Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रपुस्तकामागच्या गोष्टी: चुकून रहस्यकथाकार झालेला माणूस

पुस्तकामागच्या गोष्टी: चुकून रहस्यकथाकार झालेला माणूस

पुस्तकामागच्या गोष्टी: चुकून रहस्यकथाकार झालेला माणूस

[ad_1]

आदूबाळ13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘लेखक होणे’ हे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, पण ते करिअर म्हणून करणं अतिशय कठीण आहे. (या वाक्यात अर्थातच दृश्यमाध्यमांतील पटकथालेखक अभिप्रेत नाहीत.) अक्षरशः लाखांतील एक लेखक काहीतरी व्यावसायिक पातळीवरचं यश मिळवू शकतो. फक्त लेखनावर जगता येणं मराठीत तर निव्वळ अशक्य आहे आणि इंग्रजीत भयंकर अवघड.

याबद्दल एक विनोदी किस्सा सांगितला जातो : लहान मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक घेऊन एक लेखिका एका लिटररी एजंटकडे गेली. एजंटने पुस्तक वाचलं, त्याला आवडलं आणि त्याने ते प्रकाशन संस्थांकडे ‘पिच’ करायची तयारी दाखवली. ती नवोदित लेखिका अर्थातच खुश झाली. पण, एजंट तिला म्हणाला, ‘जो, पुस्तक छान वगैरे आहे, पण त्यातून घर चालण्याइतके पैसे मिळतील, असं मला वाटत नाही. तुझ्या पदरी एक मूल आहे आणि नवऱ्यापासून विभक्त झाली आहेस. तू एक पार्टटाइम तरी नोकरी बघावीस असं मला वाटतं.’ ते पुस्तक होतं “हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन’ आणि ती नवोदित लेखिका अर्थातच, जे. के. रोलिंग!

आजचा लेख ज्या व्यक्तीवर आहे तिच्यात आणि रोलिंगमध्ये किमान तीन साम्यस्थळं आहेत. दोघेही स्कॉटिश आहेत, दोघेही एडिंबराच्या दक्षिण भागात एकमेकांपासून जवळ राहतात आणि दोघेही अपघाताने रहस्यकथा लेखक झाले आहेत. या दुसऱ्या लेखकाचं नाव इयन रानकिन. रानकिनचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील किराणा दुकानदार होते आणि आई एका शाळेत शिक्षकेतर कर्मचारी होती.

साहजिकच त्यांची अपेक्षा होती की रानकिनने काही व्यवसाय शिक्षण घ्यावं आणि पोटापाण्याची सोय बघावी. पण, रानकिनने इंग्रजी साहित्याची पदवी घ्यायची वाट चोखाळली. जणू लेखक होण्याचा किडा चावला होता म्हणाना. पदवी मिळवल्यानंतर सात – आठ वर्षे जगायची धडपड करण्यात गेली. त्यांनी या काळात अनेकविध नोकऱ्या केल्या. पण, कशातच ते रमले नाहीत, कारण ‘आपल्याला लेखक व्हायचं आहे’ हा तारा त्यांनी कधीच क्षितिजावरून ढळू दिला नाही. याच दरम्यान त्यांनी ‘नॉट्स अँड क्रॉसेस’ ही पहिली कादंबरी लिहिली आणि ती प्रकाशित झाल्यावर थोड्याच काळात ‘हाईड अँड सीक’ ही दुसरी.

वास्तविक या दोन्ही कादंबऱ्या रानकिन यांनी साहित्यिक लेखन (Literary Fiction) या अर्थी प्रसवल्या होत्या. वाचकांनी आणि समीक्षकांनी कादंबऱ्यांचं स्वागत तर केलं, पण त्यांना रहस्यकथांच्या कप्प्यात ढकलून दिलं. याचा रानकिन यांना भयंकर मानसिक त्रास झाला. त्यांच्या मते या कादंबऱ्यांत रहस्य असलं, ते उलगडणारा इन्स्पेक्टर रीबस हा तपासनीस असला, तरी रहस्यउकल हा काही कादंबरीचा गाभा नव्हता. त्या पलीकडे जाऊन काही कथानक त्या कादंबरीला होतं. शेवटी त्यांनी आपल्या प्राध्यापकाचा सल्ला घेतला. गुरूने त्यांना सांगितलं, ‘तू तुझं काम कर, वाचकांना त्यांचं करू दे.’ तेव्हापासून रानकिन यांचं कादंबरीलेखन आपल्या पद्धतीने सुरळीत सुरू झालं.

इन्स्पेक्टर रीबस मालिकेतील कादंबऱ्या वरकरणी पोलिस तपासकथा आहेत, पण आतून गंभीर ललित कलाकृती आहेत. या कथा ‘आजच्या’ (म्हणजे लिहिलं गेलं त्या काळच्या) एडिंबरा शहरात घडतात. एडिंबरा शहराला एक टुरिस्टी रम्यता प्राप्त झाली आहे. पण, रीबस मालिकेत वेगळं – सामान्य माणसाचं एडिंबरा दिसतं. त्यात जुनाट एकलकोंडी असुरक्षित उपनगरं आहेत. मध्य – एडिंबरात टुरिस्टांना सहसा न कळणारे स्थानिकांचे भलेबुरे व्यवसाय दिसतात. ट्रॅमच्या कामामुळे जेरीला आलेली वाहतूक व्यवस्था दिसते.

रानकिन यांच्या लेखनाने ‘टार्टन न्वार’ या उपविधेला (Subgenre) प्रसिद्धी दिली. ‘न्वार’ ही रहस्यकथांची विधा आणि ‘टार्टन’ म्हणजे स्कॉटलंडचा विशिष्ट चौकड्यांचा वस्त्रप्रकार. म्हणजे स्कॉटिश लेखकांनी लिहिलेल्या, स्कॉटलंडमध्ये घडणाऱ्या न्वार प्रकारच्या रहस्यकथा. रानकिन या उपविधेचे जन्मदाता नव्हते – त्यांनी लिहायला सुरूवात करण्यापूर्वी दहा वर्षे तरी अशा कादंबऱ्या येत होत्या. पण, रानकिन हे त्यातले सर्वात लोकप्रिय कादंबरीकार. रानकिन यांच्यासह अनेक लेखकांना ‘टार्टन न्वार’ हे वर्णन नकचढं (Condescending) आणि दुय्यम दर्जा देणारं वाटतं. त्यापेक्षा आपल्या लेखनाला कोणतीही लेबलं न लावता गुणावगुणांप्रमाणे मोजलं जावं, असा त्यांचा आग्रह आहे.

एकदा यश मिळाल्यावर मात्र रानकिन यांचा आलेख चढता राहिला. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच राहिली. २००५ मध्ये ते ‘सार्वकालिक प्रचंड विक्री असलेल्या इंग्रजी लेखकां’च्या यादीमध्ये दहाव्या स्थानी पोचले. इंग्रजी लेखनाचा महासागर किती विस्तीर्ण आहे, हे लक्षात घेतल्यास या दहाव्या स्थानाची महती लक्षात येईल. २०२२ मध्ये इंग्लंडच्या राणीने त्यांना ‘सर’ पदवी (Knighthood) दिली.

(संपर्क- aadubaal@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments