Thursday, September 24, 2026
Homeफलटण‘खेळ पैठणी’चा केवळ मनोरंजन नव्हे, महिलांच्या आत्मसन्मानाचा जागर!

‘खेळ पैठणी’चा केवळ मनोरंजन नव्हे, महिलांच्या आत्मसन्मानाचा जागर!

ज्ञान, खेळ, उत्साह आणि खिलाडूवृत्तीचा अनोखा संगम; तावरेनगरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

फलटण : महिलांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांच्या चौकटीबाहेर त्यांना आनंदाचे, व्यक्त होण्याचे आणि स्वतःच्या कौशल्याला वाव देणारे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने तावरेनगर येथील एकनिष्ठ गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ‘खेळ पैठणीचा, उत्साह आनंदाचा’ हा महिलांसाठी रंगारंग कार्यक्रम उत्साहात पार पडला. तावरेनगर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘खेळ पैठणीचा, उत्सव आनंदाचा, साज मराठमोळा, अभिमान महाराष्ट्राचा’ या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाचे निवेदक व संयोजक प्रबोधनकार महावीर भालेराव आणि उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक तथा व्याख्याते बाबासाहेब जगताप यांनी विविध खेळांचे प्रभावी नियोजन केले. सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे आणि रामचंद्र मोरे यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रश्नमंजुषेने झाली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचार व कार्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे मनोरंजनासोबतच महिलांच्या ज्ञानाला आणि सामाजिक जाणिवेलाही उजाळा मिळाला.

यानंतर संगीताच्या तालावर ‘तळ्यात-मळ्यात’, हात न वापरता दोऱ्याला बांधलेली मिरची बाटलीत टाकणे, तसेच कपाळावर ठेवलेले बिस्किट खाली न पडता तोंडापर्यंत नेणे अशा विविध गमतीदार खेळांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. विविध फेऱ्यांमधून निवडलेल्या स्पर्धकांसाठी संगीत खुर्ची घेण्यात आली.

अंतिम फेरीत सुहानी भोसले आणि पूजा अहिवळे यांनी पैठणीचे मानकरी ठरण्याचा मान मिळवला. तर सुवर्णा भोसले आणि निकिता सरतापे यांनी इलेक्ट्रिक इस्त्रीची बक्षिसे पटकावली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला जेवणाचा टिफिन बॉक्स देण्यात आला. दोन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यानेही उपस्थितांची मने जिंकली.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पैठणीपेक्षा सहभागाला आणि महिलांच्या आत्मविश्वासाला अधिक महत्त्व देण्यात आले. महिलांसाठी आयोजित कार्यक्रमांकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता, महिलांना स्वतःसाठी वेळ देण्याची, व्यक्त होण्याची, नव्या मैत्री निर्माण करण्याची आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ‘खेळ पैठणीचा’ हा पैठणी जिंकण्यापुरता मर्यादित न राहता महिलांच्या आनंद, आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाचा उत्सव ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकनिष्ठ गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते संदीप निकाळजे, नितीन रजपूत, सचिन खुडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन व परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments