हलदहिवडी विद्यालयातील यशस्वी कुस्तीपटू व मैदानी स्पर्धेतील खेळाडूंचा भव्य सत्कार
हर्षदा होवाळची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; मैदानी स्पर्धेतही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
हलदहिवडी, ता. सांगोला : श्री लक्ष्मणराव येडगे शिक्षण प्रसारक मंडळ, हलदहिवडी संचलित हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, हलदहिवडी येथील विद्यार्थ्यांनी कुस्ती व मैदानी स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यालयाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष प्रा. अपर्णा येडगे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला वनपरिक्षेत्राचे वन अधिकारी पोपटराव कोळी उपस्थित होते.
विभागीय स्तरावरील शालेय मुलींच्या कुस्ती स्पर्धेत विद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा बापू होवाळ हिने प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय शालेय मुलींच्या कुस्ती स्पर्धेसाठी निवड मिळवली. तसेच जाई राजेंद्र होवाळ हिने विभागीय स्तरावरील शालेय मुलींच्या कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात भर घातली. या स्पर्धा खोपोली येथील काशी स्पोर्ट्स सेंटर येथे होणार आहेत. हर्षदा हिच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाचा गौरव वाढला आहे.
याचबरोबर शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. यामध्ये युवराज अनिल पाटील याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, महेश कालिदास चव्हाण याने ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, आर्या राजेंद्र होवाळ हिने अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक, अमोल तानाजी कोळेकर याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक, दीक्षा समाधान चव्हाण हिने अडथळा शर्यतीत तृतीय क्रमांक, तर गुंजन संतोष येडगे हिने ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
कुस्ती आणि मैदानी स्पर्धांमधील या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील परंपरेला नवी झळाळी मिळाली असून, इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. अपर्णा येडगे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही जिद्द, चिकाटी, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रमुख पाहुणे वन अधिकारी पोपटराव कोळी यांनीही विद्यार्थ्यांच्या क्रीडा कामगिरीचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र जानकर, प्रशालेचे माजी विद्यार्थी व वन अधिकारी पोपटराव कोळी, पालक बापू मोहन होवाळ, राजेंद्र मोहन होवाळ, गणेश तांबे वस्ताद, मार्गदर्शक प्रवीण मेटकरी, पैलवान बापू शेख, संतोष येडगे, समीर शेख, शिवाजी चव्हाण सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक शिवाजी चव्हाण सर यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मोरे सर यांनी केले. या सत्कार समारंभासाठी मोठ्या संख्येने पालक, कुस्तीप्रेमी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक आणि त्यांना मिळालेल्या प्रोत्साहनामुळे संपूर्ण विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
हलदहिवडी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश विद्यालयासाठी अभिमानास्पद असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
