Thursday, October 1, 2026
Homeफलटणगांधी नावाचे गारुड : शिक्षणातून माणूस घडविण्याची वाट

गांधी नावाचे गारुड : शिक्षणातून माणूस घडविण्याची वाट

गांधी नावाचे गारुड : शिक्षणातून माणूस घडविण्याची वाट

नई तालीमपासून आनंद निकेतनपर्यंतचा एक शैक्षणिक प्रवास

फलटण प्रतिनिधी :- ‘गारुड करणे’ याचा अर्थ मोहणे, ताबा मिळवणे असा होतो. म्हणून आपण बोलताना कधीकधी ‘अमुकतमुक व्यक्तीने मनावर गारुड केले’ असे म्हणतो. येथे अमुकतमुकच्या जागी एखादी व्यक्ती, कला किंवा अन्य कोणतीही गोष्ट असू शकते. याचाच समानार्थी शब्दप्रयोग म्हणजे ‘मनावर अधिराज्य गाजवणे’. म्हणूनच सापावर ताबा किंवा नियंत्रण मिळवणाऱ्याला ‘गारुडी’ म्हणत असावेत.

लौकिक अर्थाने गांधी नावाचे हे असेच एक गारुड आहे, जे आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने गांधीजींच्या विचारांकडे पाहताना राजकारण, स्वातंत्र्यलढा, सत्य आणि अहिंसा यांच्याबरोबरच त्यांच्या शिक्षणविषयक विचारांकडे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. कारण गांधीजींसाठी शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख, परीक्षा किंवा पदवी मिळविण्याचे साधन नव्हते. शिक्षण म्हणजे माणसाच्या शरीराचा, मनाचा, बुद्धीचा आणि अंतःकरणाचा विकास करणारी प्रक्रिया होती.

गांधीजींच्या शिक्षणविषयक विचारांचा मागोवा घेताना त्यांची ‘नई तालीम’ किंवा ‘बुनियादी शिक्षणपद्धती’ आजच्या स्थितीत कुठे आहे, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. ती सर्वदूर पोहोचू शकली नाही, त्याची कारणे काय आहेत? काय होती ही शिक्षणपद्धती? आणि आजच्या शिक्षणव्यवस्थेत तिचे कोणते विचार पुन्हा नव्याने समोर येताना दिसतात?

गांधीजींनी स्वराज्यप्राप्तीपूर्वी, १९३७ साली, ‘नई तालीम’ म्हणजेच बुनियादी शिक्षणपद्धतीचा विचार देशासमोर मांडला. ती आपली सर्वोत्तम व शेवटची देणगी असल्याचे गांधीजींनी नमूद केले आहे. त्यांच्या मते, शिक्षणाचा व ज्ञानाचा विचार अनादि असतो. तो नवा नसतो; पण मधूनमधून तो विचार मंद पडत जातो. नव्या युगाबरोबर नव्या रूपात त्याला प्रकाशित करावे लागते. असे केले म्हणजे ती एक नवीन वस्तू बनते.

या विचारात गांधीजींच्या शिक्षणदृष्टीचे सार दडलेले आहे. शिक्षण ही स्थिर किंवा एका चौकटीत बंदिस्त असणारी गोष्ट नाही. ते काळानुसार बदलणारे, समाजाच्या गरजांशी जोडले जाणारे आणि प्रत्येक पिढीला नव्याने अर्थ देणारे असते. त्यामुळे प्रत्येक पिढीमध्ये शिक्षणाला नव्या रूपात मांडावे लागते आणि त्यातूनच नवनिर्मिती आकाराला येते, असे गांधीजींना वाटत होते.

गांधीजींनी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात बुनियादी शिक्षणपद्धती अनेक वर्षे वापरली. जरी यात प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणासंबंधीचा विचार अंतर्भूत होता, तरी पुढे गांधीजींच्या विचारांना मूर्त रूप देण्यासाठी विविध शिफारशी स्वीकारण्यात आल्या. पूर्व-बुनियादी शाळेच्या कार्यक्रमाविषयी आपल्या कार्यकर्त्यांशी गप्पागोष्टी करताना गांधीजी म्हणाले होते की, ही सर्व मुले आपली आहेत. त्यांचे शरीर सुदृढ बनले, त्यांची बौद्धिक वाढ झाली, त्यांना चांगल्या सवयी लागल्या आणि ती सद्वर्तनी बनली, म्हणजे पूर्व-बुनियादी शिक्षणाचा हेतू सफल झाला. मुलांना अशा तऱ्हेने शिकवायचे की त्यांनी नवीन गोष्टींची निर्मिती करायला सुरुवात करावी. अशा निर्मितीतच कलेचाही समावेश होतो.

गांधीजींना अभिप्रेत असणारी शिक्षणप्रणाली त्यामुळे व्यापक होती. स्वच्छता प्रशिक्षण, सकस आहार, निरोगी आरोग्य, कोणत्याही कामात कठोर परिश्रम व साधना, देशभक्ती, माता-पित्यांची सेवा अशा अनेक गोष्टी तिच्यात अंतर्भूत होत्या. प्रत्येक माणसात जे सुप्त सामर्थ्य असते, ते बाहेर काढून त्याचे प्रकटीकरण करणे हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट आहे, असे गांधीजी मानत. शिक्षण हे माणूस घडवणारे असते. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी शिक्षण मुठभर लोकांची मिरासदारी न राहता ते तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.

मातृभाषेतून शिक्षण

गांधीजींच्या बुनियादी शिक्षणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मातृभाषेतून शिक्षण. सर्व भारतीयांना शिक्षण सुलभ व परिणामकारक करण्यासाठी ते मातृभाषेतून देणे आवश्यक आहे, असे गांधीजी मानत. त्यांच्या मते, मातृभाषेतून शिक्षण देणे हाच खऱ्या शिक्षणाचा पाया आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या आत्मविकासाला खरा वाव मिळतो.

मातृभाषेतून शिक्षण देणे का गरजेचे आहे, याचा विचार आधुनिक काळातील मेंदू संशोधनाच्या संदर्भातही केला जातो. गांधीजींनी मात्र हा विचार आपल्या काळातच मांडला होता. मुलांबरोबर आपण जे काम करू, ते त्यांच्या रोजच्या जीवनाशी संबंध राखणारे असले पाहिजे, असे त्यांचे मत होते.

“The proper teaching of mother tongue is the foundation of all education. Without the capacity to speak effectively and read and write correctly and lucidly, no one can develop precision of thought or clarity of ideas. Moreover, it is a means of introducing the child to the rich heritage of his people’s ideas, emotions and aspirations, and can therefore be made a valuable means of social education, while also instilling right ethical and moral values .Also it is a natural outlet for the expression of the child’s aesthetic sense and appreciation and if proper approach is adopted, the study of literature become a source of joy and creative expression.(Basic Education page-17)

मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व यामुळे अधिक स्पष्ट होते. मातृभाषा ही परिसराची भाषा असते. भाषेला सामाजिक संदर्भ असतो. मातेच्या उदरातून मूल जेव्हा जन्माला येते, पुढे ते आपल्या आईकडून मातृभाषा शिकते आणि त्यातून त्याचे भावविश्व तयार होते. त्याच्या दैनंदिन जीवनातील घटना, प्रसंग व परिसरातील गोष्टींचा समावेश भाषा शिक्षणात झाला पाहिजे.

काही वेळेस मुलांची घरची भाषा, त्या गावची भाषा व त्या राज्याची भाषा वेगळी असल्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्यास अडचण येते. त्याचप्रमाणे त्याला त्याचे प्रतिबिंब शाळेत कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्यांना शाळा नकोशी वाटते. अशी मुले शाळेपासून आणि शिक्षणापासून दुरावतात. म्हणून मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह गांधीजी धरत.

मुलोद्योग : कामातून ज्ञानाकडे

गांधीजींच्या शिक्षणविचारातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘मुलोद्योग’ किंवा Craft. केंद्रीभूत अथवा मूलभूत उद्योग. जीवनाला आवश्यक असे उद्योग म्हणजे मुलोद्योग. सर्वसामान्य भारतीय माणसाच्या जीवनात अन्न, वस्त्र व निवारा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गांधीजींनी हे ओळखले. म्हणूनच त्यांनी शेती, सूतकताई व विणकाम, सुतारकाम अशा ग्रामीण जीवनात महत्त्व प्राप्त झालेल्या गोष्टींचा समावेश शिक्षणात आणि अभ्यासक्रमात करण्याची सूचना मांडली.

मुलोद्योगी शिक्षण म्हणजे उत्पादक उद्योगाच्या माध्यमातून द्यावयाचे शिक्षण, असे गांधीजींना महत्त्वाचे वाटत होते. यातून विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देण्यास मदत होते. उद्योगातील प्रक्रिया आणि त्यामागील विविध विषयांची माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होते. मुलोद्योगातून बनवलेल्या वस्तूंना किंमतही मिळते. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते.

या लोकोपयोगी उद्योगांमुळे विद्यार्थ्यांचा खेड्यातील लोकांशी सहज संबंध येतो आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. डॉ. झाकीर हुसेन समितीने गांधीजींच्या विचारांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला. वर्धा शिक्षण योजनेत त्याचा समावेश करण्यात आला. सूतकताई व विणकाम यांच्याबरोबर पुढे सुतारकाम, शेती यांचाही समावेश करण्यात आला. कागदकाम, पुठ्ठाकाम व बागकाम यांसारख्या उपमुलोद्योगांचाही स्वीकार करण्यात आला.

मुलोद्योगामुळे मानसशास्त्रीयदृष्ट्या मुलांच्या कौशल्यविकासाला विशेष वाव मिळाला. एवढ्यावरच न थांबता या उद्योगातून मुलांना प्रत्यक्ष क्रियानुभवाचे ज्ञान मिळाले. यातून कष्टाची, स्वावलंबनाची व सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली. खेड्यातील उद्योग शाळेत करण्यामुळे एक प्रकारचे आनंददायी वातावरण तयार झाले. सामाजिक समता वाढीस लागली.

या उद्योगातून एखादी वस्तू आपण स्वतः बनवतो आहोत, याचे समाधान विद्यार्थ्यांना वाटते. त्या वस्तूचे सौंदर्य आणि तिची योग्य किंमत यांची जाणीव त्यांना होते. हीच व्यवस्था सर्वांगीण शिक्षण देणारी आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या हेतूने चरखा हा ग्रामीण लघुउद्योगाचा केंद्रबिंदू गांधीजींनी मानला. मात्र, गांधीजींना या उद्योगातून केवळ विणकर, सुतार किंवा शेतकरी तयार करायचे नव्हते. वेळेचा सदुपयोग करून ज्ञान आणि कर्म यांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचे होते.

वर्धा शिक्षण योजना कृतीकेंद्रित असल्याने विद्यार्थ्यांच्या जिज्ञासावृत्तीला चालना देणारी होती. पुस्तकी ज्ञानाला नुसते महत्त्व न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देणारी होती. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, नवीन शिकण्याची आणि नवनिर्मितीची भावना वृद्धिंगत झाली. उद्योगांमुळे ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये उपयोगात आणता आली. ‘ज्ञाताकडून अज्ञाताकडे’, ‘सुगमाकडून दुर्गमाकडे’ आणि ‘मूर्ताकडून अमूर्ताकडे’ नेणारा हा शिक्षणप्रवास होता.

गांधीजी म्हणतात, ‘शिक्षण केवळ साहित्यप्रधान करणे हा एक गुन्हाच आहे. अशा साहित्यप्रधान शिक्षणामुळे विद्यार्थी शारीरिक श्रम करण्यास असमर्थ ठरतात. यासाठी बाल्यावस्थेपासूनच मुलांच्या मनावर श्रमाचे महत्त्व बिंबवले पाहिजे.’

पुढे ते म्हणतात, ‘हस्तव्यवसाय आणि उद्योग या माध्यमातून सर्व शिक्षण देण्याची मला आवश्यकता वाटते.’ अशाप्रकारे गांधीजींनी कृतियुक्त शिक्षणावर भर दिला.

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास

गांधीजींनी शारीरिक शिक्षण सक्तीचे करण्याचा आग्रह धरला. शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाला महत्त्व दिले म्हणजे मुलांना व्यायामाचे महत्त्व पटेल. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते, ही धारणा त्यामागे होती. आपल्या संस्कृतीतील ध्यानधारणा, प्राणायाम आणि योगासने यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व्हावा, अशी त्यांची भूमिका होती.

गांधीजींनी शिक्षणाची व्याख्या करताना शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक बाबतीतील उच्च तत्त्वांचे अविष्करण म्हणजे शिक्षण होय, असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे त्यांनी शारीरिक शिक्षणाचा आग्रह धरला, त्याप्रमाणे आध्यात्मिक शिक्षणाचाही आग्रह धरला.

आई-वडिलांनी मुलांना आपल्या धर्मग्रंथांची ओळख करून द्यावी, पुराणातील उच्च आदर्श, नीतिकथा, सुभाषिते, नीतिवचने व प्रार्थना यांचा परिचय करून द्यावा, असे गांधीजी म्हणत. त्यांच्या मते, या गोष्टी आत्मिक विकासासाठी तसेच मनःशांतीसाठी उपयुक्त आहेत.

अध्यात्मिक ज्ञानाशिवाय असणारे शिक्षण म्हणजे पाया नसलेली भिंत किंवा सफेदी दिलेले थडगे, अशी त्यांनी त्याची तुलना केली आहे. अशा प्रकारे गांधीजींनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाला चालना देणाऱ्या शिक्षणाचा आग्रह धरला.

मात्र शारीरिक शिक्षणाचा अर्थ हिंसेची शक्ती निर्माण करणे नव्हे, तर अहिंसेचे आचरण करण्यासाठी शरीर सक्षम करणे हा होता. त्यामुळे शारीरिक शिक्षणाच्या संदर्भातही गांधीजींच्या विचारांच्या केंद्रस्थानी अहिंसा होती.

शिक्षण म्हणजे माणूस घडविण्याची प्रक्रिया

गांधीजींच्या शिक्षणपद्धतीत आजही विचार करण्यासारखे सामर्थ्य आहे. त्यासाठी आजच्या शिक्षणपद्धतीत काही मूलभूत बदल करावे लागतील. यातून विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक विकासच नव्हे, तर सर्वांगीण विकास घडून येऊ शकतो.

गांधीजींनी जीवनाचा समग्रपणे विचार केला होता. त्यांनी प्रचलित शिक्षणव्यवस्थेवर टीका करून त्यात काही आमूलाग्र बदल सुचवले. शिक्षणाचे सत्य स्वरूप स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘आम्ही काय शिकतो याची आई-बापांना पर्वा नसते. शिक्षण म्हणजे परीक्षा देण्यासाठी केलेली हमाली असेच प्रायः मानले जाते, आणि परीक्षा होताक्षणीच केलेला अभ्यास लवकरात लवकर विसरून जाण्याचा प्रयत्न केला जातो.’

परीक्षाकेंद्री शिक्षणाबाबत गांधीजींची ही चिंता आजही विचार करायला लावणारी आहे. शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनात, विचारात आणि वर्तनात दिसला पाहिजे. केवळ पाठांतर आणि परीक्षा यापुरते शिक्षण मर्यादित राहू नये, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता.

शिक्षण हे फक्त शाळेतच मिळते असे नाही. जगाच्या शाळेत प्रत्येकजण प्रत्येक क्षणी काही ना काही नवीन शिकत असतो. निसर्गातील प्रत्येक घटकातून, परिसरातून रोज नवनवीन गोष्टी आपण कळत-नकळत शिकत असतो. शिक्षण जीवनाशी जोडलेले असेल तरच त्याचा खरा अर्थ उलगडतो.

शिक्षक हा मार्गदर्शक

गांधीजींच्या शिक्षणविचारात शिक्षकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षकाने केवळ विषय शिकवणारा म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक म्हणून काम करावे, असे गांधीजी मानत. शिक्षकाने स्वतःही नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांची वेळोवेळी प्रशिक्षणे झाली पाहिजेत. शिक्षकी पेशा हा विद्यार्थ्यांच्या हृदयाला स्पर्श करणारा असायला हवा.

गांधीजी म्हणतात, ‘कितीही किंमत द्यावी लागो, परंतु आपल्या मुलांसाठी उत्तम शिक्षक मिळवता आले पाहिजेत.’

शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाबाबत गांधीजींची भूमिका अधिक कठोर होती. त्यांच्या मते, शिक्षकाने शीलवान आणि चारित्र्यसंपन्न असले पाहिजे. कारण शिक्षक जे पुस्तकातून शिकवतो त्यापेक्षा त्याच्या प्रत्यक्ष जीवनातून विद्यार्थी अधिक शिकतात.

गांधीजी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात, ‘शिक्षक पुस्तकातून जे शिकवतात वा व्याख्यानाद्वारा जे ज्ञानभांडार विद्यार्थ्यांच्या पदरात टाकतात, त्यापेक्षा शिक्षकांच्या प्रत्यक्ष जीवनापासून विद्यार्थी अधिक गोष्टी आत्मसात करतात, असा माझा अनुभव आहे.’

यातून गांधीजींच्या शिक्षणदृष्टीतील शिक्षकाचे स्थान स्पष्ट होते. शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारा नसून विद्यार्थ्यांसमोर जगण्याचा एक आदर्श ठेवणारा असतो. म्हणूनच शिक्षकांनी शिकवणे हा केवळ आपला पेशा न समजता माणूस घडविणारे एक उदात्त कर्तव्य आहे, या भावनेने अध्यापन करावे, अशी गांधीजींची अपेक्षा होती.

काम आणि ज्ञानाचा समन्वय

गांधीजींचा शिक्षणविषयक विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी शाळांमध्ये काही मूलभूत उद्दिष्टे समोर ठेवून शालेय कामकाज करणे आवश्यक आहे.

१) काम आणि ज्ञानाचा समन्वय
२) अन्न, वस्त्र, निवारा
३) समतामूलक, अहिंसक समाजनिर्माण
४) जीवनातील अनुभव घेऊन कृतीशील शिक्षण
५) शरीर, मन, बुद्धीचा वापर
६) सामाजिक भान, प्रामाणिकपणा व आरोग्य

आजच्या काळात यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापनातील प्रभावी वापरही जोडला पाहिजे. तंत्रज्ञान हे शिक्षणाचा पर्याय नसून शिक्षण अधिक परिणामकारक करण्याचे साधन ठरू शकते. गांधीजींच्या मूलभूत विचारांना आधुनिक साधनांची जोड देणे, हीच त्यांच्या विचारांची समकालीन मांडणी ठरू शकते.

नई तालीमसमोरील प्रश्न

वर्धा शिक्षण परिषदेच्या काळात बुनियादी शिक्षणाचा विचार व्यापक पातळीवर पुढे आला. पुढे स्वातंत्र्योत्तर भारतात विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक शिक्षणाच्या विविध प्रवाहांनी वेग घेतला. या प्रक्रियेत नई तालीमचा प्रभाव कमी होत गेला.

गांधीजींची शिक्षणविषयक बुनियादी शिक्षणपद्धती किंवा नई तालीम शिक्षणपद्धती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आणि विविध शैक्षणिक धोरणांमध्ये अधिक ठोसपणे प्रतिबिंबित व्हायला हवी होती, असा विचार अनेक शिक्षणतज्ज्ञांनी मांडला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये ‘काम आणि शिक्षण’ या संकल्पनेला स्वतंत्र स्थान देण्यात आले. उत्पादक कामातून आणि हस्तउद्योगातून शिक्षण होऊ शकते, हा विचार डॉ. अनिल सदगोपाल आणि डॉ. कृष्णकुमार यांनी पुन्हा एकदा देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या विचारांचा अभ्यासक्रमाच्या आराखड्यात समावेश करण्यात आला.

याच विचारपरंपरेशी जोडलेला एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे आनंद निकेतन शाळा.

नई तालीम संकल्पनेवर आधारित शाळा : आनंद निकेतन

वर्धा सेवाग्राम आश्रम येथे २००५ साली आनंद निकेतन शाळा सुरू झाली. मन, बुद्धी आणि शरीर यांचा सर्वांगीण विकास करणारे एकात्मिक स्वरूपाचे शिक्षण आणि त्यामध्ये उत्पादक कामाला महत्त्वाचे स्थान, या विचारातून सुषमा शर्मा यांच्या प्रयत्नातून ही शाळा सुरू झाली.

उत्पादक कामाला महत्त्व का दिले गेले, याचे कारण सुषमा शर्मा सांगतात, “बहुसंख्य लोक श्रमजीवी, कष्टकरी आहेत आणि समाजाच्या धारणेसाठी त्यांचे श्रम अतिशय मोलाचे आहेत. त्यांच्या श्रमाला आणि ज्ञानाला शास्त्रीय ज्ञानाची जोड अनौपचारिक पद्धतीने देता यावी आणि त्यातून निर्माण होणारी शिक्षणपद्धती बहुसंख्य लोकांना स्वाभिमानाने जगता येण्याची व आत्मसन्मान मिळवून देणारी असेल.”

म्हणून या शिक्षणपद्धतीत उत्पादक कामाला महत्त्व देण्यात आले.

वरील उद्दिष्टांचा विचार करून आनंद निकेतनमध्ये अध्यापन सुरू आहे. नई तालीम शिक्षणपद्धतीचे एक दिशादर्शक प्रतिनिधित्व आनंद निकेतन करते. सर्वांगीण विकास, श्रमावर आधारित शिक्षण आणि हाताच्या कामाला बुद्धीची जोड हा त्याचा केंद्रबिंदू आहे.

मातीच्या वस्तू, कलर पेंटिंग, सुतळीपासून विविध वस्तू, चिकटकाम इत्यादी गोष्टींना येथे स्थान आहे. या कामात मन, हात आणि शरीर यांचा सुरेख संगम साधला जातो. हाताच्या कामाचे रूपांतर केवळ उत्पादनात न होता त्यातून कला, ज्ञान, कल्पकता आणि आत्मविश्वास विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो.

स्वयंशिस्त

बालवाडीपासून ते इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग सुरू असून मुलांमध्ये स्वयंशिस्त आहे. मुले आपापली कामे करतात, आवश्यकतेनुसार इतरांना मदत करतात तसेच इतरांची मदत घेतात.

बालवाडी

वर्गात मुलांची दररोज हजेरी घेतली जाते. ते काम मुले स्वतःचे स्वतः करतात. वेल्क्रोच्या मदतीने मुलांच्या उंचीचा विचार करून डिस्प्ले बोर्ड लावला असून त्याठिकाणी लाल आणि हिरवे घोटीव पेपरचे तुकडे ठेवले आहेत. उपस्थित असतील तर हिरवा तुकडा आणि गैरहजर असतील तर लाल तुकडा विद्यार्थी स्वतः लावतात.

मागे असणाऱ्या मुलांसाठी उपचारात्मक वर्ग

इयत्ता पहिली ते चौथीच्या मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक वर्ग घेतले जातात. त्यासाठी वेगवेगळे शिक्षक नेमले आहेत. शिक्षकांनी आवश्यकतेनुसार त्या त्या स्तरातील विद्यार्थ्यांसाठी साहित्यनिर्मिती केली आहे.

विविध विभाग

आनंद निकेतनमध्ये विज्ञान लॅब, गणित लॅब, इंग्रजी विभाग, कला विभाग, सूतकताई विभाग असे विविध विभाग तयार करण्यात आले आहेत.

कला विभागात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, कागदाच्या व चित्रांच्या आकर्षक कलाकृती तयार करणे अशा उपक्रमांना वाव दिला जातो. सूतकताई विभागात मुलांना रोज ठराविक वेळ दिला जातो. वर्षभरात कातलेल्या सुतानुसार त्यातील काही कापड त्या मुलांना दिले जाते.

इंग्रजी लॅबमध्ये केवळ पाठांतर न करता विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिकण्यावर भर दिला जातो. मुले प्रत्यक्ष तयार केलेले साहित्य हाताळत शिकतात.

वर्गातील बैठक रचना अर्धवर्तुळाकार असते. त्यामुळे शिक्षक प्रत्येक मुलाजवळ जाऊ शकतात. ज्या मुलांना मदतीची गरज आहे, त्यांना मध्ये घेऊन शिक्षिका बसतात. मांडणी सतत बदलती असते. शिक्षक दृढीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम घेतात. प्रत्येक मुलाजवळ जाऊन त्याच्यासाठी प्रयत्न केला जातो.

आनंद निकेतनमधील काही महत्त्वपूर्ण गोष्टी

१. मुलांनी आरशात बघून स्वतः काढलेली चित्रे वर्गात लावली जातात.
२. मागे असणाऱ्या मुलांसाठी पूरकवर्ग तयार केलेला आहे. मूल ज्या टप्प्यावर असेल, तसे त्याला मार्गदर्शन मिळते.
३. शाळेत शैक्षणिक व कला यांचा संगम साधून शिक्षण दिले जाते.
४. मुलांना भरपूर चित्रे काढण्याची संधी दिल्याने त्यांच्या बोटांच्या स्नायूंच्या विकासाला चालना मिळते.
५. अंगणवाडीतील मुलांची हजेरीही मुलांकडूनच घेतली जाते.
६. शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर केला जातो.
७. मुलांमध्ये स्वयंशिस्त तसेच एकमेकांना मदत करण्याची वृत्ती दिसते.
८. शिक्षक आणि मुले यांच्यातील बंध जिव्हाळ्याचा आहे.
९. शाळेतील वातावरण प्रसन्न आहे.

अध्यापन आणि मूल्यमापन

आनंद निकेतनमधील अध्यापनपद्धतीविषयी सुषमा शर्मा सांगतात की, विषयाधारित ज्ञान मुलांना कृतीशील पद्धतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिले जाते. इतर शाळांप्रमाणे चाचण्या घेतल्या जातात; मात्र त्याबरोबर प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेल्या कृतींनाही महत्त्व दिले जाते.

उदाहरणार्थ, मुलांना वर्गखोल्यांचे मोजमाप करून दाखवायला सांगितले जाते. जागा किती आहे, या जागेत विशिष्ट आकाराची किती बाके बसतील, या भिंतीला रंग देण्यासाठी किती रंग लागेल, अशा प्रश्नांच्या माध्यमातून गणिताचा प्रत्यक्ष वापर समजावून दिला जातो.

मुले दैनंदिन जीवनात जी कामे करतात, जसे की बागेत काम करणे, स्वयंपाकघरात काम करणे किंवा वर्गात काम करणे, यावरूनही मूल्यमापन केले जाते. मुले मोजमाप कशी करतात, शिवणकाम करताना मोजमाप कसे करतात, मीटर-सेंटीमीटर यांची त्यांना समज आहे का, कामाची आखणी कशी करतात, दुसऱ्यांच्या कामाबद्दल भान व संवेदना ठेवतात का, मिळून काम करताना जबाबदारीने काम करतात का, लिंगभावनिरपेक्ष पद्धतीने विविध कामांकडे पाहतात का, याकडेही बारकाईने लक्ष दिले जाते.

लोकशाही पद्धतीने शाळा चालावी, असे धोरण सुरुवातीपासूनच आनंद निकेतनने स्वीकारले आहे. सभांमध्ये मुले आपले विचार स्पष्टपणे मांडतात का, आपले म्हणणे निर्भयपणे मांडू शकतात का, सामाजिक, भावनिक व बौद्धिक पातळीवर उपयोजन दिसते का, याचे निरीक्षण केले जाते.

वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलांचे निरीक्षण करून चाचण्या घेतल्या जातात. त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यावरून प्रगतीचा आढावाही दिला जातो. हे पालकांसमोर पुन्हा पुन्हा मांडले जाते. मुले स्वतःसाठी चेकलिस्ट तयार करतात आणि त्यावरून स्वतःची मोजपट्टी तयार करतात. वर्गपातळीवर मुले आपले म्हणणे आणि जबाबदाऱ्या पूर्ण करतात. त्यातून मूल्यमापन आणि चिंतन केले जाते.

आजच्या काळातील नई तालीम

नवीन शैक्षणिक धोरण २०२० आले आहे. या बदलत्या काळात बुनियादी शिक्षण किंवा नई तालीम शिक्षणपद्धतीसमोर कोणती आव्हाने असतील, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

शिक्षणातील समता, सुरक्षितता, बंधुता आणि स्वातंत्र्याची अनुभूती मोजक्या लोकांना हवी आहे की सर्वांना? हा प्रश्न केवळ शिक्षणाचा नाही, तर समाजाच्या भवितव्याचा आहे. पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना शिक्षणपद्धतीतही बदल करावे लागतील.

सहयोगी शिक्षणाचा विचार करायला हवा. मुलांनी परस्परांशी तुलना करून द्वेषभावनेला जोडले जाण्याऐवजी सहयोगी पद्धतीने, स्नेहाने एकमेकांशी जोडले जावे, हे महत्त्वाचे आहे. शिक्षणाचे बाजारीकरण आणि स्तरीकरण यांचा विचार करताना केवळ शासनव्यवस्थेकडे बोट दाखवून चालणार नाही. पालक, शिक्षक आणि समाज यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.

म्हणून पालकांनी, शिक्षकांनी आणि शासनव्यवस्थेने एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. आपल्याला कशा पद्धतीने मुलांचे भविष्य घडवायचे आहे? त्यांना खरी सुरक्षा कशी मिळणार आहे? त्यासाठी केवळ भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे पुरेसे नाही. त्यांना मैत्री, सहकार्य आणि संवेदनशीलता मिळणारा अवतीभोवतीचा समाजही आवश्यक आहे.

मुलांनी पर्यायी आणि अधिक शाश्वत जीवनशैली स्वीकारली, तर त्याचा लाभ केवळ त्यांच्या वर्तमानाला नव्हे, तर पुढच्या पिढ्यांनाही मिळू शकतो.

गांधी जयंतीच्या निमित्ताने एक पुनर्विचार

नवीन कितीही शैक्षणिक धोरणे आली, तरी गांधीजींच्या बुनियादी शिक्षण किंवा नई तालीम शिक्षणपद्धतीमध्ये असणारे काही मूलभूत विचार आजही विचार करण्यास भाग पाडतात. मन, बुद्धी आणि शरीर यांचा सर्वांगीण विकास, श्रमाची प्रतिष्ठा, कामातून ज्ञान, मातृभाषेतील शिक्षण, सहकार्य, स्वावलंबन, सामाजिक समता आणि माणूसपण यांची सांगड घालणारे शिक्षण ही आजही महत्त्वाची गरज आहे.

मेंदू-आधारित ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचे विचार आनंद निकेतनने आजच्या शिक्षणपद्धतीतील बदलांसह नव्या स्वरूपात स्वीकारले आहेत. असे असले तरी मन, बुद्धी आणि शरीर यांचा सर्वांगीण विकास करणारे एकात्मिक स्वरूपाचे शिक्षण आणि त्यामध्ये उत्पादक कामाला दिलेले महत्त्व हा विचार आजही त्याच्या केंद्रस्थानी आहे.

शिक्षणाच्या नव्या पद्धती स्वीकारताना गांधीजींच्या बुनियादी शिक्षण किंवा नई तालीम शिक्षणपद्धतीमधील मूलभूत सिद्धांत नव्या स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याचे काम सुषमा शर्मा आणि आनंद निकेतन शाळेची टीम करत आहे. त्यांच्या या कार्याकडे केवळ एका शाळेच्या प्रयोगाच्या रूपात न पाहता, शिक्षणाच्या पर्यायी वाटांचा शोध घेणाऱ्या एका प्रयत्नाच्या रूपात पाहता येईल.

गांधी जयंती म्हणजे केवळ गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा दिवस नव्हे. त्यांच्या विचारांतील आजच्या काळाशी संबंधित प्रश्न पुन्हा तपासण्याचा दिवसही आहे. ‘माणूस घडविणारे शिक्षण’ ही संकल्पना आपण खरोखर आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवली आहे का, हा प्रश्न प्रत्येक शाळेने, प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक पालकाने आणि व्यापक समाजाने स्वतःला विचारण्याची गरज आहे.

कदाचित म्हणूनच गांधी नावाचे हे ‘गारुड’ आजही संपलेले नाही. ते एखाद्या व्यक्तिपूजेचे नव्हे, तर माणूस, श्रम, स्वावलंबन, समता आणि शिक्षणाच्या अर्थाचा पुनर्विचार करण्याचे निमित्त ठरू शकते.

गांधी जयंतीच्या निमित्ताने नई तालीमकडे पुन्हा एकदा पाहणे म्हणजे भूतकाळात परत जाणे नव्हे; तर बदलत्या वर्तमानात शिक्षणाचा अधिक मानवी, कृतीशील आणि जीवनाशी जोडलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न होय.

आयु. सोमीनाथ घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते
मु. पो सासकल ता. फलटण जि. सातारा
ईमेल : bhimai05@gmail.com
मो. नं : 9284658690

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments