Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रगोष्ट सांगतो ऐका: कावळे

गोष्ट सांगतो ऐका: कावळे

गोष्ट सांगतो ऐका: कावळे

[ad_1]

  • Marathi News
  • Opinion
  • CrowDivya Marathi Rasik Purvani ‘Goshta Sangto Aika Sadar Written By Arvind Jagtap  S

अरविंद जगताप4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गुप्ताने बघितलं… त्याच्या घराच्या खिडकीखाली छोटी आडवी भिंत होती. त्यावर एक मरून पडलेला उंदीर आणून ठेवला होता कावळ्यांनी. त्यावर ते चोच मारत होते. ओरडत होते. गुप्ताला ते दृश्य खूपच घाणेरडं वाटलं. त्याने वैतागून खिडकी बंद केली. रात्र झाली तरी उघडली नाही. रात्री उशिरा अचानक गुप्ताच्या खिडकीत लाइट दिसू लागला…

अविनाश समोरच्या सोसायटीकडं बघत होता. त्याचं लक्ष खिडकीत उभ्या असलेल्या गुप्ताकडं गेलं. ८०२ नंबरमध्ये राहणारा गुप्ता नेहमीप्रमाणे कावळ्यांना पोळीचे तुकडे टाकत होता. तो हवेत तुकडे फेकायचा, कावळे ते हवेतच झेलायचे. मग नंतर नंतर कावळे कंटाळून जायचे. कावळे पोळीच्या तुकड्यांचे झेल सोडून द्यायचे. पण, गुप्ताला कंटाळा यायचा नाही. अविनाश खूपदा हे बघायचा. आजही बघत होता. एकटक. खरं तर कावळ्यांना पोळी आवडत नसावी. खूप तुकडे तर सोसायटीत खाली पडायचे.

कचरा वेचणारी बाई अस्वस्थ व्हायची. तिच्या लेकरांना ताजी पोळी नशिबातच नसायची. पहाटेपासून काम. मग सोसायटीत कधी कुणी काही दिलं की तेच जेवण घरी. लोक काही ना काही तरी टाकून देतातच रोज. पण, याचा आनंद व्हावा का दु:ख, हेच तिला कळायचं नाही. कारण फ्रीज आल्यापासून लोक दोन – तीन दिवस पदार्थ जपून ठेवतात. मग खूपच कंटाळा आला की देऊन टाकतात. म्हणजे पदार्थाने शिळा होण्याची मर्यादा ओलांडल्यावर. त्या कचरेवालीला माहीत नसतं की, आपल्याला दिलेल्या ब्रेडची एक्स्पायरी डेट संपलेली आहे. तिला अर्धा ब्रेडचा पुडा मिळाला, याचाच आनंद.

आज नेहमीप्रमाणे कचरा वेचणारी शबाना पोळीचे तुकडे गोळा करत होती. ते खाण्यालायक उरलेच नव्हते. गाडी धुणाऱ्या लोकांमुळे सोसायटीत पाणी खूप असतं. त्यात ते तुकडे भिजतात. भिजले की ते आणखी ओंगळवाणे वाटतात. त्यात एसीचं पाणी गळत असतं. किंवा लोक झाडाला पाणी टाकतात, त्याचे थेंब पडत असतात. झाडता झाडता असे थेंब अंगावर पडले की शबाना वैतागते. वर बघते. ती कुणाला काय बोलणार? पण, तरीही वर बघतेच ती. अन्यायाचा प्रतिकार करता आला नाही, तरी निदान अन्याय कोण करतंय, हे तरी माहीत असावं, असं वाटत असेल तिला. कावळे थकले तसा गुप्ताही थकला असावा. त्यानं तुकडे टाकणं बंद केलं. कदाचित पोळी संपली असावी. गुप्ता तुकडे टाकून झाल्यावर खूप वेळ कावळ्यांकडं बघत बसतो. आपण खूप मोठं पुण्य केलंय या थाटात. कावळे रोज गुप्ताच्या खिडकीत येऊन ओरडतात. गुप्ताला लक्षात येतं की, ते त्याला आवाज देताहेत. कावळे याबाबतीत मुळीच विनम्र नसतात. त्यांना मागण्याची पद्धत माहीत असण्याचं कारण नाही. ते एकाच सुरात मागणी करतात.

माणसं आपल्याला काही हवं असलं की कसा कोमल सूर लावतात. कावळ्यांना ते काही जमत नाही. किंवा आपण जी कावकाव करतो, ती कोमलच आहे असा त्यांचा समज असावा. कावळे ओरडले की, गुप्ता पोळी घेऊन खिडकीत येतो. गुप्ताला या गोष्टीचा अभिमान आहे. फक्त त्याच्या या अभिमानाला कधी कधी तडा जातो. सातव्या मजल्यावरच्या भाटेकडे हमखास ऑम्लेट बनतं सकाळी. कावळे त्या वासाने एकदम फितूर होतात. गुप्ताची खिडकी सोडून भाटेच्या खिडकीभोवती चकरा मारू लागतात. पण, भाटेला कावळे आवडत नाहीत. खिडकीत आलेले तर मुळीच आवडत नाहीत. भाटे खिडकी बंद करतो वैतागून. मग कावळे पुन्हा गुप्ताच्या खिडकीकडं जातात. अशावेळी गुप्ता जरा चिडतो. कावळ्यांना मांसाहाराची आवड असावी, हे काही त्याच्या पचनी पडत नाही, तरी तो त्यांना मोठ्या मनाने माफ करतो. एकदा गुप्ताने एका कावळ्याला चिकनचा लेग पीस घेऊन खिडकीत आलेलं बघितलं. शिसारी आली त्याला. आपण या नालायकाला रोज पोळी खाऊ घालतो आणि याने आपल्याच खिडकीत चिकन आणावं, याचा त्याला खूप राग आला. त्याने त्या दिवशी त्या कावळ्याला पोळी द्यायची नाही, असंही ठरवलं. पण, चार – पाच कावळ्यांच्या गर्दीत चिकन आणलेला कावळा त्याला ओळखू येईना. तर, गुप्ताने आता तृप्त मनाने कावळ्यांचा निरोप घेतला. कावळे पण निघून गेले.

शबाना झाडत होती. सोसायटीत उंदीर खूप झालेत, हे तिला जाणवत होतं. कावळ्यांनी झेल सोडलेल्या पोळ्या उंदरांना मिळत होत्या. पण, उंदीर फक्त खायला मिळालं म्हणून शांत बसत नाहीत. त्यांना दात सतत घासायचे असतात. कशावर तरी. काहीतरी कुरतडत राहायचं असतं. आजकाल गाडीत पण शिरायला लागले होते उंदीर. शबानाला उंदराची खूप भीती वाटते. उंदीर गुप्तालाही आवडत नाहीत. शबानाच्या पायावरून एक उंदीर गेला. पोळीचा तुकडा घेऊन. शबानाने शिव्या दिल्या मनातल्या मनात. उंदराला नाही. गुप्ताला. तिला माहीत होतं, पोळीचे तुकडे कोण टाकतं. एवढ्याच कारणावरून दिवसातून चार – पाच लोक तरी मनातल्या मनात गुप्ताला शिव्या देतात. नेहमीप्रमाणे लाल कारमधून आवाज येत होता. उंदराचाच. पण, शबानाने दुर्लक्ष केलं. ती तरी काय करणार होती? गुप्ताची दुपारची झोप झाली. संध्याकाळ होत होती. पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे कावळे आवाज करू लागले. गुप्ताने बघितलं. त्याच्या घराच्या खिडकीखाली छोटी आडवी भिंत होती.

त्यावर एक मरून पडलेला उंदीर आणून ठेवला होता कावळ्यांनी. आणि त्यावर ते चोच मारत होते. ओरडत होते. गुप्ताला ते दृश्य खूपच घाणेरडं वाटलं. त्याने वैतागून खिडकी बंद केली. रात्र झाली तरी उघडली नाही. रात्री उशिरा अचानक गुप्ताच्या खिडकीत लाइट दिसू लागला. अविनाशने पाहिला. गुप्ता एवढ्या उशिरा जागा नसतो. पण, तो खूप घाईत दिसत होता. हालचालीवरून दारू जास्त झालीय, असं वाटत होतं. पण, अविनाशला माहीत होतं, गुप्ता दारू प्यायचा नाही. गुप्ता लाइट तसाच चालू ठेऊन घराबाहेर पडला. घाईत खाली आला. त्याच्या लाल कारमध्ये बसला. सारखा छाती चोळत होता. कार काही चालू व्हायला तयार नव्हती. गुप्ता वरचेवर अस्वथ होत होता. रागात त्याने स्टेअरिंग वर जोरात बुक्की मारली. गाडी का बंद पडली, हे बाहेर पडून बघू लागला. बोनेट उघडून पाहिलं. काही वेळात त्याच्या लक्षात आलं की, आतल्या दोन – तीन वायरचे तुकडे पाडलेत उंदराने. अविनाश वरून बघत होता. खूप वेळ गुप्ता तसाच बघत राहिला. उठलाच नाही. अविनाश कंटाळून झोपी गेला. सकाळी उठून बघतो, तर गुप्ता रात्री त्याच अवस्थेत जग सोडून गेला होता. त्याची अंत्ययात्रा निघाली होती. अविनाश कपडे घालून नाईलाजाने स्मशानभूमीत गेला.

दुसऱ्या दिवशी कावळे गुप्ताच्या खिडकीत ओरडत होते, पण खिडकी उघडत नव्हती. दोन दिवसांनी पिंडाला कावळे शिवायला तयार नव्हते. सगळे एकमेकांच्या कानात काहीतरी बोलत होते. कुणीतरी म्हणालं, ‘कावळ्यांना खाऊ घालीन असं सांगा..’ कोण सांगणार? एक जण अविनाशला म्हणाला, ‘तुम्ही सांगा. तुम्ही रोज बघत असायचा नाहीतरी गुप्ताला..’ अविनाशने रागात बघितलं. बाकी लोक आग्रह करू लागले. अविनाश तिथून रागात निघाला. कावळे जोरजोरात ओरडू लागले. अविनाश रस्त्याने चालत होता. कावळे त्याचा पाठलाग करत होते. जोरजोरात ओरडत होते…

अविनाश झोपेतून जागा झाला. त्याने स्वप्न पाहिलं होतं. पुन्हा एकदा. गुप्ता कावळ्यांना पोळी खाऊ घालतो, याचा त्याला एवढा राग येतो की, अविनाश गुप्ताच्या जाण्याची स्वप्न पाहतो खूपदा. गुप्ताला वाटतं, त्याने खूप पुण्य कमवलंय. पण, ते फार खरं नाही. अविनाशला वाईट वाटतं की, आपल्याला कावळ्यांची भाषा येत नाही. कावळे म्हणत असतील, ‘आम्ही काय पोळी खाणारे वाटलो का गुप्ता? दुसरं काही बनतं का नाही घरात?’ अविनाश असा काहीबाही विचार करत होता… तिकडं गुप्ताने पुण्य कमवायला सुरूवात केली. हवेत पोळीचे तुकडे फेकत.. माणसाच्या पाप – पुण्याचे तुकडे झेलत, सोडत कावळे आपल्याच धुंदीत उडत होते. खरं तर माणूस मुक्त व्हायला पिंडाला कावळा शिवण्याची वाट पाहतो. पण, हा माणसाच्या मुक्तीचा विचार कावळ्याला शिवतही नाही…

(संपर्क – jarvindas30@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments