ज्ञान, खेळ, उत्साह आणि खिलाडूवृत्तीचा अनोखा संगम; बरडमधील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
फलटण : महिलांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांच्या चौकटीबाहेर त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, स्वतःला व्यक्त करता यावे आणि आपल्या कौशल्यांना वाव मिळावा, या उद्देशाने बरड येथील शिवशंभो नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने ‘खेळ पैठणीचा, उत्साह आनंदाचा’ हा महिलांसाठीचा रंगारंग कार्यक्रम उत्साहात पार पडला. बरड गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘खेळ पैठणीचा, उत्सव आनंदाचा, साज मराठमोळा, अभिमान महाराष्ट्राचा’ या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाचे संयोजन व निवेदन समाज प्रबोधनकार महावीर भालेराव आणि उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक, व्याख्याते तथा उत्कृष्ट सूत्रसंचालक बाबासाहेब जगताप यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे आणि रामचंद्र मोरे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रश्नमंजुषेने झाली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे मनोरंजनासोबतच महिलांच्या ज्ञानाला, इतिहासाच्या जाणिवेला आणि सामाजिक भानालाही उजाळा मिळाला.
यानंतर संगीताच्या तालावर ‘तळ्यात-मळ्यात’, हातांचा वापर न करता दोऱ्याला बांधलेली मिरची बाटलीत टाकणे, कपाळावर ठेवलेले बिस्किट खाली न पडता तोंडापर्यंत नेणे, तोंडात धरलेल्या पत्रावळीच्या साह्याने खुर्ची वरती लावण्यात आलेली मेणबत्ती विजवणे अशा गमतीदार खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली. प्रत्येक खेळात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. विविध फेऱ्यांमधून अंतिम स्पर्धकांची निवड करून संगीत खुर्चीचा खेळ घेण्यात आला.
विजया आवटे यांना मानाची पैठणी
अंतिम फेरीतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक – विजया नवनाथ आवटे : पैठणी (संपतराव खंडू लोंढे यांच्याकडून), द्वितीय क्रमांक – सीमा शशिकांत आवटे : मिक्सर (विकास आवटे व रजनीकांत आवटे यांच्यामार्फत), तृतीय क्रमांक – सायली बुद्धभूषण लोंढे : मिनी कुलर (शिवशंभो तरुण मित्र मंडळाच्या वतीने), चतुर्थ क्रमांक – उज्ज्वला रमेश सावळकर : डिनर सेट (विश्वजीत सुनील आवटे यांच्याकडून), पाचवा क्रमांक – आरती सूरज आवटे : कुकर (नितीन भगवान आवटे यांच्याकडून)
सर्व सहभागी स्पर्धकांना गिफ्ट हॅम्पर देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
पैठणीच्या पलीकडे महिलांच्या आत्मविश्वासाचा उत्सव
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पैठणी किंवा अन्य बक्षिसांपेक्षा महिलांचा सहभाग, त्यांचा आनंद आणि आत्मविश्वास यांना अधिक महत्त्व देण्यात आले. महिलांना स्वतःसाठी वेळ देता यावा, आपले कौशल्य व्यक्त करता यावे, नव्या मैत्री निर्माण करता याव्यात आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवता यावा, यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असते.
महिलांच्या दैनंदिन आयुष्यातील जबाबदाऱ्यांमधून त्यांना आनंदाचे काही क्षण मिळवून देणारा हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही. ज्ञान, खिलाडूवृत्ती, सामाजिक जाणीव आणि परस्परांतील स्नेह यांची सांगड घालत तो महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा उत्सव ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवशंभो नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसह इतर सहकाऱ्यांनी नियोजन आणि अंमलबजावणीसाठी परिश्रम घेतले.
