नीरा उजवा व धोम-बलकवडी कालव्याच्या आवर्तनाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना; जलसाठे पूर्ण क्षमतेने भरण्यावर भर, शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीबाबतही महत्त्वाचे निर्देश
फलटण : प्रतिनिधी संभाव्य दुष्काळ आणि आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन फलटण तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला त्याची झळ बसू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावे. पिण्याचे पाणी, सिंचन, टँकर व्यवस्था, जनावरांचा चारा आणि जलसंधारण या बाबींना सर्वोच्च प्राधान्य देऊन ठोस कृती आराखडा तयार करावा, असे स्पष्ट निर्देश माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फलटण तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव व फलटण नगर परिषद चे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कालव्याच्या आवर्तनात प्रत्येक गावाला समान न्याय मिळावा
बैठकीत नीरा उजवा कालवा आणि धोम-बलकवडी कालव्याच्या आवर्तनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कालव्याचे आवर्तन सुरू असताना दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. पाण्याचे वितरण पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करून सर्व गावांना समान न्याय मिळेल, असे व्यवस्थापन करावे, अशी सूचना आमदार सचिन पाटील यांनी केली.
पाणीटंचाईपूर्वीच टँकर आणि पर्यायी स्रोत सज्ज ठेवा
भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विहिरी व खासगी बोअरवेल अधिग्रहणाची प्रक्रिया, टँकरची उपलब्धता आणि आवश्यकतेनुसार नवीन विहिरी व बोअरवेल घेण्याबाबत आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
जलजीवन मिशनअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या साठवण टाक्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना पूर्ण क्षमतेने भरून ठेवाव्यात. भविष्यात टंचाई निर्माण झाल्यास या साठवण टाक्यांमधून टँकरद्वारे गावांना पाणीपुरवठा करता येईल. त्यासाठी आवश्यक ठिकाणी टँकर फीडिंग पॉइंट विकसित करण्यावरही भर देण्यात आला.
पशुधनाच्या चाऱ्यासाठी आतापासूनच कृती आराखडा
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील ओला व सुका चारा उपलब्धतेची माहिती संकलित करावी. सिंचनाची सोय असलेल्या शेतांमध्ये चारा पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. तसेच तालुक्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन भविष्यातील चारा उपलब्धतेचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे आदेश
पावसाचे पाणी अडवून त्याचा भविष्यात उपयोग करता यावा, यासाठी पाझर तलाव, बंधारे दुरुस्ती, गाळ उपसा, गाळमुक्त शिवार अभियान आणि नाला खोलीकरणाची कामे प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
वनविभागाच्या अखत्यारीतील बंधारे आणि गाळ उपसा कामांचाही आढावा घेण्यात आला. वनविभागाच्या मालकीच्या डोंगराळ भागातील जमिनींवर चेन बंधारे उभारण्यासाठी योग्य नियोजन करून कामे मार्गी लावावीत, असे निर्देश रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीचा प्रश्न उपस्थित
संभाव्य दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाच्या निर्णयानुसार कर्जवसुली करू नये, अशा सूचना सहकारी बँकांशी संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून संकटाच्या काळात शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
समस्या असल्यास लोकप्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन
फलटण तालुक्यातील कोणत्याही गावात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा अथवा अन्य कोणतीही समस्या निर्माण झाल्यास नागरिक आणि शेतकऱ्यांनी तातडीने लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा. संबंधित समस्यांवर प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले.
संभाव्य दुष्काळाच्या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता धीराने परिस्थितीचा सामना करावा. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात समन्वय राहिल्यास कोणत्याही संकटावर मात करणे शक्य आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत पाणीपुरवठा, सिंचन, पशुधन, चारा उपलब्धता, जलसंधारण, वनविभागाची कामे आणि आर्थिक उपाययोजना या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संभाव्य दुष्काळाचे संकट प्रत्यक्षात येण्यापूर्वीच उपाययोजना पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता या बैठकीत अधोरेखित झाली.
