तरुणांना धम्म चळवळीशी जोडण्यासाठी बीबीएम फॅमिलीने पुढाकार घ्यावा; वर्षावास सांगता समारंभ उत्साहात
फलटण : ‘कोणी कितीही मोठा अधिकारी असो, पदाधिकारी असो किंवा सामान्य कार्यकर्ता असो; धम्माच्या कार्यात कोणीही वेगळा नाही. मनात गर्व बाळगणारा माणूस कितीही मोठा असला तरी शेवटी तळाला जातो. त्यामुळे पद, प्रतिष्ठा किंवा अधिकाराचा गर्व न बाळगता धम्म चळवळीसाठी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे,’ असे प्रतिपादन आयु. दिग्विजय गायकवाड यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका माजी कार्यकारणी च्या शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेच्या सांगता समारंभात तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
आयु. गायकवाड म्हणाले, ‘बौद्ध धम्म आपल्याला केवळ धीरगंभीर होण्याची शिकवण देत नाही, तर चौकस आणि चिकित्सक होण्याचा मार्ग दाखवतो. मी सांगतो म्हणून किंवा कोणीही सांगते म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ती काय आहे, कशी आहे, तिच्यामागील तथ्य काय आहे, हे स्वतः पडताळून पाहा. विचार करा आणि मगच स्वीकार करा.’
‘बीबीएम फॅमिलीने तरुणांना धम्म चळवळीशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तरुणांमध्ये मोठी ऊर्जा आणि परिवर्तनाची ताकद आहे. ही ऊर्जा धम्म, समता आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वळविण्यासाठी नियोजनपूर्वक काम करण्याची गरज आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पूज्य भंते कश्यप यांनी बुद्ध वंदनेचे महत्त्व स्पष्ट केले. बुद्ध वंदना ही केवळ धार्मिक विधी नसून बुद्धांच्या विचारांचे स्मरण, आत्मपरीक्षण आणि सदाचाराची प्रेरणा देणारी कृती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अश्विन पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व विशद करून वर्षावासाच्या सांगतेचा अर्थ स्पष्ट केला.
कार्यक्रमात पैशाच्या हिशोबाचे तपासणीस अरुण गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, महिला अध्यक्षा सुजाता गायकवाड, फलटण तालुका महिला अध्यक्षा रंजना रणवरे, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार रणवरे, आयु. विशाल पाटील, आयु. सागर भोसले, आयु. अजय भोसले आणि आयु. विजय भोसले यांनी धम्मविषयक मार्गदर्शन केले.
यावेळी ‘जगातील सर्वश्रेष्ठ दान कोणते आणि जगातील सर्वश्रेष्ठ धन कोणते?’ या विषयावर भगवान बुद्धांनी दिलेल्या विचारांचा उलगडा करण्यात आला. भौतिक संपत्तीपेक्षा ज्ञान, धम्मविचार, सदाचार आणि माणुसकीची श्रीमंती अधिक श्रेष्ठ असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या विधीचे संचालन भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव आणि माजी सरचिटणीस बाबासाहेब जगताप यांनी केले.
कार्यक्रमाला माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, माजी संस्कार सचिव बजरंग गायकवाड सर, अमोल भोसले सर, अॅड. चंद्रशेखर मोरे, मुंबई चे आयु.किरतावडे सर यांच्यासह संपूर्ण गायकवाड व रणवरे परिवार तसेच धम्म उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्षावासाच्या कालावधीत धम्मविचारांचा प्रसार, बुद्ध वंदना, प्रवचन आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निर्माण झालेली विचारांची ऊर्जा पुढेही कायम ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
