लोक – संचित: न गमेसी जाली दिवस रजनी…

0
18
लोक – संचित: न गमेसी जाली दिवस रजनी…


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Purvani Lok Sanchit Written By Praveen Dashrath Bandekar 

प्रवीण दशरथ बांदेकर8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

लोकांमध्ये मिसळून काळाबरोबर सतत वाहतं राहिलेलं हे जे काही आहे, तेच माझ्यासाठी लोकसंचित आहे. ते जसं तुकोबांच्या अभंगांमधून पाझरत राहिलं आहे, तसंच ते ज्ञानोबा माऊलींसह अनेकानेक संतकवींच्या रचनांमधूनही आपल्या समाज व्यवहारामध्ये मिसळून गेलं आहे. आपण वापरत असलेले असंख्य शब्दप्रयोग, वाक्प्रचार, म्हणी, लोककथा, मौखिक साहित्य अशांमधून ते प्रकटत असतं. आपल्याला सहजासहजी जाणवूही नये इतक्या बेमालूमपणे हे लोकसंचित आपल्या सांस्कृतिक जगण्यात मिसळून गेलं आहे.

माझं हे सदर लेखन वाचणाऱ्या अनेक वाचकांचे ई – मेल येत असतात. लेख आवडल्याचं, त्यातील विचार जवळचे वाटल्याचं सांगणाऱ्यांबरोबरच शंका उपस्थित करणारेही काही जण असतात. काहींना एखादा विचार न पटल्यास मतभेदही नोंदवायचे असतात. काहींना एखाद्या लेखात कोकणी भाषा वा संस्कृतीच्या अनुषंगाने आलेल्या संदर्भाविषयी कुतूहल वाटत असतं. त्याविषयी जाणून घ्यायचं असतं. मध्यंतरी एकाने विचारणा केलेली, तुमच्या या सदर लेखनाचे शीर्षक ‘लोक -संचित’ आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे? तुम्हाला त्यातून काय अभिप्रेत आहे? म्हणजे अधूनमधून काही लेखांमधून तुम्ही तुमच्या बोलीभाषेविषयी, लोकसंस्कृतीविषयी वगैरे सांगता, त्यालाच आपलं लोक – संचित म्हणायचं असतं का?

आपलं लिहिलेलं वाचक नुसतंच वाचून सोडून देत नाहीत, तर ते वाचल्यावर त्यांना प्रश्नही पडताहेत, हे कुठल्याही लेखकाला सुखावणारं असतं. लिहिणाऱ्याच्या मनात जी काही अनेक प्रयोजनं असतात, त्यापैकी हेही एक असतं. वाचकांना प्रश्न पडू लागले की, लेखकालाही अधिक खोलात जाऊन चहू अंगांनी विचार करावा लागतो. अधिक जबाबदारीनं लिहावं लागतं. मायबोली मराठी समाज, भाषा, संस्कृती आणि जगण्याच्या धारणांमध्ये मिसळून गेलेला, एकरूप झालेला तुकोबांसारखा दुसरा कवी नसावा, हे सतत दिसत राहतं. तुकोबांना मराठी जनमानसाची आंतरिक लय अचूकपणे सापडली होती. त्यामुळेच रोजच्या जगण्याशी संबंधित अगदी साधी साधी उदाहरणं देत तुकोबांनी मऱ्हाटी मुलखातल्या लोकांच्या सगळ्या वृत्ती – प्रवृत्ती, स्वभाव विशेष, गुणदोष नेमकेपणाने मांडले आहेत. आज इतकी वर्षे झाली, काळाची इतकी उलथापालथ झाली, आधुनिक विज्ञान – तंत्रज्ञानाचा आधार घेत आपली दृष्टी पार बदलून गेली, जुनी मूल्ये कालबाह्य होत गेली, तरीही तुकोबांना दिसलेले आपले हे जे ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ असं काही तरी होतं, ते मात्र आजही आपल्याला सतत इथं तिथं आपल्या रोजच्या जगण्या-वागण्या-बोलण्यात दिसत राहिलेलं आहे. लोकांमध्ये मिसळून काळाबरोबर सतत वाहतं राहिलेलं हे जे काही आहे, तेच माझ्यासाठी लोकसंचित आहे. ते जसं तुकोबांच्या अभंगांमधून पाझरत राहिलं आहे, तसंच ते ज्ञानोबा माऊलींसह अनेकानेक संतकवींच्या रचनांमधूनही आपल्या समाज व्यवहारामध्ये मिसळून गेलं आहे. आपण वापरत असलेले असंख्य शब्दप्रयोग, वाक्प्रचार, म्हणी, लोककथा, मौखिक साहित्य अशांमधून ते प्रकटत असतं. आपल्याला सहजासहजी जाणवूही नये इतक्या बेमालूमपणे हे आपलं लोकसंचित आपल्या सांस्कृतिक जगण्यात मिसळून गेलं आहे.

काल – परवाचंच एक उदाहरण सांगतो. नागपूरहून माझे मित्र डॉ. प्रमोद मुनघाटे सर रत्नागिरीत भरलेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या साहित्य संमेलनासाठी आले होते. त्यांना गोव्यातील मनोहर विमानतळावरून उतरवून घ्यायला मी गेलो होतो. विमानतळावरून सावंतवाडीच्या दिशेने जाताना वाटेत लागणारी गोव्यातली काही छोटी छोटी गावं, पोर्तुगीज शैलीतील सुबक घरं, नारळा – पोफळीच्या बागा, डोंगर, नद्या वगैरे पाहताना आमचे हे सौंदर्यप्रेमी नागपूरकर मित्र हरखून गेले होते. वाटेत जागोजाग थांबायला लावून फोटो काढायचा आपला आवडता छंदही ते पूर्ण करीत होते. मध्येच एका घरासमोरच्या फाटकावर कोकणीत लिहिलेल्या एका पाटीवरच्या मजकुराने त्यांचे लक्ष वेधून घेतले. खरं तर, त्या पाटीवर तसं काही जगावेगळं लिहिलेलं नव्हतं. आपल्या रोजच्या परिचयाचाच तो मजकूर होता. फक्त ते गोवन कोकणी भाषेत लिहिलेलं असल्यानं मुनघाटे सरांना त्याचा अर्थबोध चटकन् झाला नसावा. त्या पाटीवर लिहिलेलं होतं, ‘सुण्यांपासत सावद’. मी म्हटलं, ‘कुत्र्यांपासून सावधान’, अशा अर्थाचं ते वाक्य आहे. कोकणी भाषेत सुणें म्हणजे कुत्रे.

माझं बोलणं ऐकताच मुनघाटे सर म्हणाले, ‘अरेच्चा! अहो, हा तर ज्ञानेश्वरीतील शब्द आहे..’ मी म्हटलं, ‘खरं आहे, पण संस्कृतमधल्या श्वान या शब्दाचं ते अपभ्रंश होऊन बोलीत आलेलं रूपही असू शकतं.’ ‘असू शकेल, पण बोलीभाषेत संतवाङ्मयातले असे असंख्य शब्द सापडतात. ते अशा वेगवेगळ्या बोलींतून संतांनी घेतलेत की, संतांच्या साहित्यातून बोलीत मिसळले असावेत, ते निश्चित करता येणं कठीण आहे.’ बोलता बोलता मग संत साहित्यात आढळणाऱ्या बोलीतल्या असंख्य शब्दांची, वाक्प्रचार, म्हणी वगैरेंची सहज आठवणारी उदाहरणे चर्चेत आली. अरते परते (इकडे तिकडे), मुरकूट (मच्छर), पाचारणे (विचारपूस करणे), धवळे (पांढरेशुभ्र), बावणे (कोमेजणे) यांसारखे कोकण नि गोमांतकातल्या आमच्या बोलींतले शब्द माझ्या नजरेसमोर होते. मनात आलं, कुठलीच भाषिक संस्कृती कधीच एकारलेली नसते. कितीतरी पिढ्यांच्या असंख्य माणसांनी आपापल्या परीने त्यात भर घातलेली असते. ती टिकवलेली असते. संत, कवी, विविध लोककला सादर करणारे कलाकार, कीर्तनकार, निरूपणकार, विचारवंत, पंडित, पत्रकार, भाषेचे अभ्यासक अशा सगळ्यांनी मिळून भाषेचं हे संचित वाढवलेलं असतं. पण, या सगळ्यांइतकीच सर्वसामान्य लोकांनीही हे संचित जपण्यासाठी आपलं योगदान दिलेलं असतं. वेगवेगळ्या सण – समारंभ वा विधी – उत्सवाप्रसंगी म्हटली जाणारी स्त्रीगीते, पारंपरिक लोकगीते, मौखिक कहाण्या, सांगोवांगीच्या गोष्टी यांचे निर्माते सामान्य श्रमिक, कष्टकरी लोकच असतात. त्यांच्याच रोजच्या जगण्यातल्या अनुभवांच्या गोष्टीच तर त्यात गुंफलेल्या असतात ना? म्हणजे एका अर्थी, हे आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेलं संचित, हे धन, आपल्याच वाडवडिलांनी आपल्यासाठी निर्माण केलं, टिकवलं आणि आपल्यापर्यंत पोचवलं आहे.

मला आठवतंय, डोक्यात राख घालून रागारागाने घर सोडून निघून गेलेले आजोबा घरी परतून यावेत, यासाठी आजी एका लाकडी परातीत मीठ भरून तिन्हीसांजेला ती परात घराच्या उंबरठ्यावर ठेवत असे. त्याच्या बाजूलाच पाण्यानं भरलेला तांब्या. कुतूहल वाटून मी कधी तरी आजीला विचारलेलं, ‘हे असं कशासाठी? असं केल्याने काय होणार आहे?’ त्यावर ती म्हणालेली, ‘पुता, घराच्या भायर गेलेल्या पुरुषासाठी करूचा असतां ह्या सगळा. दारावर ठेवलेल्या या मिठाच्या भांड्यामुळे तो जिथं कुठे असेल तिथं त्याला तहान लागेल मरणाची. कासावीस होईल त्याचा जीव. सोस लागेल, सुकून जाईल कंठ. मग पाण्यासाठी तडफडत तो इकडे तिकडे भटकत राहील. कुठेच त्याला पाणी मिळणार नाही. कसं मिळणार? पाण्याचं भांडं तर मी या मिठासोबतच इथं ठेवलं आहे. या पाण्याच्या ओढीनं तो घराच्या दिशेनं चालत येईल. बघशील तू, तुझो आजोबा घराकडे येतात की नाय ते..’

आणि मग आजी म्हणत असे तसंच व्हायचं. रागानं घर सोडून निघून गेलेले आजोबा काही दिवसांनी पुन्हा घरी परतायचे. तहान आणि भुकेने त्यांचा जीव कासावीस झालेला असायचा. कित्येक दिवस काहीच न खाल्ल्यापिल्यासारखी त्यांची दशा झालेली असायची. पार रया जाऊन अवतार झालेला असायचा. आल्या आल्या ते आजीनं दिलेल्या तांब्यातलं पाणी घटाघटा प्यायचे. खोल गेलेल्या डोळ्यांनी रोखून आजीकडे पाहत पुटपुटायचे.. ‘माझे मज आता येतसे कळोनी, न गमेसी जाली दिवस रजनी..’

तुकोबांच्या अभंगांचे परिशीलन करताना, कधी तरी एकदा पीठ मळायच्या लाकडी काठवठात मीठ भरून उंबरठ्यावर ठेवून युद्धावर गेलेल्या घरधन्याची वाट पाहत तिष्ठत राहिलेल्या घरकारणीचा संदर्भ सापडला. तो अभंग वाचताना मला आजी आठवली. तिचं ते कासावीस होत आजोबांची वाट पाहणं आठवलं. मनात आलं, इथून तिथे वा तिथून इथे, नक्की कुठून कसं ते माहीत नाही, पण झिरपत झिरपत माझ्यापर्यंत आलेलं लोकसंचित यापेक्षा वेगळं असू शकतं का?

(संपर्क- samwadpravin@gmail.com)



Source link