फलटण : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या फलटण तालुका अध्यक्षपदी श्री. महादेव गायकवाड यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.
या निवडीचे अधिकृत पदाचे पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री. महादेव गायकवाड यांना प्रदान करण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी संवाद साधणे, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे तसेच पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्याची जबाबदारी श्री. महादेव गायकवाड यांच्यावर राहणार आहे.
या नियुक्तीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री. राजाभाऊ निकम तसेच शहराध्यक्ष अमीर भाई शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महादेव गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे फलटण तालुक्यात सामाजिक न्याय विभागाचे संघटनात्मक काम अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नियुक्तीनंतर गायकवाड यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
