात नाही. शिवाय उपनिथ विहार आणि मनेमा देश असे कोणतेही स्थान कोणाही इतिहासकाराला आजवर सापडलेला नाही. म्हणूनच मी या वाक्याचा मराठी अनुवाद असा केला आहे ” प्रियदर्शी नावाचा युवराज मैत्रीणी सोबत या प्रदेशात सहलीला आला होता”
( संवस : सोबती, पापुणणति : पोहचतो, विहारो : मनरंजन, याति : जातो )

देवी विदिशा ही बौध्द तत्वज्ञान मनणार्या कुटुंबात जन्मलेली असल्याने स्वत: देखील बौध्द विचार मानणारी होती. पुढे या तरुणीशी अशोकाने विवाह केला आणि अशोकाचा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना जन्म दिला. महेंद्र आणि संघमित्रा हे दोघेही तथागताच्या संघात प्रवेश करून बौध्द तत्वज्ञान प्रसारासाठी श्रीलंकेला गेले. उजैन प्रांताचा प्रमुख असलेला, सम्राट बिंदुसाराचा राजपुत्र अशोक, उजैन पासुन सव्वाशे किलोमीटर अंतरावरील विदिशा नगरीत राहणार्‍या मैत्रीणी सोबत, केवळ ती बौध्द तत्वज्ञान मानते म्हणून पुन्हा सव्वाशे किलोमीटर अंतरावरील डोंगरात राहणार्‍या बौध्द भंतेंना भेटण्यास जातो, ही गोष्ट सहजपणे दुर्लक्षीण्याजोगी निश्चित नाही. त्याच काळात तरूण अशोकाची बौध्द तत्वज्ञानावर श्रध्दा असल्याशिवाय असे होणे शक्य नाही. ( बौध्द तत्वज्ञानासक्त सम्राट अशोक : लेखक, अशोक तपासे )

वरील उतार्यावरून हे स्पष्ट होते की तरूण वयातच सम्राट अशोक हे बौध्द धम्माकडे आकृष्ट झाले होते तर त्यांची कन्या हिचे नाव देखील त्यांनी बौध्द धम्माला अनुसरून ठेवले होते. “संघमित्रा” : संघाची मैत्रीण.

चक्रवर्ती सम्राट अशोक यांना ९९ भाऊ होते असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना मारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तर सुशीम यांची लढाई दरम्यान खंदकात पडुन मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सोडल्यास शिलालेखातून सम्राट स्पष्टपणे म्हणतात की माझे भाऊ राज्यात राहतात व ते विहार करतात यावरून त्यांचे त्यांच्या भावांशी चांगले संबंध होते.

मागिल काही शतकातच प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे चरित्र काही मोजक्या ब्राम्हणी इतिहासकारांनी मलिन करण्याचा प्रयत्न केला व त्यात ते चांगल्याप्रकारे यशस्वी देखील झाले आहेत नाहीतर आपल्या साम्राज्यातील जनतेला आपल्या लेकरा समान वागवणार्या लोककल्याणकारी सम्राटांना इथल्या जनतेने विस्तृत जाऊ दिले असते का, तर येत्या २०/४/२०२१ रोजी चैत्रशुक्ल अष्टमीला या महान सुपुत्राची म्हणजे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२५ वी जयंती येत आहे ती प्रत्येक नागरिकांने जल्लोषात आणि सम्राटांना साजेशी अशी साजरी करायला हवी….!

जंबुद्विपाचे महान सुपुत्र लोककल्याणकारी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांना त्यांच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन…. 🙏🏻🙏🏻🙏🏻

संदर्भ :

१) प्राचिन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती : लेखक, डॉ बाबासाहेब आंबेडकर.

२) प्रियदर्शी सम्राट अशोक : लेखक, महेंद्र शेगांवकर

३) बौध्द तत्वज्ञानासक्त सम्राट अशोक : लेखक, अशोक तपासे

सूरज रतन जगताप (लेणी अभ्यासक )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments