Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रगोष्ट सांगतो ऐका...: भय इथले...

गोष्ट सांगतो ऐका…: भय इथले…

[ad_1]

अरविंद जगताप12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

तासभर बस चालत राहिली. नरेशने खूप प्रयत्न करूनही त्याला झोप आली नाही. मग एका ठिकाणी विजेच्या वेगाने झेपावल्यासारखा उठला. उडी मारल्यासारखा उतरला. काही अंतर चालत राहिला. थोड्या वेळात एक मैदान दिसू लागलं. ते ओलांडून एक जुनी इमारत दिसू लागली. नरेश मागच्या बाजूला गेला. खूप वेळ इकडं तिकडं बघून भिंतीवर चढला. उडी मारली, पण त्याला उभंच राहता येईना. हा गलितगात्र माणूस असं काही करू शकेल, असं काही वेळापूर्वी कुणालाही वाटलं नसतं…

पावसाळा आहे म्हणावं तर प्रचंड उकाडा आहे. उन्हाळा आहे म्हणावं तर दुपारी सूर्य चार वाजल्यापासून दिसलाच नाही. नरेशला मात्र या गोष्टीचा त्रास नव्हता. तो तसाही अस्वस्थच आहे. एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये नरेश काम करतो. लोकांच्या घरी जाऊन तपासणीसाठी रक्त गोळा करून आणणे हे त्याचं काम. पगार जेमतेम. बायको पण एका दवाखान्यात नर्स. एक महिना झालाय नरेश अस्वस्थ आहे. त्याच्या कानावर आलंय की त्याला कामावरून काढून टाकणार आहेत. आपली काहीच चूक नसताना आपल्याला कामावरून काढून टाकण्याचा विचार का करत असतील हे त्याला कळत नव्हतं. त्यात दुपारपासून त्यानं काही खाल्लेलं नव्हतं. हात-पाय थरथर कापत होते. दिवसभर घरी जायची इच्छा झाली नाही. बायको कायम शिव्या देते. जेवण कधीच तयार नसतं. पोटात कावळे ओरडू लागले की, नरेशला हमखास आईची आठवण होते. आईनी कधी शिळी पोळी ताटात वाढली नाही. कायम गरमगरम जेवू घातलं. पण, आता आई नाही. नरेशला आईची आठवण आणि बायकोचा राग या दोन्ही गोष्टी एकदाच छळू लागल्या. नेहमीप्रमाणं. रात्रीचे आठ वाजले. बायको आता रात्रपाळीला गेली असेल याचा नरेशने अंदाज बांधला. घरी गेला. घरात नेहमीप्रमाणे खायला काही नव्हतं. गेले काही महिने बायको नरेशशी नीट बोलतही नाही. जेवला का वगैरे विचारपूस लांबची गोष्ट.

नरेश घरातले सगळे डबे उचकत राहिला. खिशात पैसे असते तर घरी यायची वेळच आली नसती. काही मिळणार नाही याची खात्री असूनही नरेशने छोट्या कपाटात, अंथरुणाखाली पैसे मिळतात का ते शोधलं. काहीच नव्हतं. चिल्लरसुद्धा ठेवत नाही बायको घरात. नरेश मनातल्या मनात बायकोला शिव्या देत राहिला. थकला. अधाशासारखं पाणी पिला. जमिनीवरच आडवा झाला. पण, झोप येण्याचा प्रश्न नव्हता. पंखा फिरत नसतानाही त्याला पंखा फिरतोय, असा भास होत राहिला. मोठ्यानं ओरडून बायकोला शिव्या द्याव्या असं वाटू लागलं. पण, त्राण नव्हतं. एकाएकी तो रडू लागला. एक अगदी बारीक हाक त्याच्या तोंडून आपसूक निघाली. आई.. नरेश हळूहळू शांत झाला. कसाबसा उठला. घराला कुलूप लावलं. ज्या घरात काहीच नाही अशा घराला कुलूप लावणं केवढं त्रासदायक असतं हे नरेशला कायम जाणवायचं. पण, एक पद्धत असते म्हणून तो कायम घराला कुलूप लावतो.

रस्त्यानं चालताना कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वाटत होतं. नरेश एका बस थांब्यापाशी उभा राहिला. त्याला रस्त्यानं जाणारे सगळेच लोक खूप आनंदात आहेत असं वाटत होतं. खासकरून हसत-खिदळत जाणारे नवरा-बायको पाहिले की, त्याला जास्तच अस्वस्थ होत होतं. एक बस आली. पण, नरेशचं कुठे जायचं हेच ठरलेलं नव्हतं. मागचे लोक वैतागून पुढं गेले. बसमध्ये बसले. निघून गेले. नरेश बसकडं बघत राहिला. आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती निघून जावी तशी बस जाताना दिसत होती. बस जातेय हे बघूनही त्याला उगाच वाईट वाटत होतं. आई सोडून गेली तेव्हा तो असाच शांत उभा होता. पुन्हा काही वेळानं दुसरी बस आली. तो तसाच उभा राहिला. त्याला वाटलं, सोडून गेलेले लोक असे पटकन परत यायला पाहिजेत. बससारखे.. अशा चार – पाच बस गेल्या. शेवटी निर्धार करून नरेश एका बसमध्ये बसला. रात्रीचे दहा वाजत असतील. खिशातले पैसे तीन – चारदा मोजून तिकीट काढलं. आता खिशात पाच रुपये उरले होते फक्त. पाच रुपयांत काय करायचं, असा विचारसुद्धा त्याच्या मनात आला नाही. पाच रुपयांत काय होणार? नरेश काहीही विचार करायचा नाही, हे ठरवत होता. पण, शेजारी बसलेल्या माणसाने अचानक वेफर्सचा पुडा फोडला. वेफर्स ही भयंकर गोष्ट आहे, असं नरेशला वाटलं. ते बटाट्याचे इवलेसे पापुद्रे माणसाची भूक अशी काही चाळवत राहतात की बस! नरेश ठरवूनही त्या वेफर्सच्या पुड्यावरून आपलं लक्ष हटवू शकत नव्हता. अचानक त्याचा घसा कोरडा पडू लागला. हात-पाय ताठ होताहेत, असं वाटू लागलं. घाम येतोय असं वाटून तो कपाळावर, मानेवर हात फिरवू लागला. पण, घाम नव्हता. आपल्याला उगाच काहीतरी भास होताहेत हे त्याला जाणवलं. खूप दिवसांपासून असं होतं हे माहीत असूनही नरेश दुर्लक्ष करत राहिला होता.

तासभर बस चालत राहिली. नरेशने खूप प्रयत्न करूनही त्याला झोप आली नाही. तो कुणीतरी गाठोडं टाकावं तसा बसून होता. मग एका ठिकाणी विजेच्या वेगाने झेपावल्यासारखा उठला. उडी मारल्यासारखा उतरला. काही अंतर चालत राहिला. एखाद – दुसरा कुत्रा उगाच ओरडत होता. बाकी रस्त्यावर कुणी नव्हतं. थोड्या वेळात एक मैदान दिसू लागलं. ते ओलांडून एक जुनी इमारत दिसू लागली. नरेश गेटकडं न जाता मागच्या बाजूला गेला. खूप वेळ इकडं तिकडं बघून भिंतीवर चढला. उडी मारली, पण त्याला उभंच राहता येईना. हा गलितगात्र माणूस असं काही करू शकेल असं काही वेळापूर्वी कुणालाही वाटलं नसतं. नरेशमध्ये कुठून एवढी ताकद आली होती माहीत नाही. कसाबसा तो उठून उभा राहिला. कुणी आपल्याला बघत तर नाही ना, म्हणून इकडं तिकडं बघत होता. पण, पुरेसा अंधार होता. तो सहा – सात खोल्यांचा जुना वाडा वाटत होता. त्यातल्या एका खिडकीपाशी तो उभा राहिला. खूप वेळ. आजूबाजूला खूप शोध घेतल्यावर त्याला तिथं एक मोडकी खुर्ची दिसली. त्यानं ती उचलून आणली. आता खिडकीच्या आत डोकावता आलं त्याला. खिडकी ढकलायचा प्रयत्न करणार एवढ्यात एका म्हाताऱ्यानं त्याला पाहिलं. ओरडू लागला. तसे आणखी तीन – चार लोक आले. चौकीदार आला. लोक त्याला मारू लागले. नरेश जोरात ओरडला. चौकीदारानं जोरात काठीचा फटका दिला. आता नरेशच्या अंगात ओरडण्याचंही त्राण उरलं नाही. पाच – सहा खिडक्यांमधून दिवे लागल्याचे दिसू लागले. चौकीदार नरेशला शिव्या देता देता काठीचा एखादा फटका देतच होता. अचानक त्या पाच – सहा लोकांना बाजूला करत एक बाई आली. खाली बसली. नरेशच्या तोंडाला माती लागली होती. तिनं पदरानं नरेशचं तोंड पुसलं. नरेश रडत होता, पण आवाजही येत नव्हता. त्या बाईने हळूच शंभर रुपयांची नोट नरेशच्या खिशात टाकली. उठून निघून गेली. काहीच बोलली नाही. ते पाच – सहा लोक बघत राहिले. वृद्धाश्रमातले लोक बिचारे. हा त्या बाईचा पोरगा आहे हे ओळखू यायला वेळ लागला नाही त्यांना…

नरेश निघून गेला. थेट देशी दारूच्या दुकानात. एक ग्लास वेगात घशाखाली ढकलून झाला. अंगात बळ आलं होतं, दुसरा ग्लास भरण्याएवढं. आईला माहीत होतं, दारूला पैसे पाहिजेत म्हणून आलाय. बायकोने पैसे देणं बंद केलंय. आई चोरून लेकाला पैसे द्यायची म्हणून बायकोनं तिला घरातून हकलून दिलं. आई लेकामुळं बेघर झाली. पण, लेकाची माया? लेक महिन्या-दोन महिन्यांत असाच चोरासारखा येतो रात्री बेरात्री. आज लोकांना सापडला, एवढंच. ती एकमेव आई असेल, जी मुलाची वाट बघत नाही. मुलगा असा रात्री बेरात्री येईल, याची भीती वाटत रात्र रात्र जागी असते.

jarvindas30 @gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments