लक्षवेधी: ‘सेरेंडिपिटी’ : विलक्षण नाटके, वेधक प्रयोग

0
22
लक्षवेधी: ‘सेरेंडिपिटी’ : विलक्षण नाटके, वेधक प्रयोग


डॉ. अनमोल कोठाडिया5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या स्थळांवर रंगलेले ‘पोस्टकार्डस् फ्रॉम गोवा’.

गोव्यात दरवर्षी होणारा ‘सेरेंडिपिटी आर्टस् फेस्टिवल’ नुकताच जल्लोषात पार पडला. या महोत्सवाच्या यंदाच्या सहाव्या आवृत्तीतही इन्स्टॉलेशन्स, संगीत, नृत्य, फूड लॅब असे बरेच वैविध्य होते. विशेषत: यावेळी सादर झालेली नाटके तर विलक्षण वेधक आणि अक्षरशः थक्क करणारी होती.

‘सेरेंडिपिटी आर्टस् फेस्टिवल’ ही आता नाटकवेड्या रसिकांची वार्षिक पर्वणी ठरू लागली आहे. या वर्षीच्या महोत्सवातील नाटकांचे विषय आणि सादरीकरण तर केवळ अफलातून होते. ‘पोस्टकार्डस फ्रॉम गोवा’ हे विक्रम फुकान लिखित, दिग्दर्शित ‘विहार-नाटक’ कलाकार आणि प्रेक्षकांनी खऱ्याखुऱ्या विविध स्थळांवर चालत जाऊन खेळले. सिद्धांत सेठ, पद्मा दामोदरन, तन्वीक परळीकर, पारुल राणा, जयप्रकाश कुमार, साहिर मेहता यांनी त्यात अभिनय केला. एड्सविषयीचे जनजागरण असो वा विविध लिंगभाव असणाऱ्या व्यक्तींना समजून घेणं असो; त्याबद्दल समाजामध्ये सजगता निर्माण करण्याचा प्रत्ययकारी प्रयत्न यातून केला होता.

पणजीतील ओल्ड जीएमसी बिल्डिंगमधील एका खोलीसमोर अपेक्षित प्रेक्षकवर्ग जमू लागला, तसा त्यांचा व्हाट्स ॲप ग्रुप बनवण्यात आला. नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यावर येणाऱ्या काही ऑडिओ फाइल्स ऐकणे अपेक्षित होते. बंद दारासमोर एका नर्सच्या व्यक्तिरेखेने येऊन प्रेक्षकांशी संवाद सुरू केला अन् हे नाटक सुरू झाले! गोव्यातील ‘डॉमनिक डिसूझा’ या पहिल्या एड्स बळीची व्यथा सांगत, प्रेक्षकांना घेऊन तिने खोलीत प्रवेश केला. तेथे प्रेक्षकांना सेटल केल्यावर ती बळी पडलेली व्यक्तिरेखाही सादर झाली.

भिंतीवर त्या घटनेसंदर्भातील बातम्या, छायाचित्रे, मुलाखती प्रक्षेपित होत राहिले. या प्रसंगानंतर प्रेक्षकांना बाहेर पडून, रस्ता क्रॉस करून मांडवी नदीच्या तीरावरच्या पादचारी मार्गावर पोचण्याच्या सूचना मिळाल्या. तेथे ट्रान्सजेण्डर व्यक्तिरेखा त्याच्या स्ट्रेट मैत्रिणीशी संवाद साधताना दिसली. मग त्यांना फॉलो करत आम्ही आणखी पुढे गेलो. पुन्हा रस्ता क्रॉस केल्यावर मार्केट बस स्टॉपवर दोन अनोळखी ट्रान्सजेंडर व्यक्ती एकमेकांशी सांकेतिक पद्धतीने जवळीक साधत आपल्या व्यथाही सांगत होत्या. तेथून मार्केटमध्ये गेल्यावर एका लेस्बियन मुलीची आई भेटते. ती लिंगभावाविषयी, तिच्या जोडीदाराविषयी उदारमतवादी आहे. मात्र, जोडीदाराच्या व्हेगन असण्याविषयी मात्र तिचा आक्षेप आहे. तेव्हा तिच्यासाठी केलेला नॉनव्हेज खाऊ ती प्रेक्षकांनाच वाटून टाकते. मग तिथून प्रेक्षकांना एका रस्त्यावर नेण्यात आले. तिथे दोन लेस्बियन मुली एकमेकींशी गप्पा मारत चालत निघालेल्या होत्या. त्यांना काही विशिष्ट अंतरावरून फॉलो करत प्रेक्षक त्यांच्या गप्पा हेडफोनवर ऐकत होते.

पुढे एलजीबीटीक्यू मॅरेथॉनमध्ये एका ट्रान्सजेंडर जोडीचा संवाद घडला. त्यावेळी या नाटक मॅरेथॉनमध्ये सहभागी प्रेक्षकांनाही एनर्जी ड्रिंक उपलब्ध होते. पुन्हा एका कोपऱ्यावर लेस्बियन संवाद, तो चालू असताना अचानक शिट्टीचा आवाज, मुली पळून जातात.. तिथे वाजंत्रीवाल्यांचे कपडे घातलेला शिट्टीवाला कार्यकर्ता येतो. तो रस्त्यावरून चालताना वाहतूक नियंत्रित करत प्रबोधनात्मक बोलत राहतो. पुढे बागेतला एक प्रसंग झाल्यावर आम्ही पुन्हा चालू लागलो. काही अंतर गेल्यावर गोव्यातील पहिल्या, जाहीरपणे समलिंगीपण मिरवणाऱ्या ‘पद्मश्री वेंडेल रॉड्रिग्ज’ या फॅशन डिझायनरच्या बंगल्यापर्यंत आपण पोहोचलो असल्याची जाणीव करून देत या नाट्यप्रयोगाने विराम घेतला.

उंच इमारतीच्या टेरेसवरून आत्महत्या करू पाहणाऱ्या उच्चभ्रू तरुणीला एक कॅबचालक वाचवतो आणि त्यानंतर त्यांच्यात घडणारा आंतरसंवाद, असे कथानक असणारे ‘जंप’ हे नाटक प्रत्यक्षात मल्टिपल पार्किंग इमारतीच्या टेरेसवरच घडवले होते. लेखक, दिग्दर्शक मनीष वर्मा यांनी या टोकाच्या परस्परविरोधी व्यक्तिरेखा एकत्र आणताना निव्वळ मनोरंजन साधले नाही, तर वर्गीय, भाषिक, राजकीय, सामाजिक, लैंगिक, सांस्कृतिक, मानसिक अशा अनेक पातळ्यांवरून एक आशयात्मक जंप देखील घेतली आहे.

सेटअपला साजेसे नेपथ्य आणि खुल्या अाकाशाखाली असल्याने ध्वनी आणि प्रकाशयोजनाही अत्यंत आशयपोषक आणि कमालीची नियंत्रित होती. ग्लॅमरस विदुषी चड्ढा अभिनयही ताकदीने करते. संदीप शिखरचा विनासायास अभिनय काळजाला हात घालतो. त्याच्या वावरातून सर्वसामान्यांतील असामान्यत्व पाझरत राहते. वास्तवाचे आश्वासक भान देणारी ही ‘जंप’ शहाणीव असणाऱ्या शिखरावर पोचविते.

‘अॅव्हलांच’चा अर्थ हिमस्खलन. ही सर्वसाधारण घटना कधीकधी संपूर्ण गावाचा बळी घेणारी ठरू शकते. हीच पार्श्वभूमी असणारे तुर्की नाटक गंधर्व देवाण याने अगदी बर्फाळ प्रदेशातील सारा माहोल साकारून हिंदुस्तानी भाषेत सादर केले. प्रस्थापित रंगमंच नसलेल्या एका संपूर्ण हॉलचे रूपांतर बर्फाळ प्रदेशातील घरात केले होते. आत जाताना तशा प्रादेशिक वेशभूषेतील अभिनेते, प्रेक्षकांच्या रूपातील अतिथींचे हळू आवाजात स्वागत करताना त्यांना पांघरायला घोंगडी देत होते. तिथले तापमान जाणीवपूर्वक अतिशय कमी ठेवले होते. या गंभीर शांततेला छेदणारा बर्फाळ प्रदेशातील साउंड स्केप पार्श्वध्वनी म्हणून प्रयोग सुरू होण्याआधीच वातावरणनिर्मिती करू लागला होता. आणि अशातच नाटक सुरू झाले.. अशा प्रदेशात अगदी आवाजानेही हिमस्खलन होण्याची शक्यता वाढते, तेव्हा कोणताही आवाज केला जात नाही. बंदुकीचा बार उडवला जात नाही. एवढेच काय, त्या काळात प्रसूती होऊ नये, म्हणून आधीपासूनच काळजी घेतली जाते. अशा स्थितीत एका घरात असणाऱ्या गर्भवतीला प्रसूतीपूर्व कळा येऊ लागतात आणि त्या कुटुंबावर असणाऱ्या ताणाचा दबाव मग व्यक्तिरेखांसोबत प्रेक्षकांवरही पडू लागतो. कथानकातील दबावासोबत अप्रत्यक्षपणे समाजव्यवस्थेतील मुस्कटदाबीही दर्शवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करतो.

‘फूटप्रिंट्स इन ब्लड’ या नृत्यनाटकातून मणिपूरच्या इतिहासातील व्यवस्थेच्या विरोधातील संघर्षांच्या स्त्रीवादी गाथा समोर येतात. यात मणिपुरी अभिजात नृत्य, लोकनृत्य, द्वंद्वकला यांचा वापर करून घेताना केवळ पुरणगाथा न मांडता समकालीन संघर्षशील वास्तवाची प्रत्ययकारी मांडणी केली आहे. हा प्रयास आपल्याकडील अभिजात नृत्यकारांनी लक्षात घ्यायला हरकत नाही.

अग्रक्रमाने बालप्रेक्षकांसाठी असणारे ‘सगळे जण खेळतात’ आणि “द लँड ऑफ मीआ लिलो’ हे अतिशय लवचिक अभिनयाचे प्रगल्भ प्रयोग होते. रंगमंच अगदी संपतो, तिथे बसलेल्या बालप्रेक्षकांचा कायिक प्रतिसाद अनुभवणे हे देखील प्रयोगांच्या आनंदाचे मूल्यवर्धन करत होते. क्वेस्ट (सोनाळे) निर्मित, सानंदा मुकोपाध्याय दिग्दर्शित ‘सगळे जण खेळतात’मध्ये मयूर सरकाळे, योगेश्वर बेंद्रे, दामिनी जाधव, हर्षला शर्मा, ऋषिकेश प्रधान, विकास कांबळे ही कलाकार मंडळी वेगवेगळ्या पशु-पक्ष्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये येऊन त्यांचे विविध खेळ रंगतदार पद्धतीने सांगतात. दीप्ना डॅरीअनानी आणि प्रियांका बब्बर यांनी सर्जित आणि लवचिकपणे अभिनित केलेल्या ‘द लँड ऑफ मीआ लिलो’मधून मीआ आणि लिलो या व्यक्तिरेखा आपल्याला लपवलेल्या अनेक वस्तू असलेल्या अद्भूतरम्य जगात घेऊन जात निखळ आनंद देतात.

संपर्कः cineanmol@yahoo.co.in



Source link