फलटण, प्रतिनिधी : फलटण येथील मधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या १७ वर्षांखालील महिला हॉकी संघाने नेहरू कप हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या शानदार विजयामुळे संघाची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील नेहरू कप हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मुधोजी हायस्कूलच्या महिला खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाची गुणवत्ता आणि जिद्द सिद्ध केली. संघातील खेळाडूंनी सांघिक भावना, उत्तम नियोजन, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या यशामुळे फलटणसह सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून महाराष्ट्राच्या हॉकी क्षेत्रासाठीही ही आनंदाची आणि गौरवास्पद बाब मानली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आता राष्ट्रीय स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे.
या विजयानंतर मधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, क्रीडा शिक्षकांचे तसेच संघाच्या यशासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे विधान परिषदचे मा सभापती विद्येमान आमदार श्रीमंत रामराजे निंबाळकर , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदचे मा अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण कोरगाव विधान सभेचे मा आमदार दिपक यांनी सर्वाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. तसेच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही या संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या महिला हॉकी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे तसेच सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व हॉकीप्रेमींचे मनःपूर्वक अभिनंदन! राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाला हार्दिक शुभेच्छा.
