
अभिनेते अरुण गोविल यांना चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळत नव्हती, कारण त्यांना प्रेक्षकांनी नेहमीच ‘भगवान राम’ म्हणून पाहिले. त्यांनी केवळ अशाच भूमिका साकाराव्यात, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. अरुणने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, रामायणामुळे त्यांच्या आयुष्यात काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी घडल्या. अरुण गोविल म्हणाले की, ‘या भूमिकेमुळे मला खूप सन्मान मिळाला. पण, त्यामुळे मला व्यावसायिक चित्रपट मिळत नव्हते. सर्व निर्माते-दिग्दर्शक मला सांगायचे की, माझी प्रभू रामाची प्रतिमा इतकी मजबूत आहे की, मला इतर कोणती भूमिका द्यायची तेच त्यांना समजत नाही. लोकांना तुमच्यात फक्त रामच दिसतो. त्यांना तुम्हाला इतर कोणत्याही भूमिकेत बघायचे नाही, असे निर्माते म्हणायचे.’








