- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Sadar Likhan Dr. Raja Kale On Pandit Kumar Gandharva
डॉ. राजा काळे16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कलाकारावर रागसंगीताचे कालजयित्व टिकवण्याची जबाबदारी असते आणि चांगले संगीत ऐकवून सुजाण श्रोते निर्माण करणे, हे त्याचे कर्तव्यच असते. कुमारजींसारखे असामान्य कलाकार कलेशी पूर्णत्वाने समर्पित असतात. ते पैसा आणि प्रसिद्धीची समीकरणे बांधून नव्हे, तर कलेच्या निस्सीम प्रेमामुळे संगीत क्षेत्रात आलेले असतात. कुमारजी या लौकिक लाभाकडे लक्ष न देता रागसंगीत, पारंपरिक बंदिशी, त्यातील शक्यता आणि कोडी उलगडत राहिले, म्हणूनच महान आणि कालजयी ठरले. पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, शास्त्रीय -उपशास्त्रीय संगीताचे अभ्यासक, स्वराभिषेक संगीत गुरुकुलाचे संस्थापक, ज्येष्ठ गायक डॉ. राजा काळे यांनी त्यांना केलेले भाववंदन…
असामान्य गायकीने ‘संगीतातील एक उद्गारचिन्ह’ म्हणून अवघ्या दहाव्या वर्षी गुरुजनांच्या कौतुकाचा विषय झालेले, भारतीय संगीतातील अद्वितीय कलाकार म्हणजे ‘पंडित कुमार गंधर्व’! संगीत ही गुरुमुखी विद्या आहे, तशी श्रवणविद्याही आहे. पण, त्याला आत्मकाजाची जोड असेल, तरच ती सार्थ ठरते. संगीतात ‘करता उस्ताद ना करता शागीर्द’ असे म्हटले असले, तरी एक श्रेष्ठ उस्ताद हा सर्वकाळ एक उत्तम शागीर्द असतो. कारण शागिर्दीशिवाय उस्तादी नाही. कुमारजींची शागिर्दी खऱ्या अर्थाने सुरू झाली, ती ‘कुमार गंधर्व’ हे बिरूद मिळवून गुरुवर्य बी. आर. देवधरांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर. तेथे त्यांना विविध घराण्यांच्या महान उस्तादांकडून पारंपरिक बंदिशी मिळाल्या. सांगीतिक साक्षरतेचे म्हणजे बंदिशीचे स्वरांकन (Notation) करण्याचे किंवा ते सुंदर करून गाण्याचे ज्ञान मिळाले. संगीतामध्ये मिळवलेल्या ज्ञानाला कर्तृत्वाची जोड असल्याशिवाय तुमच्या गाण्याचे गाणेपण सिद्ध होत नाही.
कुमारजींनी आपल्या आत्मकाजाने, अथक रियाजाने, जिज्ञासू वृत्तीने, चिंतन – मननाद्वारे गुरूंकडून मिळालेले ज्ञान आत्मसात केले. आपल्या गाण्यात काय असावे किंवा काय नसावे, याची व्यक्तिगत आवड – निवड आणि सौंदर्यविचारातून आपल्या गायकीला उच्च दर्जाचे कलात्मक परिमाण मिळवून दिले. आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत खान साहेब, गुरुवर्य बी. आर. देवधर आणि पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्यासारख्या थोर गुरुवर्यांनी आपल्या शिष्यांना काही हातचे न राखता विद्यादान केले, संगीताकडे खुल्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोनही दिला.
कुमारजींनी भारतीय रागसंगीताचे भावसौंदर्य आणि रागसंगीताची कविता, त्यातील गुंजाइश ओळखून स्वत:च्या अनोख्या अंदाजाने आपल्या दैवी स्वरलगावातून पारंपरिक तसेच स्वरचित रचनांत स्वरबद्ध करून सादर केली. त्यांच्या गायकी आणि रचनांमधील स्वरनाट्य हा संगीत अभ्यासकांसाठी आव्हानात्मक विषय आहे. केवळ रचनेच्या ‘कहन’मधून रागाचे स्वरशिल्प दाखवणे आणि त्याचा भाव जाणून रागाचाही विस्तार करणे या त्यांच्या दोन्ही गोष्टी विलक्षण होत्या. लोकधुनातून रागसंगीत आणि रागसंगीतातून लोकोन्मुख उपशास्त्रीय संगीत यामध्ये रचना स्वरबद्ध करून त्यांनी ते राग आणि रचना प्रस्थापित केल्या. म्हणजेच लोकसंगीताला शास्त्रोन्मुख केले आणि शास्त्रीय संगीताला लोकोन्मुख केले.
संगीतातील आपल्याला कळलेले मर्म संगीतसाधकांना आणि रसिकांना सांगण्याची आत्यंतिक कळकळ कुमारजींमध्ये होती. त्यांनी आपल्या बंदिशींमध्ये सूत्ररूपात संगीत साधकांना चांगला उपदेश केला आहे. उदा. सहेली तोडी रागातील… करम जानो गुनी, बहु रंग यक राग बनत बन जायो। धून में बसे राग सारे बनावे बन जायो।। नट रागातील… सपत सूर गावे गुणिजन। भाव राग ताल काल की उगम।। शुद्धकल्याण रागातील… रूप धरे रे जब साधन पूरन कर। सूर बन लय धाये रे।। एक ही सूर संग रे बहु, अंग ढंगसो पहचान करो रे।। राग निर्गुणरूपी आहे. ज्या काव्याबरोबर, ज्या लयीबरोबर तो जोडला जातो, तसा त्याचा भाव होतो. कुमारजी म्हणायचे, ‘राग तो नंगा है, उसे हम कपडे पहनाते हैं। गंभीर, करुणरस के राग दरबारी को भी हम नचाकर दिखा सकते हैं..’ अर्थात रागाच्या निर्गुण रूपाला बंदिशीच्या काव्यभावाचेच कपडे अनुरूप वाटतात आणि तोच रागाचा भाव होत असे.
बंदिशीतून रागविस्तार करताना प्रत्येक वेळी उत्स्फूर्त गानक्रिया करून एक आमद घेऊन समेवर येणे, अवतरित होणे, बंदिशींना खेळवणे, नाचवणे हा तर कुमारजींच्या गायकीचा अविभाज्य भाग होता. त्यांच्या आवाजात दिव्य स्वरलगावाची अनुभूती होती. त्याला निर्गुण तत्त्वज्ञानाची किनार होती, त्यातील फक्कडपणा होता. त्यांच्या सादरीकरणात कुठेही फाफटपसारा नव्हता. कबीर, तुकाराम महाराज, तुलसीदास, सूरदास, मीराबाई हे त्यांचे आवडते संतकवी होते. विशेषत: कबीरांचे तत्त्वज्ञान आणि निर्गुण भजनांचा त्यांच्यावर झालेला परिणाम त्यांच्या आचार – विचारांतून जाणवायचा.
गुरुवर्य पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या हृदयस्पर्शी रचनांचे आणि भावसौंदर्यवादी चतुरस्र गायकीचे शिष्यत्व निभावताना, मिरवताना मला कुमारजींच्या रचना व गायकीचे कायम आकर्षण राहिले. दोघांच्या गायकीची नजर वेगळी, गानप्रतिज्ञा वेगळी, राग उलगडणे वेगळे; पण दोघेही भावसौंदर्यवादी उत्कट शैली असलेले, संगीतातील स्वरनाट्य जाणणारे महान गायक होते. पारंपरिक बंदिशी आणि सुगम शास्त्रीय रचना व्यासंगाने आकर्षक करून मैफिलीत सादर करण्याचे दोघांचेही कसब तेवढेच विलोभनीय होते. दोघांचीही गायकी संगीत आणि साहित्याच्या बहुश्रुततेतून घडली. एकमेकांची नवनिर्मिती आणि गाण्याविषयी त्यांना मनातून आदरयुक्त प्रेम निश्चितच होते.
कुमारजींकडे प्रत्यक्षात जाऊन न शिकताही त्यांचा आणि माझा सांगीतिक ऋणानुबंध हा गुरु – शिष्य भावाचाच राहिला. त्यांचे मुंबई आणि इतर ठिकाणचे अनेक कार्यक्रम मी नेहमीच विद्यार्थिभावाने आवर्जून ऐकले. त्यांनाही मी काय भावनेने त्यांचे गाणे ऐकतो, ते कळायचे. त्यातून मला खूप काही शिकता आले. त्यांच्या भेटीची एक हृदयस्पर्शी आठवण माझा मनात कायमची घर करून आहे. ६ एप्रिल १९९१ ला माझा इंदूरला कार्यक्रम झाला आणि ८ एप्रिलला कुमारजींच्या वाढदिवशी त्यांना भेटायला मी देवासला गेलो. त्यांना वंदन करून सोबत नेलेली मिठाई आणि पुष्पहार अर्पण केला. कुमारजी खूप खुश झाले. मला आवडलेल्या त्यांच्या बंदिशी आणि कबीर भजन ‘रमैया कि दुल्हन लुटा बजार दी’ या रचनांविषयी भरभरून बोलत होते आणि बोलताना मला वारंवार सांगत होते, की तू तुझी बॅग घेऊन इथेच राहायला ये, तुला काय पाहिजे ते घे! त्या दिवशी मी त्यांच्या घरीच राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना त्यांच्याकडे शुद्धसारंग रागातील ‘नेक न बिसरो प्यारे..’ ही पारंपरिक बंदिश मागितली. कुमारजींनी आपली वही मागवली. त्यात सुंदर हस्ताक्षरात नोटेशन केलेली ती बंदिश मी लिहून घेतली आणि त्यांच्यासमोरच नोटेशनप्रमाणे गाऊनही दाखवली. ‘परत भेटायला येईन,’ असे कुमारजी, वसुंधराताई, कलापिनी यांना सांगून मी इंदूरला परतलो. पुढे १२ जानेवारी १९९२ ला कुमारजींचे अकस्मात निधन झाले. त्यामुळे प्रत्यक्ष भेट न झाल्याची हुरहुर लागून राहिली. परंतु, आंतरिक सांगीतिक भेटीत मात्र खंड पडला नाही.
कलाकारावर रागसंगीताचे कालजयित्व टिकवण्याची जबाबदारी असते आणि चांगले संगीत ऐकवून सुजाण श्रोते निर्माण करणे, हे त्याचे कर्तव्यच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीही असते. कुमारजींसारखे असामान्य कलाकार कलेशी पूर्णत्वाने समर्पित असतात. ते पैसा आणि प्रसिद्धीची समीकरणे बांधून नव्हे, तर कलेच्या निस्सीम प्रेमामुळे संगीत क्षेत्रात आलेले असतात. कुमारजी या लौकिक लाभाकडे लक्ष न देता रागसंगीत, पारंपरिक बंदिशी, त्यातील शक्यता आणि कोडी उलगडत राहिले, म्हणूनच महान आणि कालजयी ठरले. संगीताचा धर्म आणि मर्म कथन करून ते आत्मकाजाने सिद्ध करणाऱ्या या महान गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम!
(संपर्क- rajakale1952@gmail.com)




