विठ्ठल बाबुराव निकाळजे सरांकडून विद्यार्थ्यांना २९ स्पोर्ट्स किटचे वाटप
फलटण : विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने मा. श्री. विठ्ठल बाबुराव निकाळजे सर, माजी मुख्याध्यापक, श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजाळे सर्कलमधील शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनगाव बंगला येथील विद्यार्थ्यांसाठी एकूण २९ स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडेला महत्त्व देणे आवश्यक आहे. हीच भूमिका लक्षात घेऊन विठ्ठल बाबुराव निकाळजे सर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध करून देत त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत होणार असून, त्यांच्यात सांघिक भावना, खिलाडूवृत्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास हातभार लागणार आहे.
या कार्यक्रमासाठी फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. मठपती साहेब, राजाळे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. बबनराव निकाळजे साहेब, श्री. राहुल पाटील, श्री. धर्मराज लांडगे, प्राध्यापक श्री. राजेश निकाळजे, ग्रामविकास अधिकारी श्री. राऊत साहेब, श्री. थोरात सर, श्री. संदीप पिंगळे आणि मुख्याध्यापक श्री. धनाजी मोरे सर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या क्रीडाविषयक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विठ्ठल बाबुराव निकाळजे सर यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडाविकासासाठी केलेले हे सहकार्य प्रेरणादायी असून, शिक्षण क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल संबंधित शाळांच्या वतीने त्यांचे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
