माण | प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत नवीन धोरण निश्चित करण्याच्या पार्श्वभूमीवर कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांना धोरणनिर्मिती प्रक्रियेत योग्य प्रतिनिधित्व देण्यात आल्याबद्दल संघटनेच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांबाबत शासन स्तरावर वेळोवेळी धोरणे निश्चित केली जातात. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अधिकृत माहितीनुसार शिक्षकांच्या बदली धोरणामध्ये विशेष संवर्ग, जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली यांसंदर्भात विविध निर्णय व स्पष्टीकरणे यापूर्वीही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
शिक्षक बदली धोरण तयार करताना शिक्षकांच्या विविध संघटनांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि विविध सामाजिक घटकांना योग्य प्रतिनिधित्व देणे आवश्यक असल्याची भूमिका कास्ट्राईब शिक्षक संघटनेने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेला धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेत स्थान दिल्याबद्दल संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.
विशेषतः अनुसूचित जाती-जमाती तसेच वंचित घटकातील शिक्षकांच्या सेवासंबंधी प्रश्न, बदली प्रक्रियेतील अडचणी, विशेष संवर्गातील शिक्षकांचे प्रश्न आणि पारदर्शक बदली प्रक्रिया याबाबत संघटनेच्या प्रतिनिधींना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणे महत्त्वाचे असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
शिक्षकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून कास्ट्राईब शिक्षक संघटनेला योग्य प्रतिनिधित्व दिल्याबद्दल ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. ना. जयकुमार गोरे भाऊ यांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शिक्षकांच्या बदली, पदोन्नती व समायोजन प्रक्रियेसाठी नवीन नियमावली आणण्याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी माहिती दिली होती.
