कराड; पुढारी वृत्तसेवा : आरएसएसच्या अनेक हिंदुत्ववादी संघटना आहेत. काही संघटना गुप्तपणे काम करतात, तर काही संघटना उघडपणे. जो कोणी मनोहर कुलकर्णी आहे त्याला पैसे कोण देतो? त्याची सगळी संघटना चालवतो कोण? मला याच्या खोलात जायचं नाही. पण, जो कोणी कायदा मोडेल त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई झालीच पाहिजे. यामध्ये कायदा मोडला आहे की नाही? त्याच्यावर काय कारवाई करणार? हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कराड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. जाणूनबुजून समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणार्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार आहे. सरकारने एफआयआर दाखल केल्याचे समजले, ही चांगली गोष्ट आहे. पण, एका मागोमाग एक लगातार भावना दुखावणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्याला मोकळे सोडले तर तो आणखी कुठे कुठे आग लावेल, सगळीकडे पेटवेल असे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तुला तुझे तत्त्वज्ञान मांडायचे असले, विचार पसरवायचे असतील, मनुस्मृतीबद्दल काही बोलायचं असले तर तू बोलू शकतोस. त्याला आम्ही विचाराने उत्तर देऊ. पण, आमच्या नेत्यांच्या विरुद्ध अशी घाणेरडी वक्तव्ये करू नयेत. आम्ही असे घाणेरडं वक्तव्य केली तर काय होईल? याचा विचार करावा. त्यामुळे असे करणे चुकीचे आहे.
देवेंद फडणवीस यांनी आमचा, भाजपाचा याच्याशी काही संबंध नाही असे विधान केले आहे. परंतु आरएसएसच्या हजारो संघटना आहेत. त्या वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. हे सोयीप्रमाणे म्हणतात आमचा संबंध नाही आणि सोयीप्रमाणे म्हणतात आमचीच संघटना आहे. महात्मा गांधीजींचा खून झाला. तो कोणी केला? त्याचा कोणाशी संबंध होता? आणि आता आमचा काही संबंध नाही, असे म्हणून हात मोकळे करता. मग सरदार पटेल यांनी महात्मा गांधी यांच्या खुनानंतर दुसर्याच दिवशी आरएसएसवरती बंदी का आणली होती? सरदार पटेल यांचे आरएसएस बद्दलचे काय विचार होते, हे सांगण्याची गरज नाही.
मुद्दाम कोणी तेलात काडी टाकायचे काम करत असेल तर आपण गप्प बसायचे का? हा एका मागोमाग एक असे गुन्हा करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे याच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. अन्यथा सांगावे की त्यांनी काहीही गुन्हा केलेला नाही. तो फार साधुसंत माणूस आहे आणि जाऊन त्याच्या पाया पडावे. त्यांनी दोन्हीपैकी काहीतरी एक केले पाहिजे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
दोघांनी पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली
दोन लोकांनी पाठीत खंजीर खुपसून जी सत्ता मिळवली आहे, त्याबद्दल समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. सर्व्हेमध्ये दोन गटाला खासदारकीच्या दोन दोन जागा मिळतील असे दाखविले आहे. परंतु दोन जागा मिळतील असेही मला वाटत नाही. या निवडणुकीत देशातील वातावरण सत्ताधार्यांच्या विरोधात आहे. ‘इंडिया’ आघाडीची तयारी जोरात चालली आहे. जवळजवळ 28 पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे भाजपाच्या एका उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे. यातून विरोधकांच्या मतांची विभागणी टळणार आहे. असे असताना महाराष्ट्रात युतीला 24 जागा मिळतील, असे म्हणणे शक्य आहे का? त्यांचे खाते उघडते की नाही येथून त्यांची सुरुवात केली पाहिजे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.






