
संभाजीराजे यांनी खासदारांना लिहिलेल्या पत्रात सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली आहे. ‘मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. यासाठी अनेक भव्य मोर्चे, आंदोलनं, उपोषणं झालेली आहेत. काही युवकांनी यासाठी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडला. समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरीही मराठा समाजानं आपली मागणी अतिशय शांततेच्या आणि संविधानिक मार्गानं पुढं आणलेली आहे. मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देऊन २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारनं तर २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदेशीर पातळीवर हे आरक्षण टिकलं नाही. मी स्वतः २००७ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रात सातत्यानं जनजागृती करत आहे. अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत काही आंदोलनं स्वतः देखील केली आहेत. राज्यसभा सदस्य असताना सभागृहात देखील हा विषय सविस्तरपणे मांडला होता. तसेच संसद परिसरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धरणं आंदोलनही केलं होतं, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.






