योगासन व कुस्ती स्पर्धेत कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
फलटण : तालुकास्तरीय योगासन व कुस्ती स्पर्धांमध्ये कमला निंबकर बालभवन, फलटणच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. योगासन स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला, तर कुस्ती स्पर्धेत एका विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांची पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
योगासन स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांची प्रथम क्रमांकाची कामगिरी
दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी फलटण येथील हणमंतराव पवार हायस्कूल येथे तालुकास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत कमला निंबकर बालभवनच्या १४ वर्षांखालील तसेच १७ वर्षांखालील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
१४ वर्षांखालील गटातील ट्रॅडिशनल सिंगल योगासन प्रकारात इयत्ता सातवीतील राजवीर कदम याने प्रथम क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील गटात इयत्ता नववीतील शिवराय शिंदे व आदित्य तोरसे यांनी रिदमीक जोडी योग प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. याच गटातील ट्रॅडिशनल योगा प्रकारात इयत्ता नववीतील प्रीती कर्णे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच रिदमीक जोडी या प्रकारात इयत्ता नववीतील प्राजक्ता काकडे व श्रीजा बोबडे या जोडीने प्रथम क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांना योगविशारद मनीषाताई भोसले यांनी उत्तम मार्गदर्शन केले. नियमित सराव, तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण तयारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कुस्ती स्पर्धेत शिवराज वेताळची दमदार कामगिरी
दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बीबी येथे फ्रीस्टाईल तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत कमला निंबकर बालभवनचा इयत्ता सहावीतील विद्यार्थी शिवराज वेताळ याने १४ वर्षांखालील मुलांच्या ४१ किलो वजनी गटात सहभागी होत प्रथम क्रमांक पटकावला.
शिवराजने सन २०२५ मध्ये स्वराज कुस्ती केंद्रात प्रवेश घेतला. तेथे वस्ताद दत्ताभाऊ हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सातत्याने सराव करत कुस्तीचे धडे गिरवले. त्याच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फलित म्हणून त्याने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
योगासन आणि कुस्ती या दोन्ही क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे कमला निंबकर बालभवनच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि कलात्मक विकासाला शाळेत दिले जाणारे महत्त्व या कामगिरीतून अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना क्रीडा शिक्षिका निता सस्ते यांचे सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले व पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कमला निंबकर बालभवनच्या बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
