शिक्षण, सामाजिक समता आणि आधुनिक विकासाच्या वाटचालीवर राष्ट्रीय इतिहास परिषदेत विचारमंथन
फलटण | प्रतिनिधी फलटण नाईक निंबाळकर घराण्याने आधुनिक व पुरोगामी विचारांची परंपरा जपत शिक्षण, सामाजिक प्रगती आणि लोकविकासाला प्राधान्य दिले. ब्रिटिश काळात कोल्हापूर, सातारा, बडोदा आणि फलटण या संस्थानांनी आपल्या स्वतंत्र ओळखीबरोबरच प्रगतिशील धोरणांचा स्वीकार केला. या संस्थानांचा विकासात्मक इतिहास संशोधनाच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
सातारा इतिहास संशोधन मंडळ आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२० व्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ या विषयावर आयोजित १७ व्या वार्षिक अधिवेशन व एकदिवसीय राष्ट्रीय इतिहास परिषदेत समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
शिक्षणातून विकासाचा पाया
फलटण संस्थानातील शैक्षणिक वाटचालीचा उल्लेख करताना श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले की, १८८३ मध्ये मुधोजीराजे यांनी शिक्षणाचा पाया घातला. त्यानंतर विविध संस्थानांतील प्रगतिशील राज्यकर्त्यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, सहकार आणि आधुनिकतेला चालना दिली. राजर्षी शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज, श्रीमंत मालोजीराजे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यातून समाजपरिवर्तनाला दिशा मिळाली.
कर्मवीर भाऊराव पाटील आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या शिक्षणमहर्षींनी शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आधुनिक शेती, पाणीपुरवठा, पाटबंधारे, कालवे, धरणे, लघुउद्योग, व्यावसायिक शिक्षण, स्त्री शिक्षण, लोकशाही मूल्ये आणि अस्पृश्यता निवारण यांसारख्या विषयांत संस्थानांच्या योगदानाचा अभ्यास होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
फलटण संस्थानच्या योगदानाचे संशोधन व्हावे
परिषदेचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अवनीश पाटील यांनी फलटण, कोल्हापूर आणि सातारा या संस्थानांच्या सामाजिक व राजकीयदृष्ट्या पुरोगामी आणि मानवतावादी वाटचालीवर प्रकाश टाकला. फलटण संस्थानात रुजलेल्या आधुनिक विचारांचा व्यापक समाजावर झालेला परिणाम संशोधनातून समोर आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
फलटण संस्थानाच्या प्रगतीचा आलेख सत्यशोधक पालेकर यांनी १९४३ मध्ये तुलनात्मक पद्धतीने मांडल्याचा संदर्भ देत, संस्थानांच्या इतिहासाकडे वस्तुनिष्ठ आणि संशोधनाधारित दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती आणि देणगीदारांचा सन्मान
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. विजयराव नलवडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, प्रा. डॉ. जयपाल सावंत, प्रा. डॉ. संतोष कदम, प्रा. डॉ. तुकाराम शिंदे आणि डॉ. अनिक रिशे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय परिषदेसाठी प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी भोजनखर्च प्रायोजित केला. तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र कोरे यांनी २५ हजार रुपये, प्रा. डॉ. संतोष कदम यांनी ११ हजार रुपये, तर प्रताप गावडे, मनोज कदम, कौशल्या रणदिवे, संदीप रिशे आणि माळवदे मॅडम यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांचे योगदान दिले. या देणगीदारांसह मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापक या परिषदेला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले, तर आभार प्रा. अभिजित कदम यांनी मानले.
