Wednesday, September 16, 2026
Homeफलटणसाताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक; ऊस गळीत हंगामातील आंदोलनाची दिशा ठरविण्यावर चर्चा

साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक; ऊस गळीत हंगामातील आंदोलनाची दिशा ठरविण्यावर चर्चा

सातारा | प्रतिनिधी चालू ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आज सातारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व चर्चा झाली.

यावेळी आगामी गळीत हंगाम, ऊस दर, शेतकऱ्यांना मिळणारा अंतिम दर तसेच साखर कारखान्यांकडून जाहीर होणारी पहिली उचल यासह विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे भूमिका घेण्याबाबतही विचारविनिमय केला.

दरम्यान, गेल्या हंगामाच्या अंतिम दरापेक्षा प्रतिटन किमान ३०० रुपये वाढीव दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले आहे.

यंदा राज्य शासनाने ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लवकर गळीत सुरू केल्याने उसाची परिपक्वता व साखर उताऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत राजू शेट्टी यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

आगामी काळात २९ सप्टेंबर रोजी हुबळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन तसेच १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे २५ वी ऊस परिषद होणार असल्याची घोषणा संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची तयारी आणि शेतकऱ्यांचा सहभाग याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करून आगामी आंदोलन प्रभावी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments