संभ्रमाचे मिथक: काँक्रीटचा थंडगार रंगहीन बंगला…

0
15
संभ्रमाचे मिथक: काँक्रीटचा थंडगार रंगहीन बंगला…


दत्ता पाटील12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एकूणच आता काहीच घडणार नाही बहुधा. सगळं असं नीरव करून टाकलंय किंवा तेच तेच प्रसंग रोज उभे करत आपल्या जीवित अस्तित्वावरच आपल्याला शंका यावी असा भवताल बनवणं चाललंय.. युद्धांची, नैसर्गिक आपत्तींची गरजच उरणार नाही काही दिवसांत.. आभासी सुखाची स्वप्नं दाखवून सगळा भवताल हाकारत कुणी तरी इथवर आणून ठेवलाय…

काहीही उधाणलेलं नाही. रोगट शांतता. काही वाळून जाऊ शकेल एवढं ऊन पडत नाही. काही नीटनेटकं भिजेल एवढा पाऊस नाही. मध्येच पाऊस येतो तेव्हा पावसाळा वाटतो. मध्येच लख्ख ऊन पडतं तेव्हा उन्हाळाच संपलेला नाही असं वाटत राहतं. सूर्य रोज सेम त्याच दिशेला उगवतो. पूर्वेकडचे कोपरे तेवढे बदलत राहतो. मावळतानाही कोणता कोपरा धरेल याचा नेम नाही. रस्ता अडवून गुरांचे कळप खूप काळ तुकड्यातुकड्यांनी जात राहावेत तसे ढग फिरतात आकाशात सकाळी… वारं फिरेस्तोवर मग्रूर ढगांचे पोकळ तुकडे उगवत्याला अडवत राहतात. वितळून सूर्यास्ताच्या प्रहरापर्यंत जागोजागी दडून बसतात. उगवत्या सूर्याची किरणं मळ्यातल्या सिमेंट काँक्रीटच्या बंगल्याच्या पडवीत येताना समोरच्या नारळाच्या सावलीला पडवीत काही काळ खेळू देतात…

रंग राहून गेलाय बंगल्याला आतून – बाहेरून. नऊ – दहा वर्षे झाली बांधून. पांढरं प्लास्टर काळसर पडत गेलं. टणक बंगला आहे. आतून बाहेरून. दोन कमोड आहेत. म्हातारी दोन वेळा तिथं घसरून पडली. तिच्यासाठी खाली भारतीय पद्धतीचं शौचालय बांधलं. पण, सगळे सकाळी जसं खाली, वावरातल्या पिकात जातात तशी तीही परसाकडं जायला लागली पुन्हा. वरच्या दोन्ही कमोडमध्ये युरियाच्या, औषधांच्या गोण्या, डबे ठेवले आहेत. खालच्या ‘इंडियन’मध्ये चुलीसाठी लाकडं, किलचणाचा ढीग आहे. पोर्च काढला होता असा गेटपर्यंत. नऊ एकर शेतातला बंगला असल्यानं गेट काही वेगळं बसवलं नाही. कलर आणि गेटला तसे पैसेही उरले नव्हते. म्हंजे दुसऱ्या वर्षी आले पैसे, पण गेटची, कलरची तीव्र गरज नाही वाटली. उत्पन्नात फार भर पडली नाही. मात्र, गेटच्या, कलरच्या किमतीही तशा वाढत गेल्या. आता तर पुढची पिढी शिकून, मोठी होऊन नोकरी-धंदा करायला लागल्यावर तेच काय कलर-बिलर करायचं तर करतील, अशी चर्चा होऊन गेली मागच्या दिवाळीत. कारण बंगला बांधला तेव्हा घरातली पुढची पिढी लहान वाटत होती. नऊ वर्षांत सगळ्या भावांची सगळी पोरं अचानक मोठी झाली. आमच्या दृष्टीनं नव्या युगात बांधलेला बंगला त्यांच्यासाठी वडिलोपार्जित जुनं घर होऊन गेला…

पावसाळी गर्द वातावरण तसं नसतंच इकडं. पण, काळे ढग कधी दाटून आले, तर बंगला सबंध काळसर वातावरणात वितळून जातो. अंधार पडला की तोही विरघळतो. उन्हाळ्यात बंगल्याची कोणत्या तरी एका बाजूला सावली पडत जाते. म्हातारी तापत्या घरातून बाहेर निघून दिवसभर बंगल्याच्या सावलीसोबत जागा बदलत खाट सरकवत राहते. नऊ-दहा वर्षांत एकूणच शेतातल्या हालचाली शांत शांत होत चालल्या आहेत. जागा बदलताना, उठताना, बसताना कंबर, गुडघे जोरात दुखून म्हातारी वेदनेनं अधूनमधून जोरात किंचाळते. आणि कडाsड् आवाज करत नारळाच्या वाळक्या झावळ्या मधूनच कोसळतात. त्या पलीकडं आसमंतात काहीच असं जोरकसपणे वगैरे उधाणून येत नाही… नांगरायला, माल भरायला आलेल्या उसन्या ट्रॅक्टरचा आवाजही शांततेचा भाग वाटू लागलाय. जिथून आलो ते ठिकाण दिसत नाही म्हणून पुढं आलो, असं म्हणायला जागा आहे. पण, जिथं जायचं त्या ठिकाणाच्या खाणाखुणाही दिसत नाहीत. त्यामुळं नेमकं जायचं तरी कुठं अन् का, हे कळेना झालंय…

देश-विदेशात जाऊन येणाऱ्या माणसांना विचारूनही जग काही नीट ध्यानात येत नाही. चारीधाम करून आलेल्या गावातल्या लोकांना खोदून विचारूनही देव काही नीट डोळ्यापुढं येत नाही. कीर्तनकार बाबाला दर वर्षी जेवू घालताना विचारूनही धर्म काही आकळत नाही. पाच-सहा पक्षातील दहा-बारा गटांच्या पुढाऱ्यांना विचारूनही देशाचं राजकारण काही नीट आकळत नाही. टीव्हीवरची न्यूज चॅनलं मन लावून पाहूनही जगाची खबरबात काही नीट लागत नाही. काय चाललंय, कोणालाच नीट कळलेलं नाही. काहीही असं उधाणून आलेलं दिसत नाही कुठंच. तळाचा थांग न लागणाऱ्या समुद्रावरून नकळत मध्यभागच्या शांत प्रवाहावर आपण तरंगतो आहोत. वर अथांग रात्र नि तारे. तेही या भीषण शांततेचा भाग. शेत संपताना, बांधाला खेटून शिवारातल्या लोकांनी मिळून काँक्रीटच्या थापलेल्या मंदिराच्या ओट्यावरून आपला सिमेंट काँक्रीटचा काळाशार पडलेला बंगला आपल्यापासून तुटलेल्या रिकाम्या लाइफ बोटीसारखा हळूहळू या काळोखात लुप्त होईल. मुख्य दाराच्या वर भिंतीत काँक्रीटनं चिकटवलेल्या टाइलमधल्या तीन रंगीत देवांसकट! वीसेक लाख रुपये खर्च केले. सगळेमिळून. आता वीस लाख खूप वाटू लागलेत. नऊ वर्षांपूर्वी वाटायचं, आताच बांधून घेऊ बंगला. पुढच्या दहा वर्षांत बंगला बांधणं आवाक्याबाहेर जाईल. आता दहा-पंधरा लाखही आवाक्याबाहेर वाटताहेत…

हळूहळू बदल होणं बंदच होत गेलं. सगळं जगणं गोठवून टाकायची जणू कुणी सुपारीच घेतली. तीच काळीसावळी संध्याकाळ. तेच आवाज रातकिड्यांचे. कुत्रेही तेच टोळ्यांनी भुंकत राहणारे. म्हातारीही तीच. उठताना, बसताना, अंग टाकताना किंचाळत राहणारी. अजस्र जहाजाच्या इंजिनाच्या आवाजाचा भाग बनलेले हे सगळे आवाज. अर्थहीन आणि म्हणूनच नीरव शांततेत विरघळून गेलेले.. दारू पिऊन आपापल्या मळ्यात लडखडत पोहोचणाऱ्यांचे जथ्थे टप्प्याटप्प्यानं दिसताहेत.. त्यांची रोजची एकमेकांशी भांडणं ऐकू येताहेत.. त्यातले काही रस्त्याच्या कडेला उजाडेपर्यंत पडून राहिलेले.. कुणी त्यांची काळजी करत रात्री शोधायला बाहेरही पडत नाही. शेजारच्या शेतातला एक म्हातारा नित्यनेमाने सायंकाळी या मंदिरात अगरबत्ती लावायला येतो. आताही आलेला. दिवा लावून शेजारीच बसलेला… ‘तो नेईल तिकडं मुकाट जावं. काय? तोच आपला मालक..’ असं रोज बोलत, वारीतून पाठ झालेले काही अभंग ऐकवत, त्यांचा आपल्या पद्धतीनं अर्थ सांगत राहतो. अपुरं ठेवत गप्प बसतो. काळ्या बटणांचा काळा मोबाइल काढून त्याची टॉर्च लावत मंदिराच्या आजूबाजूच्या गचपनात काहीतरी शोधत राहतो. रानातून काही पतंग, काही किडे त्याच्या टॉर्चभोवती जमा होऊ लागताच तो ती बंद करतो. पुन्हा ओट्यावर येऊन बसतो. रोजच्या या तास-दोन तासांत त्याला कुणी फोनही लावत नाही…

एकूणच आता काहीच घडणार नाही बहुधा. सगळं असं नीरव करून टाकलंय किंवा तेच तेच प्रसंग रोज उभे करत आपल्या जीवित अस्तित्वावरच आपल्याला शंका यावी असा भवताल बनवणं चाललंय.. युद्धांची, नैसर्गिक आपत्तींची गरजच उरणार नाही काही दिवसांत.. आभासी सुखाची स्वप्नं दाखवून सगळा भवताल हाकारत कुणी तरी इथवर आणून ठेवलाय.. सगळाच भवताल निर्वासितांच्या छावण्यांचा.. तात्पुरतेपणाचा अंत माहीत नसलेल्या व्यवस्थेतले आपण एक व्हिक्टिम! भूतकाळ म्हणून जमीन अन् आकाश उरलेलं.. भविष्य म्हणून रोज या शेताकडं, या काँक्रीटच्या बंगल्याकडं घेऊन येणारा रस्ता उरलेला आणि वर्तमान हे असं किर्र शांततेत गोठलेलं.. युद्धाशिवाय पराभूत होत चाललेल्या भवतालाच्या थंडगार, निचेष्ट गर्दीतून त्या काळोखाचा भाग बनलेल्या रंगहीन बंगल्याकडं नेणाऱ्या वाटेनं चालत जाईस्तोवर वरून चांदण्याही रोजच्या सरावानं सोबत चालत राहतात.. अंगण आलं नि म्हातारी विव्हळली की परत जातात आपापल्या जागी…

दत्ता पाटील
dattapatilnsk@gmail.com
– संपर्क : ९४२२७६२७७७



Source link