Wednesday, November 25, 2026
Homeसातारा१ डिसेंबरपासून अशैक्षणिक ऑनलाईन कामांवर बहिष्कार! कास्ट्राईब शिक्षक संघटना आक्रमक; राज्यव्यापी असहकार...

१ डिसेंबरपासून अशैक्षणिक ऑनलाईन कामांवर बहिष्कार! कास्ट्राईब शिक्षक संघटना आक्रमक; राज्यव्यापी असहकार आंदोलनात सक्रिय सहभागाचा निर्धार!

शिक्षकांना अध्यापनापासून दूर ठेवणाऱ्या अशैक्षणिक कामांचा निषेध; प्रशासनिक व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचाही निर्णय, शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटना एकवटल्या

सातारा / प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षकांवर सातत्याने लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक ऑनलाईन कामांचा वाढता बोजा, प्रशासनाकडून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून दिले जाणारे सततचे आदेश आणि विविध उपक्रमांच्या सक्तीच्या अंमलबजावणीमुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत १ डिसेंबर २०२६ पासून असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनात कास्ट्राईब शिक्षक संघटनेनेही सक्रिय सहभाग नोंदवण्याची भूमिका घेतली असून, अशैक्षणिक ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

पुणे येथील शिक्षक भवनात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यापुढे शिक्षकांनी अशैक्षणिक ऑनलाईन कामे न करण्यासह प्रशासनिक व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त विविध प्रकारची माहिती भरणे, ऑनलाईन अहवाल सादर करणे, सततच्या डिजिटल सूचनांचे पालन करणे आणि विविध उपक्रमांची पूर्तता करणे यामध्ये गुंतवले जात असल्याने प्रत्यक्ष अध्यापनासाठी मिळणारा वेळ कमी होत असल्याची भावना शिक्षक प्रतिनिधींनी व्यक्त केली.

शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याची नाराजी

संचमान्यता धोरणाचे संभाव्य दुष्परिणाम, टीईटीबाबत शासनाची भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे अस्तित्व, शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव आणि शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न याकडे शासनाचे पुरेसे लक्ष नसल्याची नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली.

अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार, विविध उपक्रमांची सक्ती आणि एनजीओंचा वाढता हस्तक्षेप यामुळे शाळांमधील शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असल्याचे शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांचा अधिकाधिक वेळ प्रशासकीय कामांमध्ये खर्च होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेची आंदोलनाला ठाम साथ

राज्यस्तरावर शिक्षक संघटनांनी घेतलेल्या या निर्णयाला कास्ट्राईब शिक्षक संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. शिक्षकांच्या सन्मानाचे रक्षण, शैक्षणिक कामकाजाला प्राधान्य आणि प्रशासकीय कामांचा अनावश्यक बोजा कमी करणे, या प्रमुख मागण्यांसाठी संघटना एकजुटीने लढा देणार आहे.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे, संघटनेचे नेते उमेश गायकवाड, कोल्हापूर विभागाचे मार्गदर्शक राजकुमार रणवरे, विभागीय कार्याध्यक्ष संजय दिनकर खरात, विभागीय महिला आघाडी अध्यक्ष केशर माने, जिल्हा सचिव दीपक माने, माण तालुका अध्यक्ष शैलेश बोराटे, महिला आघाडी अध्यक्ष सुषमा सावंत, कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, कार्याध्यक्ष राजेंद्र निकाळजे, प्रमुख सल्लागार वैभव झेंडे, प्रसिद्धी प्रमुख स्वाती साळवे, संघटक प्रमुख दत्तकुमार खाडे, संघटक सचिन भोंडवे, सुजीत कांबळे, अविनाश जगताप, शिल्पा निंबाळकर आणि मोनाली झेंडे आदी पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्याची भूमिका घेतली आहे.

राज्यव्यापी एकजुटीतून आंदोलनाची पुढील दिशा

या राज्यस्तरीय बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या विविध गटांसह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक महासंघ, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, जुनी पेन्शन संघटना, प्रहार शिक्षक संघटना आणि दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटना आदी संघटनांचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

‘शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या!’ या घोषवाक्याखाली सर्व संघटना एकत्रितपणे लढा उभारणार आहेत. तसेच सामाजिक संस्था, विद्यार्थी व पालक संघटना आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून त्याला अध्यापनासाठी पुरेसा वेळ आणि अनुकूल वातावरण मिळणे आवश्यक आहे. शिक्षकांवर प्रशासकीय कामांचा अनावश्यक भार टाकण्याऐवजी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.

१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या असहकार आंदोलनामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेतील अशैक्षणिक कामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार असून, शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते, याकडे शिक्षक, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments