Thursday, August 27, 2026
Homeब्लॉगफाल्गुन पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व - *" तथागतपुत्र राहुल याची धम्मदीक्षा ."

फाल्गुन पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व – *” तथागतपुत्र राहुल याची धम्मदीक्षा .”

  • फाल्गुन पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व – *
    ” तथागतपुत्र राहुल याची धम्मदीक्षा .”
  • वारसा …. बुद्धत्वाचा…!!! * ” अजिंठा येथील लेणी क्र.१७ च्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर , खालच्या बाजूला असलेले हे शिल्प म्हणजे अजिंठ्याच्या सर्व शिल्पांमध्ये मला भावलेले, मनाला चटका लावून जाणारे असे हे शिल्प आहे. कुणा एका अनामिक शिल्पकाराने मोठ्या श्रद्धेने बुद्धाप्रति समर्पित होऊन आपले भाव व भावना या शिल्पापध्ये मोठ्या प्राणपणाने ओतूनच हे भावस्पर्शी शिल्प येथे कोरलेले आहे.
    या शिल्पातील प्रसंग व आशय असा आहे….
    बुध्दत्व प्राप्त केल्यानंतर तथागत प्रथमच कपिलवस्तू येथे पिता शुद्धोधन महाराज यांच्या विनंतीवरून आलेले आहेत. त्या दिवशी असलेल्या फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधून , या दिवशी तथागतांच्या धम्मदेसनेचा लाभ आपल्या प्रजाजनांना व्हावा म्हणून शुद्धोधनाने केलेल्या विनंतीवरुन प्रजाजनांना धम्माचा उपदेशही त्यांनी प्रजेला केलेला आहे…तथापि, शुद्धोधनाची त्यांना आणखी एक आग्रहाची विनंती आहे, की आल्यासरशी निदान एकदा तरी तथागतांनी घरी यावे…त्या विनंतीला मान देऊन ते घरी यायला तयार झालेत….गृहत्याग करून निघून गेलेला आपला राजपुत्र खूप दिवसांनी परत आला आहे, असे समजून प्रजाही मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत करत आहे.राजप्रासादात आल्यावर राजपरिवारानेही मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत केले आहे ….परंतु, यशोदा मात्र कुठेच दिसत नाही…तिचा पती परत आला आहे, असा खुद्द शुद्धोधनाने निरोप पाठविला, तरीही ती स्पष्टपणे असे कळविते, की ” खरोखर, त्यांना पत्नी म्हणून जर माझा काही मान ठेवायचा असेल, तर तथागतांनी स्वत:इथे, माझ्या या महालात येऊन मला भेटले पाहीजे….” तिच्या या इच्छेचा मान राखून तथागत तिला तिच्या महालातच भेटण्याचे ठरवतात , व सोबत असलेले आपले शिष्य सारिपुत्त व मोग्गलान यांना सांगतात…” मी जरी सर्व पाशांतून,बंधनांतून मुक्त झालो असलो, तरी यशोधरा अद्याप त्यापासून मुक्त झालेली नाही. बरीच वर्षे तिने मला पाहिले नसल्याने,तिच्या भावना उचंबळून येणे शक्य आहे. भावनेच्या भरात जर तिने मला स्पर्श केला, तरी तुम्ही तिच्या आड येऊ नये….” यशोधरेकडे येत असतांना , यशोधरा आपला सात वर्षे वयाचा पुत्र राहुल , यास तथागत येत असलेले दुरूनच दाखवून , ती त्यास म्हणते….”धीर गंभीर चालीने आपल्याकडे येत असलेले…सर्व श्रमणांच्या मध्यभागी असलेले, व आपल्या ज्ञानाच्या तेजाने तळपत असलेले…नरांमध्ये सिंहासारखे उठून दिसणारे ते तुझे पिता आहेत….मी अजूनही न पाहिलेल्या , मौल्यवान अशा द्रव्यांच्या मोठमोठ्या खाणी त्यांच्याजवळ आहेत , तर…जा ,आणि त्या संपत्तीचा वारसा तू तुझ्यासाठी माग…कारण, पित्याची संपत्ती ही पुत्राला मिळालीच पाहीजे….!” तीचे हे उद्गार ऐकून, धीरगंभीर चालीने आपल्या जवळ येत असलेल्या तथागतांना मोठ्या लीनतेने वंदन करून राहुल म्हणतो…” आपण माझे पिता आहात ना…? ” मग त्यांच्या जवळ उभा राहून तो म्हणतो… ” हे श्रमणा…! आपली छाया देखील आनंदमय आहे…”

अजिंठ्याच्या या शिल्पात यशोधरा बाल राहुलला आपले पिता तथागत बुद्ध यांचेकडे आपला वारसा हक्क मागण्यास सांगत आहे…. राहुलही आपल्या पित्याला मोठ्या कौतुकाने, कुतूहलमिश्रीत नजरेने प्रथमच बघत आहे….आता आपले वडील आपल्याला काय वारसा देणार, याची उत्सुकता त्याच्या नजरेत दिसून येते…आणि तथागत बुद्ध…? ते तर केव्हाच मर्त्य मानवाची जीवनगती पार करून, क्षितीजापेक्षाही उंच झालेत…खूप मोठी , अध्यात्मिक अशी उंची त्यांनी गाठली आहे….त्यांचे व्यक्तीमत्व इतके उंच आहे, की त्यापुढे सारे जगच खुजे वाटत आहे….राहुलपुढेही मोठा प्रश्न पडला आहे, की आता आपला पिता आपल्याला काय वारसा देणार आहे…? तो ही मोठ्या आशेने तथागताकडे बघत आहे….आणि तथागत…? आपल्या एकुलत्या एका मुलाला तब्बल सात वर्षांनंतर पाहून देखील ते शांत आहेत…कमालीची स्थितप्रज्ञता त्यांच्या मुद्रेवर झळकत आहे….तेच परिचित स्मितहास्य त्यांच्या ओठांवर विलसत आहे….आणि त्यांचे डोळे…? हो…त्यांत संपूर्ण विश्वातील प्राणिमात्रांबद्दलची अपार करुणा व वात्सल्य ओथंबून वाहत आहे…ते ही विचारात पडले आहेत…” पुत्राने आपल्याकडे त्याचा वारसा मागितला आहे…तो त्याचा हक्कच आहे, आणि त्याचा पिता म्हणून त्याला तो देणे, हे आपलेही कर्तव्यच आहे…परंतु , हे राजवैभव, हे उत्तुंग राजप्रासाद, या दास-दासी, हा राजकोष….कधीच या सर्वांचा कायमचा त्याग केला आहे आपण…मग, याला काय बरे द्यावे….? आपल्या जवळ, आपले म्हणून असे काय आहे, जे याला आपण वारसा म्हणून देऊ शकतो….?चिंता, आणि दु:ख उत्पन्न करणारे,नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही….परंतु, ज्याचा कधीही क्षय होणार नाही, अशा पावन जीवनरुपी धनाचा वारसा मात्र मी याला देऊ शकतो….हो , निश्चीतच देऊ शकतो….!”
मग, अत्यंत आस्थेने तथागत राहुल ला म्हणतात….” सोने, रूपे, आणि रत्ने यांपैकी तुला देण्यासारखे माझ्याजवळ काहीही नाही, परंतु अध्यात्मिक ,व चिरंतन टिकणारे असे स्विकारण्यास जर तू तयार असशील….आणि , त्याचा भार वाहून नेण्यास व ते जतन करुन ठेवण्यास जर तू समर्थ असशील,तर ते धन मात्र माझ्याकडे विपुल प्रमाणात उपलबद्ध आहे…त्याचा तू वारसा म्हणून स्वीकार करशील काय….? “
राहुल ने मोठ्या आनंदाने स्वीकार करण्यास तयार असल्याचा होकार देताच…..आपले भिक्षापात्र राहुलकडे सोपवून तथागत उद्गारतात….” हे भिक्षापात्र हाच माझा तुला वारसा आहे, आणि माझ्या धम्माचा मार्ग हेच ते विपुल धन आहे….!” नंतर सारिपुत्त व मोग्गलानकडे एक दृष्टीक्षेप टाकून तथागत उद्गारतात….”परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी ज्यांनी आपले जीवन वाहीले आहे, अशांच्या संघात प्रवेश मिळावा, अशी तुझी इच्छा आहे काय….?”
जिने पित्याचेही प्रेम देऊन, मोठ्या लाड-कौतुकाने सात वर्षे त्याचा संभाळ केला, त्या माता यशोधरेकडे न पाहता, दृढतेने…मोठ्या निश्चयाने सात वर्षांच्या त्या बालकाने…राहुलने उत्तर दिले…” होय , भगवन्…!” त्याच्याकडे त्याच कारूण्यमय नजरेने पाहून , समाधानाने तथागत उद्गारले….” एहि भिक्खवे…..!!!” —– अशोक नगरे —- ( बौद्ध इतिहास-बौद्ध संस्कृती ).

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments