Friday, November 27, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीच्या २४ नगरसेवकांची मुंबईत खासदार पार्थ पवार यांची भेट; सर्वसाधारण सभा तातडीने...

बारामतीच्या २४ नगरसेवकांची मुंबईत खासदार पार्थ पवार यांची भेट; सर्वसाधारण सभा तातडीने घेण्याच्या सूचना!

नगरपरिषदेच्या कामकाजातील त्रुटी आणि रखडलेल्या विकासकामांबाबत निवेदन; नगरसेवकांना विश्वासात घेऊन कारभार करण्याची मागणी

बारामती : प्रतिनिधी. बारामती नगरपरिषदेच्या कामकाजावरून निर्माण झालेली नाराजी आता थेट मुंबईपर्यंत पोहोचली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा नियमित होत नसल्याने तसेच विविध विकासकामे आणि नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याच्या तक्रारी घेऊन बारामतीतील २४ नगरसेवकांनी मुंबईत राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. यावेळी नगरपरिषदेच्या कामकाजातील विविध अडचणी मांडत लेखी निवेदन सादर करण्यात आले.

नगरसेवकांनी खासदार पार्थ पवार यांच्यासमोर नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत सविस्तर भूमिका मांडली. वर्षभरात केवळ दोनच सर्वसाधारण सभा झाल्याचा, तर स्थायी समितीची एकही बैठक झाली नसल्याचा आक्षेप त्यांनी निवेदनातून नोंदविला. त्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडण्याची संधी मिळत नसल्याची नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली.

सुमारे ४० विषयांवरील हरकतींचा मुद्दा ऐरणीवर!

मागील सर्वसाधारण सभांमध्ये सुमारे ४० विषयांवर २४ नगरसेवकांनी हरकती, सूचना आणि दुरुस्त्या मांडल्याचे सांगण्यात आले. मात्र, या सूचना आणि दुरुस्त्या सभेच्या इतिवृत्तात योग्य प्रकारे समाविष्ट झाल्या नसल्याचा आक्षेप नगरसेवकांनी घेतला आहे. सुधारित इतिवृत्त नगरसेवकांना उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

शहरातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी

पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य, पथदिवे आणि वाहतूक अशा शहरातील मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकासकामांचे नियोजन करावे आणि नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेचे कामकाज नियमित चालवावे, अशी भूमिका या शिष्टमंडळाने मांडली.

पार्थ पवारांकडून तातडीने दखल

नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तातडीने आयोजित करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती आहे. तसेच नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्या प्रश्नांना आणि विकासकामांच्या मागण्यांना प्राधान्य देऊन कामकाज करण्याबाबतही निर्देश दिल्याचे वृत्त आहे.

आता सुनेत्रावहिनी पवार यांच्या भेटीकडे लक्ष!

खासदार पार्थ पवार यांची भेट घेतल्यानंतर नगरसेवकांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडेही नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात निवेदन सादर करण्याची तयारी असल्याची माहिती आहे. तसेच नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही प्रलंबित प्रश्न मांडण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते.

बारामती नगरपरिषदेतील या घडामोडींमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. २४ नगरसेवकांनी एकत्र येत मुंबईत वरिष्ठ नेतृत्वापर्यंत आपले प्रश्न पोहोचविल्याने या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नगरपरिषदेच्या कारभारात बदल होणार का?

नगरसेवकांच्या मागण्यांची दखल घेऊन सर्वसाधारण सभा नियमित होणार का, प्रलंबित विकासकामांना गती मिळणार का आणि नगरपरिषदेचा कारभार अधिक पारदर्शक होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता वरिष्ठ नेतृत्व आणि प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments