Tuesday, September 29, 2026
Homeफलटणहॉकी महाराष्ट्राच्या सहसचिवपदी महेश खुटाळे यांची बिनविरोध निवड

हॉकी महाराष्ट्राच्या सहसचिवपदी महेश खुटाळे यांची बिनविरोध निवड

४६ वर्षांच्या हॉकी क्षेत्रातील अनुभवाला संघटनात्मक जबाबदारी; फलटणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्फ मैदान उभारण्यासाठी पाठपुरावा करणार

फलटण : महाराष्ट्रातील हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकासाला चालना देतानाच खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या सहसचिवपदी सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक तथा ‘द हॉकी सातारा’चे सचिव महेश मधुकर खुटाळे सर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे फलटण आणि सातारा जिल्ह्यातील हॉकी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेत अनुभवी आणि मैदानावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या क्रीडा कार्यकर्त्यांना संघटनेच्या जबाबदाऱ्या देण्यावर भर देण्यात आला. या पार्श्वभूमीवर कृष्ण प्रकाश यांची अध्यक्षपदी, मनोज मोरे यांची सचिवपदी, तर महेश खुटाळे यांची सहसचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

चार दशकांहून अधिक काळ हॉकीसाठी योगदान

महेश खुटाळे यांनी तब्बल ४६ वर्षे हॉकी क्षेत्राशी विविध भूमिकांमधून सातत्याने योगदान दिले आहे. खेळाडू, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, राष्ट्रीय पंच तसेच क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खेळाडूंना केवळ मैदानावरील प्रशिक्षण न देता त्यांना स्पर्धात्मक हॉकीची शिस्त, फिटनेस, तंत्रज्ञान, पंचगिरी तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्याचे कामही त्यांनी केले आहे.

मैदानावरील अनुभवाचा संघटनेला फायदा

हॉकी महाराष्ट्रच्या कार्यकारिणीत प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्या अनुभवी व्यक्तींना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महेश खुटाळे यांचा प्रदीर्घ अनुभव, प्रशिक्षक म्हणून केलेले कार्य आणि ग्रामीण भागातील खेळाडूंशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क लक्षात घेऊन त्यांची सहसचिवपदी निवड करण्यात आल्याचे संघटनेचे सचिव मनोज भोरे यांनी सांगितले.

या नव्या जबाबदारीमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हॉकीच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळणार असून, तळागाळातील खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.

फलटणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्फ मैदान उभारण्यासाठी प्रयत्न

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना महेश खुटाळे यांनी महाराष्ट्रासह विशेषतः सातारा जिल्हा आणि फलटण परिसरातील हॉकी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

फलटणमध्ये हॉकी खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्फ मैदान उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी हॉकी इंडिया आणि हॉकी महाराष्ट्रच्या माध्यमातून संबंधित स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

क्रीडा विभागातील अनुभवाचा उपयोग

शासनाच्या क्रीडा विभागात कार्यरत असताना विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये काम करण्याचा अनुभव महेश खुटाळे यांना आहे. त्यामुळे विविध जिल्हा हॉकी संघटनांना शासनाच्या क्रीडा विभागामार्फत उपलब्ध असलेल्या खेळाडू विकास, क्रीडा सुविधा आणि मैदान विकासाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य सुविधा, प्रशिक्षण आणि स्पर्धेच्या संधी मिळाल्यास महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने दर्जेदार हॉकीपटू घडू शकतात, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

मान्यवरांकडून अभिनंदन

महेश मधुकर खुटाळे यांच्या हॉकी महाराष्ट्रच्या सहसचिवपदी झालेल्या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फ.ऐ. सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांच्यासह ‘द हॉकी सातारा’चे पदाधिकारी, हॉकी प्रशिक्षक, माजी राष्ट्रीय हॉकीपटू, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि आजी-माजी हॉकी खेळाडूंनी अभिनंदन केले.

महेश खुटाळे यांच्या निवडीमुळे सातारा जिल्ह्यासह फलटणच्या हॉकी क्षेत्राला राज्यस्तरीय संघटनेत प्रतिनिधित्व मिळाले असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात स्थानिक खेळाडू आणि हॉकीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी होईल, अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments