Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रनेटस्ट्रीम: द तेलगी स्टोरी- गोष्ट अनैतिक पैसा बनवण्याची!

नेटस्ट्रीम: द तेलगी स्टोरी- गोष्ट अनैतिक पैसा बनवण्याची!

[ad_1]

समीर गायकवाड10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ या २०२० मध्ये रिलीज झालेल्या वेबसिरीजचा दुसरा सीझन सोनी लिव्हवर आला आहे. ‘स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी’ असे त्याचे नाव आहे. ही मालिका संजय सिंग यांच्या ‘तेलगी घोटाळा : एक रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकावर आधारित आहे. सध्या या दुसऱ्या सीझनचा पहिला व्हॉल्यूम रिलीज झाला असून त्यात एकूण पाच भाग आहेत. उर्वरित भाग नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. ‘स्कॅम २००३’ची सर्वात मोठी समस्या म्हणजे तो ‘स्कॅम १९९२’ या मालिकेचा सिक्वेल आहे. हर्षद मेहता प्रकरणाच्या कथेकडे पाहताना हंसल मेहताचा दृष्टिकोन अगदी फ्रेश होता. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळे केले अशांची जीवनकथा बायोपिकसाठी निवडली गेली. ही मालिका खूप तपशीलवार निर्मिली होती. शिवाय ती मनोरंजकही होती. याहून अधिकच्या गोष्टी तेलगी स्टोरीमध्ये दिसतात. मात्र, १९९२ च्या घोटाळ्याची सावलीही सोबत येतेच!

अब्दुल करीम तेलगीने १९९६ मध्ये काही शक्तिशाली लोकांची मदत घेऊन मुंबईत मिंट रोडवर प्रेस सुरू केली. मशीनवर बनावट स्टॅम्प बनवले जाऊ लागले. जो तेलगी ट्रेनमध्ये फळे विकून उदरनिर्वाह करत होता त्याचा व्यवसाय ९० च्या दशकात करोडोंच्या घरात गेला. हे बनावट स्टॅम्प पेपर विमा कंपन्यांपासून बँका आणि परदेशी गुंतवणूकदारांना विकले गेले. यातून त्याने ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे बोलले जाते. गरिबीत खितपत पडलेला एक माणूस अचानक अब्जाधीश होतो. तो असा काही घोटाळा करतो की, त्याच्यापासून आपले उखळ पांढरे व्हावे म्हणून पोलिसांपासून ते सरकारपर्यंत अनेक जण त्याच्या मागे लागतात. ‘स्कॅम २००३’ ही तेलगीने केलेल्या या फसवणुकीची कथा आहे. तेलगीच्या पहिल्याच संवादात त्याचा रोख स्पष्ट होतो, तो म्हणतो.. ‘राजकारणी हे बिझनेसचा कणा असतात.’

तेलगी खूप बोलका माणूस होता. त्याला गोष्टी कशा खपवायच्या हे माहीत होते. आपल्या या कलेचा उपयोग त्याने पैसे कमावण्यासाठी केला. पण, श्रीमंत दिसण्यावर त्याचा विश्वास नव्हता. एवढा मोठा घोटाळा करून आणि भरपूर पैसा मिळवूनही तो सहसा साध्या कपड्यातच दिसत होता. तेलगी असा माणूस होता, ज्याला गर्दीत पाहिले तर तो कुणाच्या लक्षातही येणार नाही. त्याने आपल्यातल्या या सामान्य माणसाच्या छबीचा वापर केला. तो स्वतःला उंदीर म्हणायचा. कारण त्याला सिंह व्हायचे नव्हते. सिंहाची शिकार करता येते, उंदराची नाही. पैसा कमावणाऱ्या किंवा गुन्हा करणाऱ्या प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व चुंबकीय असेलच असे नाही. ही मालिका त्याचंच चित्रण करते. स्टॅम्प पेपर महत्त्वाचे का आहेत? त्याचे काम काय? ते कसे आणि कुठे छापले जातात? त्यातून तेलगीने पैसे कसे कमावले? या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मालिका स्पष्टपणे देते.

‘स्कॅम २००३’ या वेबसिरीजमध्ये तेलगी स्वतःची कथा फ्लॅशबॅकमधून सांगतो. ही कथा त्याच्या आजूबाजूच्या जगाचा जवळून आढावा घेते. तो गरीब कुटुंबातून आला हे खरे आहे. पैशाअभावी त्याला कधीच पोटभर खायला मिळालं नाही, तो अनेकदा उपाशी राहिला. पण, या कथेत तेलगीच्या मनाचा शोध येत नाही. तेलगीची भूमिका गगनदेव रियार याने केली आहे. गगनने तेलगीचे पात्र आत्मसात करीत अप्रतिम अभिनय केला आहे. आत्मविश्वास, देहबोली, बोलण्याची पद्धत या सगळ्याच बाबतीत तो त्या पात्राच्या अगदी जवळचा वाटतो. या मालिकेतील इतर पात्रे कितीही महत्त्वाची असली तरी ती केवळ फिलर म्हणून वापरली गेली आहेत हे लक्षात येते. पहिल्या पाच भागांमध्ये आपण तेलगीला गरिबीतून श्रीमंतीकडे जाताना पाहतो. त्या उंचीवरून त्याचा डाऊनफॉल कसा होतो हे पुढच्या पाच एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. त्याला पोलिसांनी कसे पकडले आणि त्याचा मृत्यू कसा झाला हे त्यात दिसेल. ‘स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी’ ही एक सोशोस्टॅबिलाइज्ड टाइपची सिरीज आहे. ती कोणतेही स्टेटमेंट करत नाही, निर्विकार मांडणी करत राहते. तेलगी जे साम्राज्य उभे करतो ते पाहून सभ्य माणसाच्या पोटात गोळा यावा. पोखरल्या गेलेल्या यंत्रणेला तो घरघर लावतो. ‘मैने खुद एक सिस्टिम बनाया है, जिसे मेरे नक्शे कदम पे चलना पडेगा..’ हे वाक्य तो खूप वेळा सुनावतो. ‘मुझे पैसा कमाना नहीं, बल्की बनाना है..’ हे त्याचे आवडते वाक्य! या वाक्याला शोभेल असे तो जगतो. या सिरीजमधल्या भरत जाधव, शशांक केतकर या मराठी अभिनेत्यांनी जोरदार कामगिरी केली आहे.

अतितटस्थ मांडणी हा हंसल मेहताचा कालसुसंगत दोष राहिला आहे. अर्थव्यवस्थेला लुटणाऱ्या आर्थिक घोटाळेबाजांविषयी संताप यावा, क्रोधाची तिडीक मस्तकात यावी अशा प्रकारचे चित्रण टाळून उलटपक्षी त्यांची कणव यावी अशा रीतीने त्यांना सादर केल्याचे दिसते. इथेही तसेच काहीसे झाले आहे. तेलगी स्टोरी ही तशी एक अत्यंत प्रभावशाली सिरीज असली तरी तेलगीच्या मनात डोकावून त्याच्या विचारधारेला अधिक नेमकेपणाने मांडता आले असते. ही उणीव जाणवत राहते. अभिनय आणि मांडणीसाठी मात्र ही सिरीज पाहता येईल.

संपर्क : ९७६६८३३२८३

sameerbapu @gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments